पिकांवर रोगांचा प्रादुर्भाव; खाचरांमध्ये पाणी नसल्याने भेगा

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

दमदार पावसामुळे यंदाच्या हंगामामध्ये चांगले भात उत्पन्न मिळण्याच्या आशेवर पाणी पडले आहे. दाणा भरण्याच्या वेळेतच पावसाने पाठ फिरवल्याने पिकावर संकट आले आहे. पाण्याने भरलेल्या खाचरांऐवजी सध्या या ठिकाणी भेगा पडलेल्या दिसत आहेत. कडकडीत उन्हामुळे किड व रोगांचा प्रादुर्भाव झाला असून दाणा कितपत भरेल याची चिंता आहे.

यंदाच्या हंगामामध्ये पावसाचे आगमन धूमधडाक्यात झाले. मुसळधार पावसामुळे अनेक शेतकऱ्यांचे बियाणे एक-दोन वेळा पुराच्या पाण्यात वाहून गेले तर काही ठिकाणी बियाणे कुजले. अनेक शेतकऱ्यांनी भाताची पुन्हा उशिराने पेरणी केली होती. जुलै महिन्यामध्ये पावसाने जिल्ह्यातील संपूर्ण हंगामातील सरासरी गाठल्यानंतर उर्वरित मोसमात पाऊस नेहमीसारखा झाला तर ओला दुष्काळ जाहीर करावा लागेल अशी भीती वाटत होती. मात्र ऑगस्ट महिन्यात पाऊस गायब झाला. पालघरमध्ये ऑगस्ट महिन्यात सरासरी ४४० मिलीमीटर इतक्या पावसाची नोंद होत असताना यंदा फक्त १९३ मिलिमीटर (४४ टक्के) इतक्याच पावसाची नोंद झाली. यापूर्वी सन १९९९ मध्ये ऑगस्ट महिन्यात १४७ मिलीमीटर तर २०१५ साली १८५ मिलीमीटर पावसाची नोंद झाली होती. सप्टेंबर महिन्यातील १९ दिवसांत आजवर फक्त २६ मिलीमीटर पाऊस झाला आहे.

भातपिकाला फुटवा येऊ न दाणा तयार होण्याची वेळ आली असताना पाण्याची चणचण भासू लागल्याने पीक धोक्यात आले आहे. इतरवर्षी या सुमारास खाचरांमध्ये पाणी भरून राहायचे, जमिनीत ओलावा राहायचा. तशी परिस्थिती यंदा राहिली नसल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. सध्या भात शेतांमध्ये पाण्याअभावी भेगा पडल्या आहेत. अशा परिस्थितीत भाताचा दाणा कितपत भरेल ही चिंता आहे.

त्यात काही भागामध्ये करपा रोगाची लागण झाली असून खोडकिडा, तुडतुडा आदी कीटकांचा प्रार्दूभावही वाढला आहे. त्यामुळे उशिराने पेरण्या झालेल्या शेतकऱ्यांसमोर देखील संकट आहे.

औषधांची फवारणी केली जात असली तरी देखील पिकाला पाण्याची गरज आहेत.

जिल्ह्यातील विविध भागांतील भातपिकांच्या परिस्थितीवर देखरेख ठेवली जात आहे. कृषी साहाय्यकांच्या व अधिकाऱ्यांच्या मदतीने प्रत्येक आठवडय़ाला पिकाची वाढ, रोग, किडीच्या प्रादुर्भावाच्या प्रमाणांचा अभ्यास करून त्याची माहिती संकेतस्थळावर अपलोड केली जाते. सध्या तरी जिल्ह्यातील भात पिकावर संकट आले अशी स्थिती नाही.

– दिलीप नेरकर, उपविभागीय कृषी अधिकारी, पालघर

प्रारंभी पावसाच्या जोरामुळे शेतकऱ्याचे नुकसान झाले. अनेकांनी पुन्हा लागवड केल्यानंतर पावसाने पाठ फिरविल्याने यंदाच्या पिकांचे भवितव्य धोक्यात आले आहे. शासनाने लहरी हवामानामुळे होणाऱ्या नुकसानीची भरपाई द्यावी.

-नागेश पाटील, शेतकरी, तांदुळवाडी (सफाळे)

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Infestation of crops
First published on: 20-09-2018 at 02:19 IST