News Flash

रंगाप्रमाणे नाव बदलणारा ‘डिस्कस’

गोडय़ा पाण्यातील हा मासा असून खारे पाणी या प्रजातीला सहन होत नाही.

‘डिस्कस’

पाळीव प्राणी म्हणजे केवळ कुत्रा किंवा मांजरच नव्हेत. बऱ्याच घरांत ससे आणि विशिष्ट प्रकारचे उंदीरही पाळले जातात. पण त्यांच्यापेक्षाही अधिक घरांत दिसणारा आणखी एक सजीव म्हणजे मासा. अलीकडे जवळपास प्रत्येक घरात फिशटँक आढळतातच. घराच्या दर्शनी भागात अतिशय आकर्षक सजावटीने नटलेल्या ‘फिशटँक’मधील रंगबिरंगी मासे इकडून तिकडे पळताना पाहत बसणं अतिशय रंजक असतं. बरं, माशांचे प्रकार तरी किती? प्रत्येक घरात वेगळ्या रंगाचे, आकाराचे, प्रकाराचे मासे पाहायला मिळतात. हे मासे म्हणजे माशांच्या वेगवेगळ्या प्रजाती. गोल्डफिशपासून शार्कपर्यंत आणि मौलीपासून क्लाऊनफिशपर्यंत असंख्य प्रकारचे मासे सध्या बाजारात मिळतात. मात्र, या सर्व माशांत आपलं वेगळेपण जपणारं एक नाव आहे, ते म्हणजे ‘डिस्कस’. अतिशय आकर्षक दिसणाऱ्या या माशाचा रंग बदलतो तसं त्याचं नावही बदलतो. त्यामुळे बऱ्याचदा आपल्या घरी असणारे मासे डिस्कस आहेत, हे आपल्याला जाणवतही नाही.
१९६० च्या दरम्यान ब्राझीलमधील अॅमेझोन नद्यांमध्ये डिस्कस हे मूळ ब्रीड सापडले. १९७० च्या दशकात हे ब्रीड विकसित करण्यात सुरुवात झाली. त्या वेळी या माशाला हेकल या नावाने संबोधत. पूर्वी या माशाचा रंग काळा होता. या ब्रीडवर अनेकांनी संशोधन केले आणि कालांतराने या माशाच्या रंगांत बदल झाला. जगामध्ये शोभेसाठी वापरले जाणारे आणि बहुतांश मत्सालयात वापरले जाणारे ब्रीड यासाठी ‘डिस्कस’ लोकप्रिय आहे. डिस्कस माशाच्या शरीराचा आकर्षकपणा, रंग हे वैशिष्टय़ आहे. या ब्रीडला मांसाहार दिल्यास उत्तम ठरतो. आहारात योग्य प्रमाणात औषधे मिसळून नियमित खाद्य पुरवल्यास या माशांचा रंग टिकून राहतो. अन्यथा आहारात असमतोल झाल्यास त्याचा रंगावर परिणाम होऊन बाजारातील या माशांची मागणी कमी होते. डिस्कस ब्रीडचे पालन करणे हे खर्चीक आहे. साधारण या माशाची वाढ २० ते २५ सेंमीपर्यंत होते. या प्रजातीतील नर आणि मादी सहसा ओळखता येत नाही. निरीक्षणातून काही तज्ज्ञांना हालचालीवरून नर आणि मादी हा फरक ओळखता येतो. काही मासे पिल्ले घालतात, मात्र डिस्कस या माशाची प्रजात अंडी घालते आणि अंडय़ांचे रक्षणदेखील करते. विशेष म्हणजे मातीच्या भांडय़ात किंवा काचेच्या पट्टीवर हे मासे अंडी घालतात. गोडय़ा पाण्यातील हा मासा असून खारे पाणी या प्रजातीला सहन होत नाही.
सजावट आणि वाळू नको
शोभेच्या दृष्टिकोनातून हे ब्रीड विकसित केल्याने फिश टँकमध्ये डिस्कस पाहायला मिळतात. मात्र फिश टँकमध्ये असणारी वाळू या ब्रीडला सहन होत नाही. वाळू असल्यास या माशांचा रंग नष्ट होण्याची शक्यता असते. फिश टँकमधील सुशोभीकरण या ब्रीडला चालत नाही. तसेच या ब्रीडच्या वास्तव्याच्या ठिकाणी दुसऱ्या प्रजाती ठेवण्यात येत नाही. एकटे राहण्याची सवय या ब्रीडला असते.
लाजाळू आणि भावनिक
इतर प्राण्यांप्रमाणे माशांनासुद्धा त्यांचा विशिष्ट स्वभाव आहे. डिस्कस मासे भावनिक आहेत. घरातील व्यक्तींसोबत ते जास्त रुळतात. अनोळखी व्यक्तीने घरात प्रवेश केल्यास हे मासे घाबरतात. तसेच त्यांच्या विशिष्ट हालचालींवरून या माशांचा लाजाळू स्वभाव लक्षात येतो. डोंबिवलीमध्ये राहणारे परेश पाटील या डिस्कस माशाचे भारतात मोठय़ा प्रमाणावर ब्रीडिंग करतात. रेड मेलन, ब्लू डायमंड, यलो डायमंड, मोजाईक लेपर्ड्स, पर्ल अशा विविध नावांमध्ये डिस्कस हे ब्रीड आढळते, असे परेश सांगतात.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 9, 2015 2:22 am

Web Title: information about discus fish
Next Stories
1 अध्यात्मातील ‘वसंत’
2 कोंडीचे ग्रहण सुटणार कधी?
3 ज्ञान, विज्ञान आणि मनोरंजनाचा संगम
Just Now!
X