News Flash

स्वस्तात मस्त

शहरात भूक लागल्यावर नव्हे, माणसे वेळ मिळाल्यावर जेवतात, असे गमतीने म्हटले जाते.

सकाळ-संध्याकाळचा नाश्ता आणि दुपार-रात्रीचे जेवण अशी पूर्णवेळ सेवा येथे उपलब्ध आहे.

शहरात भूक लागल्यावर नव्हे, माणसे वेळ मिळाल्यावर जेवतात, असे गमतीने म्हटले जाते. त्यातला विनोदाचा भाग सोडला तरी काही प्रमाणात व्यस्त जीवनशैलीचे हे वास्तवही आहे. घरचे अन्न सर्वात उत्तम हे कळत असले तरी अनेक कारणांमुळे किमान एकवेळ अथवा प्रसंगी दोन्ही वेळी बाहेरचे मागवून खावे लागणे सध्या शहरी जीवनात अपरिहार्य ठरले आहे. अशा प्रकारचे वारंवार बाहेरचे खाणे हे पोटाला तसेच खिशालाही परवडणारे नसते. मात्र नाईलाज म्हणून अनेकांना समोर येईल ते पूर्णब्रह्म समजून पोटात ढकलावे लागते. मात्र अंबरनाथमध्ये गेल्या एप्रिल महिन्यात सुरू झालेल्या ‘जनता थाळी’द्वारे घरच्या चवीचे जिन्नस किफायतशीर किमतीमध्ये देण्याचा प्रयत्न उमेश कुलकर्णी यांनी केला असून त्याला उत्तम प्रतिसाद मिळू लागला आहे. जिभेवर रेंगाळणारी चव, कमालीची स्वच्छता आणि पुन्हा किफायतशीर दर हे ‘जनता थाळी’चे प्रमुख वैशिष्टय़ ठरले आहे.
सकाळ-संध्याकाळचा नाश्ता आणि दुपार-रात्रीचे जेवण अशी पूर्णवेळ सेवा येथे उपलब्ध आहे. त्यामुळे नोकरदार मंडळी येता-जाता गरजेनुसार येथून पदार्थ घेऊन जातात. सकाळच्या नाश्त्यासाठी बटाटावडा, पोहे, मिसळपाव, भजी साधारण २० ते ३० रुपयांमध्ये उपलब्ध आहे. दोन भाज्या, तीन पोळ्या, डाळ-भात, लोणचे-पापड असे पूर्ण जेवण अवघ्या ५० रुपयांमध्ये दिले जाते. २५ रुपयांमध्ये झुणका-भाकरी मिळते. तीन पोळ्या आणि भाजीही तेवढय़ाच पैशात उपलब्ध आहे. या भागात अनेक कार्यालये आहेत. तिथे काम करणाऱ्या नोकरदारांची यामुळे चांगलीच सोय झाली आहे. तसेच चविष्ट नाश्त्यासाठी महाविद्यालयीन तरुणाईही सकाळ-संध्याकाळी येथे अड्डा जमवू लागली आहे. बँकांमधील कामे, बाजारहाट आदी कारणांसाठी सकाळ-संध्याकाळी स्थानक परिसरात फेरफटका मारणारे काही पेन्शनर्सही जनता थाळीची नियमित पायरी चढू लागले आहेत. कारण अगदी रेल्वे स्थानकाजवळ खिशाला परवडेल अशा किमतीमध्ये पोटपूजा करण्याचे हे उत्तम ठिकाण आहे. किफायतशीर दरातील उदरभरणाच्या या पर्यायांबरोबरच ज्यांना थोडे चमचमीत खायचे आहे, त्यांच्यासाठी पंजाबी पद्धतीच्या सर्व प्रकारच्या पनीर भाज्या, व्हेज कोल्हापुरी आदी मोठय़ा हॉटेल्समध्ये मिळणाऱ्या डिशही येथे मिळतात. याशिवाय बिर्याणी, पुलाव, जिरा राईस, डाळ खिचडीही येथे मिळते.
मुंबईतील काहीतारांकित हॉटेल्समध्ये कुक म्हणून कामाचा अनुभव असलेले रानबा चिमणे जनता थाळीच्या स्वयंपाकघराची जबाबदारी सांभाळतात. सकाळ आणि संध्याकाळ अशा दोन शिफ्टमध्ये येथे स्वयंपाकी नेमण्यात आले आहेत. ग्राहकांच्या समोरच पदार्थ शिजविले जातात. अनेकदा मोठमोठय़ा हॉटेल्समध्ये स्वयंपाकघर म्हणजे दृष्टिआडची सृष्टी असते. इथे असला प्रकार नाही. ग्राहकाला त्याच्यासमोर गरमागरम पदार्थ करून दिले जातात. दररोज बाजारात उपलब्ध असणाऱ्या सिझनल ताज्या भाज्या आणल्या जातात. राम अन्वीकर ‘जनता थाळी’चे व्यवस्थापक म्हणून काम करतात.
‘सर्वसाधारणपणे स्थानकाच्या जवळ मोक्याच्या ठिकाणी इतक्या किफायतशीर दरात पदार्थ देणे व्यावहारिकदृष्टय़ा परवडणारे नाही. मात्र जनता थाळीची जागा आमची स्वत:ची आहे. पुन्हा सर्वसामान्यांना परवडणाऱ्या दरात खाद्यपदार्थ देण्याच्या उद्देशानेच ‘जनता थाळी’ सुरू केल्याने केवळ नफा हे आमचे उद्दिष्ट नाही. अनेकदा पैसे मोजूनही ग्राहकांना चांगले, सकस खायला मिळत नाही. ते त्यांना देता यावे, अशी बऱ्याच दिवसांपासून इच्छा होती. ‘जनता थाळी’द्वारे ती पूर्ण झाली. नफ्यापेक्षा या सेवेतून मिळणारा आनंद फार मोठा आहे, अशी प्रतिक्रिया उमेश कुलकर्णी यांनी व्यक्त केली आहे.

जनता थाळी, शिवाजी चौक, अंबरनाथ (पूर्व.)

– प्रशांत मोरे

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 28, 2015 2:57 am

Web Title: information about janta meals
Next Stories
1 नगरसेवकांना बेकायदा बांधकामे भोवणार!
2 आणखी ११ नगरसेवकांवर कारवाईची टांगती तलवार
3 पाचव्या दिवशीही फेरीवाल्यांची दाणादाण
Just Now!
X