पालिका आयुक्तांकडून डॉक्टर निलंबित, विभागीय चौकशीचे आदेश

मीरा-भाईंदर महापालिकेच्या रुग्णालयातील डॉक्टरांनी दाखवलेल्या हलगर्जीमुळे गर्भवती महिलेचे अर्भक पोटातच दगावल्याची घटना मीरा रोड येथे घडली आहे. या प्रकरणाची गंभीर दखल पालिका आयुक्तांनी घेतली असून संबंधित डॉक्टरला निलंबित करण्यात आले आहे. याप्रकरणी विभागीय चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.

मीरा रोड येथील महानगरपालिकेच्या भारतरत्न इंदिरा गांधी रुग्णालयातील डॉक्टर आणि इतर कर्मचाऱ्यांच्या वागणुकीबाबत सातत्याने तक्रारी प्राप्त होत असतात. एका गर्भवती महिलेच्या बाबतीत करण्यात आलेल्या निष्काळजीपणामुळे महिलेला आपल्या बाळाचा जीव गमवावा लागल्याची धक्कादायक घटना या रुग्णालयात घडली आहे. प्रसूतीचे दिवस पूर्ण होत आलेली ही गर्भवती महिला पोटात दुखू लागल्याने रुग्णालयात गेली होती. त्यावेळी रुग्णालयातील डॉक्टर प्रणिल पडय़ार यांनी तिला व्यवस्थितर न तपासताच पोटदुखीचे इंजेक्शन देऊन घरी पाठवले. दुसऱ्या दिवशी महिलेच्या पुन्हा पोटात दुखू लागल्याने ती पुन्हा रुग्णालयात गेली. मात्र प्रसूतीला अद्याप अवधी आहे, असे सांगून तिला परत पाठवण्यात आले. असे सलग दोन दिवस घडले. अखेर या महिलेला आपल्या पोटातील गर्भाची हालचाल होत नसल्याची जाणीव झाली. त्यामुळे ती सकाळीच रुग्णालयात दाखल झाली. यावेळी रुग्णालयात सोनोग्राफी यंत्र असतानाही महिलेला त्यासाठी बाहेर पाठवण्यात आले. खासगी केंद्रात सोनोग्राफी केली असता पोटातील बाळ दगावले असल्याचे स्पष्ट झाले. या घटनेने हादरलेली महिला पुन्हा रुग्णालयात आली आणि तिने सोनोग्राफीचा अहवाल डॉक्टरांना दाखवला. दगावलेले मूल पोटात ठेवणे धोकादायक असताना डॉक्टारांनी महिलेला रुग्णालयात काही काळ तसेच बसवून ठेवले आणि नंतर शस्त्रक्रिया करून दगावलेले मूल बाहेर काढले, असा आरोप महिलेच्या नातेवाईकांनी केला आहे. घडलेली घटना महिलेने स्थानिक नगरसेविका रशिदा काझी यांच्या कानावर घातली. काझी यांनी हे प्रकरण महासभेत उपस्थित करून प्रशासनाला फैलावर घेतले. रुग्णांच्या जिवाशी खेळ करणाऱ्या डॉक्टरवर तातडीने कारवाई करण्याची मागणी काझी यांनी केली. आयुक्त डॉ. नरेश गीते यांनी ही बाब गांभीर्याने घेत वैद्यकीय आरोग्य अधिकाऱ्यांना या प्रकरणाची माहिती घेण्याचे आदेश दिले आहेत. यासंदर्भात आयुक्तांनी बोलावलेल्या बैठकीलाही डॉक्टर अनुपस्थित राहिले. त्यामुळे आयुक्तांनी डॉक्टर प्रणिल पडय़ार यांना तातडीने निलंबित केले, तसेच चौकशी अधिकाऱ्याची नेमणूक करून त्यांची विभागीय चौकशी करण्याचे आयुक्तांनी आरोग्य विभागाला दिले. डॉ. प्रणिल पडय़ार यांच्या विरोधात या आधीही अनेक तक्रारी प्रशासनाकडे दाखल झाल्या आहेत. दरम्यान, पीडित महिलेने या विरोधात ग्राहक मंचाकडे दावा दाखल केला आहे.