टँकरच्या पाणीदरातही पाचशे रुपयांची वाढ

ठाणे : ठाणे महापालिका प्रशासनाने तीन महिन्यांपूर्वी उद्योगधंदा व्यवसाय तसेच साठा परवाना शुल्कामध्ये कपात करून उद्योजकांना दिलासा दिला असतानाच, व्यावसायिक वापराच्या पाणीदरात वाढ केल्याने शहरातील विविध आस्थापनांसह उद्योजकांना आता प्रतिहजार रुपये लीटरमागे २० रुपये जास्त मोजावे लागणार आहेत. दरम्यान, उद्योजकांच्या संघटनेने ही दरवाढीला विरोध करत ती मागे घेण्याची मागणी केली आहे. याशिवाय, टँकरद्वारे होणाऱ्या पाणी पुरवठय़ाच्या दरात पाचशे रुपयांची वाढ करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.

ठाणे शहरातील वागळे इस्टेट आणि पोखरण परिसरात औद्योगिक वसाहती आहेत. या उद्योजकांना रस्त्यावरील खड्डे, अनियमित पाण्याचा पुरवठा, स्वच्छतागृह अशा विविध समस्यांचा सामना करावा लागतो आहे. त्यातच गेल्या काही महिन्यांपासून उद्योजकांना आर्थिक मंदीचा फटका बसत आहे. ठाणे महापालिका प्रशासनाने उद्योग व्यवसाय तसेच साठा परवाना शुल्कात ५० टक्के, तर साठा परवाना शुल्कात ४० टक्के कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे उद्योजकांना काहीसा दिलासा मिळाला असतानाच, त्यांना आता पाण्यासाठी प्रति हजार रुपये लीटरमागे २० रुपये जास्त मोजावे लागण्याची चिन्हे आहेत. ठाणे महापालिका क्षेत्रातील घरगुती तसेच व्यावसायिक पाणी वापराच्या दरात ४० ते ५० टक्के वाढ करण्याचा निर्णय घेतला असून या संबंधीचा सविस्तर प्रस्ताव प्रशासनाने येत्या सर्वसाधारण सभेपुढे मान्यतेसाठी ठेवला आहे. त्यामध्ये नवे दर प्रस्तावित करण्यात आले असून त्यानुसार व्यावसायिक वापराच्या पाण्यासाठी यापुर्वी प्रति हजार लीटरसाठी १५ ते ४० रुपये इतके पैसे आकारले जात होते. मात्र, आता ३५ ते ६० रुपये इतके नवे दर प्रस्तावित करण्यात आले आहेत. त्यामुळे शहरातील उद्योगांसह आस्थापनांना पाणी वापरासाठी प्रति हजार लीटर मागे २० रुपये जास्त पैसे मोजावे लागण्याची शक्यता आहे. ठाणे शहरातील वागळे इस्टेट येथील औद्योगिक वसाहतीमध्ये एमआयडीसीकडून पाणी पुरवठा करण्यात येतो. तर उपवन, खोपट, घोडबंदर तसेच अन्य भागातील लघु उद्योगांसह शहरातील आस्थपनांना महापालिका व्यावसायिक दराने पाणी देयक आकारते, अशी माहिती सुत्रांनी दिली.

ठाणे जिल्ह्य़ातील धरण क्षेत्रातील पाणी साठय़ाचे जुन महिन्यापर्यंत नियोजन करण्यासाठी पाटबंधारे विभागाकडून पाणी कपात लागू केली जाते. फेब्रुवारी किंवा मार्च महिन्यापासून ही कपात सुरु होते. ती जून महिन्याच्या दुसऱ्या आठवडय़ापर्यंत असते. त्यामुळे या कालावधीत पाणी कपातीमुळे शहरात ठिकठिकाणी पाणी टंचाईची समस्या निर्माण होते. या टंचाईग्रस्त भागात महापालिकेकडून टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्यात येत असून टंचाईच्या काळात ठाणेकरांना टँकरच्या पाण्यामुळे मोठा दिलासा मिळतो. असे असतानाच टँकरद्वारे होणाऱ्या पाणी पुरवठय़ाच्या दरात पाचशे रुपयांची वाढ करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.

यंदा खूप पाऊस झाल्यामुळे मुबलक पाणीसाठा असताना त्याचे नियोजन करण्याऐवजी पाणी दरवाढ करणे योग्य नाही. शहरातील लघु उद्योगांसह हॉटेल तसेच इतर व्यावसायिकांच्या पाणीदरात वाढ झाली तर त्याचा परिणाम सर्वसामन्य जनेतवर होईल. त्यामुळे महापालिकेने ही दरवाढ मागे घ्यावी. -शिशीर जोग, प्रवक्ते, ठाणे लघुउद्योग संघटना