16 June 2019

News Flash

येऊरमधील हिरवी नवलाई : ‘पेव’ फुटायला लागले!

ठाणे शहराचं वैभव असणाऱ्या ‘येऊर’च्या जंगलातला जैवविविधतेचा साठा संपता न संपणारा. सध्या ‘येऊर’च्या जंगलात ‘पेव’ फुटायला सुरुवात झाली आहे.

| July 29, 2015 01:15 am

tvlogठाणे शहराचं वैभव असणाऱ्या ‘येऊर’च्या जंगलातला जैवविविधतेचा साठा संपता न संपणारा. सध्या ‘येऊर’च्या जंगलात ‘पेव’ फुटायला सुरुवात झाली आहे. ‘पेवा’ला जास्त आणि डायरेक्ट अंगावर येणाऱ्या सूर्यप्रकाशाची गरज नसते. म्हणून मोठय़ा झाडाखाली योग्य अशी सावलीची जागा बघून हे पेव बघता बघता वाढत जातं. ‘पेव’ दिसायला अगदी छोटं, कमरेएवढं वाढणारं असलं तरी हर्ब (herb) या प्रकारात न मोडता झुडूप (shrub) या प्रकारात सामावते. हर्ब आणि श्रब यात हाच मुख्य फरक आहे की, हर्बचा बुंधा हिरवा, मांसल असतो, तर श्रबचा लाकडी. पेव इतरांपासून थोडं निराळंच आहे. त्याचा बुंधा अगदी सुरुवात होते तिथे लाकडी असतो. थोडा उंच झाल्यावर मात्र हर्बसारखा मांसल, मऊ आणि हिरवा लागतो. १५ ते ३० सें.मी.ची कर्दळीसारखी मोठी पानं ‘ससाईल’ म्हणजे बिनदेठाची असतात. देठावर लाल खूण असते. गोलाकार. जिन्याच्या पायऱ्यांसारखी पानांची मांडणी असते. खरं तर निसर्गातील ही गोलाकार म्हणजे चक्राकार पानांची मांडणी पाहून चक्राकार जिन्याची कल्पना सुचली असावी.
अशा पानांच्या रचनेचा फायदा असा की, सर्व पानांना सूर्यप्रकाश मिळतो. एक तर थोडय़ाशा सावलीत वाढणारं हे झुडूप म्हणून मिळणारा सूर्यप्रकाश कमी. त्यातून त्या थोडय़ा सूर्यप्रकाशासाठी आपल्या-आपल्यात मारामारी कशाला? प्रत्येक पान स्वतंत्र असेल तर एकाच वेळी सर्वाना सूर्यप्रकाश मिळेल आणि एका पानाची सावली दुसऱ्या पानावर पडणार नाही. म्हणून तर पेवाचा नाजूक पण लवचीक, मांसल बुंधा स्पायरली फिरतो. अशी ही चक्राकार चढत जाणारी रचना दिसायला पण सुंदर आणि फायदेशीरसुद्धा.
या झुडपाची फुलं पांढरीशुभ्र पण फारच शोभिवंत असतात. हिरव्या पानांमधून बाहेर आलेली ब्रॅक्ट लाल-किरमिजी रंगाची असतात. ही ब्रॅक्ट म्हणजे दुसरं-तिसरं काही नसून या झुडपाची मॉडिफाइड पानं असतात. त्यातून नरसाळ्यासारखे पांढरे फूल बाहेर डोकावते. या फुलाचे नरसाळे जिथे उगवायला सुरुवात होते तिथली नळी सरळसोट वर जाणारी असते. पण फुललेलं फूल मात्र एका बाजूला वळून झुकलेलं असतं. झुडपामध्ये असणारा चक्राकार फिरण्याचा हा स्वभावातला गुण पार बुंध्यापासून सरकत, वर चढत फुलांपर्यंत पोचला की काय, असे वाटते. पांढऱ्या फुलाच्या मध्यभागी पिवळा रंग छिडकलेला असतो. या पांढऱ्या नरसाळ्याच्या कडा चुरगाळलेल्या क्रेपच्या कागदासारख्या दिसतात.
आपण जे खातो ते ‘आलं’ याच जे कूळ आहे, त्याच कुळात म्हणजे झिंझीबरेसी या कुळात पेवाचा समावेश होतो. या फुलाला परागीभवनासाठी लांब सोंड म्हणजे प्रोबोसिस असणाऱ्याची गरज असते. मोठय़ा फुलात आरामात बसून, फक्त लांब सोंड मधाच्या साठय़ात खुपसून मधाचा आनंद घेणारा आणि त्याच वेळी परागीभवन करणारा ग्रास डेमॉन Demon  नावाचा एक स्कीपरसुद्धा येऊरच्या जंगलात सध्या इकडून-तिकडे उडताना दिसतो. स्कीपर हे पंखावर खवले असणारे असले तरी फुलपाखरू या वर्गातही येत नाहीत आणि पतंग या वर्गातही येत नाहीत. ते या दोघांपेक्षा वेगळे असतात. स्कीपरना सावली प्रिय असते. ते जरी सुसाट उडत असले तरी जमिनीपासून फार उंच जात नाहीत. स्वत:च्या लांबीच्या दुपटीपेक्षाही जास्त लांब असणाऱ्या सोंडेची कॉईलसारखी गुंडाळी करून फिरणारा हा स्कीपर फुलावर बसल्यावर पूर्ण सोंड उलगडते आणि पेवाच्या फुलाच्या नळीतून आत मध्यापर्यंत पोचतो.
येऊरच्या जंगलात सध्या रानफुलं उमलली आहेत. या रानफुलांचं विश्व समजून घेण्यासाठी मेधा कारखानीस यांनी नेचर ट्रेलचं आयोजन केलं आहे. रविवार, २ ऑगस्ट रोजी येऊर येथे त्यात सहभागी होण्यासाठी पूर्वनोंदणी आवश्यक आहे.
संपर्क- ९८२०१०१८६९.

First Published on July 29, 2015 1:15 am

Web Title: influx in yeoor forest
टॅग Yeoor Forest