ठाणे : केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळेच महागाईचा भडका उडाला असून त्याचा त्रास सर्वसामान्य नागरिकांना करावा लागत आहे, अशी टीका खासदार सुप्रिया सुळे यांनी गुरुवारी ठाण्यात केली. महागाईवर नियंत्रण आणण्याबाबतचा मुद्दा सातत्याने लोकसभेत मांडूनही त्यावर सरकार नियंत्रण आणू शकले नाही, असा दावाही त्यांनी केला.

ठाणे येथील राम मारुती रोड परिसरात ‘माधवबाग’चे नवे क्लिनिक सुरू करण्यात आले असून त्याचे उद्घाटन गुरुवारी खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते झाले. या कार्यक्रमादरम्यान पत्रकारांशी बोलताना त्यांनी महागाईच्या मुद्दय़ावरून केंद्र सरकारवर टीका केली. स्वातंत्र्यवीर सावरकरांविषयी वादग्रस्त उल्लेख केल्यामुळे काँग्रेसच्या मुखपत्रावर बंदी घालण्याची मागणी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली असून त्यावर खासदार सुळे यांनी भाष्य करत फडणवीस यांच्यावर अप्रत्यक्षपणे टीका केली.

‘आमचे दडपशाहीचे सरकार नाही आणि माजी मुख्यमंत्री काही बोलत असतील तर तो त्यांचा अधिकार आहे. त्यांच्यात आणि आमच्या सरकारमध्ये हाच तर फरक असून मनमोकळेपणाने कोणालाही बोलण्याचा अधिकार आहे,’ असा टोला त्यांनी लगावला.