दुचाकीचे वेड तरुणाईला कायमच राहिले आहे. काळानुरूप बाइकचे प्रकार, आकार, वैशिष्टय़े बदलत गेली, पण दुचाकीवर मांड टाकून फिरण्याचे तरुणाईला वाटणारे आकर्षण अजिबात कमी झालेले नाही. त्यातही वेगाने धावणाऱ्या स्पोर्ट्स बाइक किंवा धडधड आवाज करत ऐटीत धावणाऱ्या बुलेट यांची तरुणाईत विशेष क्रेझ आहे. पण पूर्वी राजे महाराजांच्या काळात घोडय़ावर बसून लढाईला जाणारा सैनिक जसा घोडय़ाप्रमाणेच स्वत:लाही पूर्णपणे संरक्षित करणारी पोलादी चिलखते परिधान करत असे, त्याप्रमाणे अलीकडे बाइकला साजेशी वेशभूषा करून त्यावर स्वार होण्याकडे अधिक कल वाढू लागला आहे. त्यामुळेच खास दुचाकीवर परिधान करण्यासाठी म्हणून जॅकेट, विशिष्ट पॅण्ट, लेग गार्ड, हॅण्ड गार्ड, हेल्मेट, विशिष्ट बूट, हॅण्डग्लोव्ज, गॉगल आदींची बाजारात गर्दी होऊ लागली आहे. या साधनांना आता इतकी मागणी आहे की तो एक फॅशनचा भागच बनला आहे.

दुचाकी लाखांच्या घरातली वापरताना तिच्यावरून वावरण्यासाठी नव्या लुकचा पोशाख आता अनिवार्य ठरू लागला आहे. ही पोशाख साधने बाइकस्वारांचे संरक्षण करण्यासाठी असली तरी त्यामधील वैविध्यामुळे तो एक स्टाइल स्टेटमेंटचा भाग ठरू लागला आहे. ठाणे आणि आसपासच्या शहरांतील मोठमोठय़ा मॉलमध्ये आणि बाजारपेठांमध्ये खास बाइकच्या पोशाख साधनांची दुकाने थाटण्यात आली आहेत. या प्रत्येक वस्तूची किंमत ही वेगवेगळी असून सामान्यांच्या खिशाला परवडणाऱ्या नसल्या तरी, त्याची हुबेहूब नक्कल करणारे ‘गिअर्स’ बाजारांतील छोटय़ा दुकानांमध्येही उपलब्ध आहेत. पोशाखांच्या विक्रीची मुख्य दालने मुंबई, वाशी, ठाण्याजवळ आहेत. यात ठाण्याजवळील वोकहार्ट रुग्णालयाजवळील एस. एम. स्टुडिओ, वाशी रेल्वे स्थानकाजवळील बच्चू मोटर्स व मुंबईत लॅमिंग्टन रस्त्यावरील ऑटोमोबाईल मार्केट येथे या सगळ्याच वस्तूंचे वेगवेगळे प्रकार पाहायला मिळतात.

रायडिंग पॅण्ट

रायडिंग पॅण्ट्स ही रायडिंग जॅकेटसोबत घालण्यात येत असली तरी तिची किंमत स्वतंत्र व जॅकेटपेक्षा काहीशी जास्त आहे. या पॅण्टमध्येही गुडघ्याच्या संरक्षणासाठी अंतर्गत नी-गार्ड येत असून संपूर्ण पॅण्टच्या आत असे सुरक्षाकवच आहे. सुरक्षाकवच असले तरी पॅण्ट आतून मोकळी असते, ज्यामुळे बाइक चालविताना चालकाला आरामदायी वाटते. रेक्झीनसारख्याच कपडय़ाच्या या पॅण्ट तयार करण्यात येत असून त्यांचा रंगही परावर्तित होणारा असल्याने मागच्या चालकास त्या काळोखात ओळखता येतात. पाण्यातही या पॅण्ट टिकत असून थ्री-एक्सएस ते सीक्स-एक्सएल या मापात या पॅण्ट उपलबध आहेत. या पॅण्टच्या काळ्या रंगालाच सर्वाधिक पसंती असून सहा हजारांपासून या पॅण्टची किंमत सुरू होते.

हेल्मेट

हेल्मेट हा बाइकस्वाराच्या सुरक्षिततेचा अविभाज्य भाग असतो. स्पोर्ट्स बाइकिंगसाठी अत्याधुनिक हेल्मेट सध्या उपलब्ध झाली आहेत. आकर्षक चकचकीत रंग व त्यावरील डिझाईन्स बघूनच अनेक जण हेल्मेटची निवड करतात. सध्या स्पोर्ट्स बाइकिंगसाठी वापरण्यात येणारी हेल्मेट केवळ मजबूतच नसून बाहेरील आवाजाचा त्रास त्यातून होत नाही. अनेक हेल्मेटच्या आत हल्ली ब्लू-टूथ डिव्हाइस व इअरफोन्सपण येतात. जेणेकरून फोनवरून त्यांना संभाषण साधता येते. यासाठी हेल्मेट काढण्याची गरज भासत नाही. तसेच चेहऱ्याच्या सुरक्षिततेसाठी संपूर्ण हेडमास्कही हेल्मेटसोबत घेता येतात. या मास्कमध्ये फक्त नाक व डोळे झाकलेले नसतात, मात्र बाकीचा भाग झाकलेला असतो. हेल्मेटची काच ही गॉगलप्रमाणेच असल्याने उन्हाचा त्रासही होत नाही. तसेच हवा खेळती राहावी, मात्र बाहेरील आवाज व धूळ आता येणार नाही या बेताने छोटी जाळीही बसविण्यात आलेली असते. साधी हेल्मेट स्वस्त असतात. मात्र स्पोर्ट्स बाइकिंगसाठीची ही हेल्मेट १४ हजारांपासून पुढे सुरू होतात.

लेग गार्ड

लेग गार्ड हे पायाच्या गुडघ्याचे संरक्षण करण्याचे मुख्य काम करीत असल्याने त्याला नी-गार्डही म्हणतात. वेगवान बाइक चालविल्याने अपघातच होण्याची जास्त भीती असल्याने निर्माण झालेल्या या वस्तू आता नवे स्टाइल स्टेटमेंट होत आहेत. या नी-गार्डची किंमतही दीड हजारापासूनच सुरू होते.

रेसिंग बूट

बूट हा तरुणांच्या आजच्या फॅशनमधील अविभाज्य भाग असून यांचे सध्या सगळ्यात जास्त वेगवेगळे प्रकार दुकानांमध्ये आढळतात. त्यातही खास बाइकसाठी रेसिंग बूटही उपलब्ध आहेत. लष्करातल्या जवानांच्या बुटाप्रमाणेच हे मोठे व मजबूत असतात, मात्र आतून पायांना ऊब व मऊपणा मिळत असतो. हल्ली कोणत्याही कंपनीच्या शूज शोरूममध्ये असे वेगवेगळे बूट सहज मिळतात. ठाण्यातील व्हिवियाना मॉल, कोरम मॉलमधील दालनांमध्ये असे वेगवेगळे बूट उपलब्ध असून यांच्या किमती चार हजारांपासून पुढे सुरू होतात.

रायडिंग जॅकेट

वेगवान दुचाकी पळवणाऱ्याला सध्या महत्त्वाची गोष्ट म्हणजे रायडिंग जॅकेट्स. रायडिंग जॅकेट्स ही निरनिराळ्या प्रकारांत व किमतीत सध्या बाजारात उपलब्ध आहेत. केवळ चेनचे जॅकेट नसून यात अनेक गोष्टींचा अंतर्भाव होतो. यात खांदा व हाताच्या कोपऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी जॅकेटच्या आतून सुरक्षा कवच बसविण्यात आले असते. जेणेकरून अपघाताचा प्रसंग आल्यास शरीराच्या या भागांचे रक्षण होईल. तसेच जॅकेटचा रंग हा परावर्तित करणारा असल्याने रात्रीचे वेळी प्रवास करताना बाइकस्वार दुरूनच अन्य वाहनचालकांच्या दृष्टीस पडतो. कोणत्याही ऋतूत ही जॅकेट घालता येण्यासारखी असून पाण्यातही ही जॅकेट खराब होत नाहीत. किंमत- पाच ते २५ हजार.

हॅण्ड गार्ड

बाइक चालविताना हाताचे संरक्षण व मुख्यत्वे सांध्यांचे भाग म्हणजे कोपरा, खांदा, मनगट आदी भाग सुरक्षित राहण्यासाठी अशी हॅण्ड गार्ड बाजारात उपलब्ध आहेत. इंग्रजी चित्रपटातील अभिनेत्यांनी चित्रपटांत वापरलेल्या डिझाईन्सप्रमाणेच ही हॅण्ड गार्ड बाजारात मिळत असून दीड हजारापासून यांच्या किमतीला सुरुवात होते.

हॅण्ड ग्लोव्ह्ज

तशी हाताची सुरक्षा म्हणून साधे कापडी ग्लोव्ह्ज अशी ओळख आता हॅण्ड ग्लोव्ह्जची राहिली असून अत्यंत आकर्षक व आकाराने मोठे हॅण्ड ग्लोव्ह्ज आता दिसून येतात. बहुतेक या अ‍ॅक्सेसरीजचा रंग काळा असल्याने काळ्या रंगाचे मोठे ग्लोव्ह्ज सध्या तरुणांमध्ये लोकप्रिय आहेत. हे ग्लोव्ह्ज चामडय़ाचे व कॉटनचे असतात व कोणत्याही ऋतूत वापरण्यायोग्य असतात. हाताचा वरील भाग सुरक्षित राहावा म्हणून तो काहीसा कडक असतो. रंग, वेगवेगळे आकार या ग्लोव्ह्जचे वैशिष्टय़ असून तेही दीड हजारापासून बाजारात उपलब्ध आहेत.