News Flash

निमित्त : जलसंवर्धनासाठीची धडपड

ड्रॉप डेड फाऊंडेशन’ची धुरा एका ८२ वर्षीय तरुणाच्या खांद्यावर आहे.

ड्रॉप डेड फाऊंडेशन’ची धुरा एका ८२ वर्षीय तरुणाच्या खांद्यावर आहे.

पाणी वाचवणे ही काळाची गरज आहे. ग्रामीण भागात यासाठी अनेक संस्था कार्यरत असल्या तरी शहरी भागात याबाबत अधिक जनजागृती झालेली नाही. मीरा रोडमधील ‘ड्रॉप डेड फाऊंडेशन’ ही संस्था जलसंवर्धनाचे काम करत असून आबिद सुरती हा ८२ वर्षीय ‘तरुण’ ही संस्था चालवत आहे.

ड्रॉप डेड फाऊंडेशन

पाणीटंचाई आणि दुष्काळ या दोन महत्त्वाच्या बाबींवर काम करणाऱ्या अनेक संस्था आहेत. गावोगावी तलाव बांधणे, शेततळी, विहिरी खोदणे आदी कामे या संस्था ग्रामीण भागात मोठय़ा स्तरावर करत असतात. मात्र हेच काम शहरातही करणे तेवढेच महत्त्वाचे आहे. मात्र शहरी भागात राहणाऱ्या नागरिकांना ग्रामीण भागातील लोकांच्या तुलनेत पाणी सहज उपलब्ध होते आणि यामुळेच शहरातील लोकांना पाणीबचतीचे धडे देणे आवश्यक आहे. याच जाणिवेतून वाया जाणारा पाण्याचा प्रत्येक थेंब वाचवण्यासाठी धडपड करत आहे मीरा रोडमधील ‘ड्रॉप डेड फाऊंडेशन’ ही  संस्था. विविध सामाजिक संस्थांमध्ये अनेक पदाधिकारी कार्यरत असतात. ‘ड्रॉप डेड फाऊंडेशन’ची धुरा एका ८२ वर्षीय तरुणाच्या खांद्यावर आहे. मात्र या अवलियाचे काम पाहून असंख्य हात या कार्यात सहभागी होत आहेत.

आज शहरातील अनेक घरांमधून गळणारे नळ असणे ही फार सामान्य गोष्ट वाटत असते, परंतु सतत गळणाऱ्या नळाद्वारे हजारो लिटर पाणी वाया जाते ही बाब आपल्या लक्षातच येत नाही. गळणाऱ्या नळातून वाया जाणारा पाण्याचा प्रत्येक थेंब एका व्यक्तीला मात्र प्रचंड अस्वस्थ करत असे आणि या अस्वस्थेमधूनच आबिद सुरती यांनी या गळणाऱ्या नळांविरोधात एक मोहीमच उघडली. त्यासाठी त्यांनी ‘ड्रॉप डेड फाऊंडेशन’ या सेवाभावी संस्थेची स्थापना केली. ‘पाणी हेच जीवन, पाणी नसेल तर मृत्यू अटळ आहे’ हाच संदेश ते आपल्या फाऊंडेशनच्या माध्यमातून देतात. ८० वर्षे पार केलेले सुरती आजही तितक्याच उत्साहाने या विषयावर काम करत आहेत आणि यात त्यांना उत्स्फूर्तपणे साथ देणारे कार्यकर्ते लाभत आहेत.

मीरा रोडला राहणारे आबिद सुरती व्यवसायाने लेखक, चित्रकार. त्यांचे बालपण मुंबईतल्या डोंगरी येथील पदपथावरच गेले. पाण्यासाठी फार मोठा संघर्ष त्यांच्या बालमनाने पाहिला आहे. केवळ  एका बादलीसाठी आपल्या आईने तासन्तास रांगेत उभे राहण्याचे घेतलेले कष्ट त्यांनी जवळून अनुभवले आहेत. पाण्याच्या प्रत्येक थेंबाचे महत्त्व त्यामुळेच त्यांच्या संवेदनशील मनावर कोरले गेले. जेव्हा जेव्हा गळणारा एखादा नळ आणि त्यातून वाया जाणारा पाण्याचा थेंब त्यांच्यासमोर येतो, तेव्हा पाण्याचा तो थेंब मस्तकावर हातोडय़ाचा प्रहार करत असल्याची अनुभूती त्यांना होत असते. हे पाणी वाचवावे, वाया जाणारा प्रत्येक थेंब सत्कारणी लागावा ही तळमळ त्यांना स्वस्थ बसू देत नव्हती.

एक दिवस पाण्याबाबतचा एक लेख वाचताना महिनाभर वाया जाणारा पाण्याचा थेंब एकत्र केला तर हजारो लिटर पाणी जमा होते हे सत्य सुरती यांना समजले. या लेखामुळेच सुरती यांना आपल्या कार्याची दिशा स्पष्ट झाली. घराघरातून गळणारे प्रत्येक नळ दुरुस्त करण्याचे त्यांनी ठरवले. नळ दुरुस्त करणारा एक प्लंबर सोबत घेऊन त्यांनी आपली मोहीम २००७ मध्ये सुरू केली. पाण्याचा थेंब वाया घालवाल तर एक दिवस मरणाला सामोरे जावे लागेल हे जळजळीत सत्य लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी त्यांनी ‘ड्रॉप डेड’ या स्वयंसेवी संस्थेची स्थापना केली. सुरुवातीला लोकांकडून प्रतिसादच मिळत नसे. घराचे दरवाजेही उघडण्यास लोक तयार नसायचे. मात्र आबीद हिम्मत हरले नाहीत. जिद्दीने आपले काम सुरूच ठेवले. त्यांच्या प्रयत्नांना यश येऊ लागले. पाणी गळती थांबवण्याचे महत्त्व लोकांना पटू लागले. गेल्या ११ वर्षांत वाया जाणारे तब्बल लाखो लिटर पाणी वाचवण्यात सुरती यांना यश आले आहे. आज सुरती यांनी दर रविवारचे तीन तास नळ दुरुस्तीच्या कामासाठी राखीव ठेवले आहेत.

पाणीबचतीचे कार्य केवळ नळ दुरुस्ती करण्यापुरतेच सीमित न ठेवता पाणीबचतीचे संदेश देशपातळीवरच नव्हे तर आंतरराष्ट्रीय पातळीवर नेण्याचा सुरती यांचा प्रयत्न आहे. यासाठी त्यांनी ‘वन ड्रॉप सिनेमा’ या स्पर्धा आयोजित केली होती. स्पर्धकांनी  पाण्याच्या भीषण परिस्थितीच्या पाश्र्वभूमीवर नागरिकांनी पाणी बचत कशी करावी, त्याचे महत्त्व काय आहे हे अत्यंत मार्मिक पद्धतीने जाहिरातीच्या स्वरूपाची जास्तीत जास्त एक मिनिटाची चित्रफीत तयारी करायची, असे त्याचे स्वरूप होते. याशिवाय पाणी बचतीसाठी नागरिकांना उद्युक्त करण्यासाठी सुरती यांनी एक अनोखी योजनाही तयार केली. लोकांवर धर्माचा फार मोठा पगडा असतो. त्यातील वचने, श्लोक यांचा खोलवर परिणाम भक्तांवर होत असतो. पाणी बचतीसाठी याचाच खुबीने उपयोग करण्याचे सुरती यांनी ठरवले. मोहम्मद पैगंबर यांचा एक संदेश आहे, ‘अगर आप नहर के किनारे बैठे हो, तब भी तुम्हे पानी जाया करने का हक नही है.’ पैंगबरांचा हा संदेश लिहिलेली भीत्तिपत्रके तयार करून सर्व मशिदींमधून ठळकपणे दिसेल अशा पद्धतीने लावण्याचे काम त्यांनी केले. हिंदू भक्तांमध्येही गणपतीला मानणारा फार मोठा वर्ग आहे. विशेषकरून महाराष्ट्रात गणेशोत्सवाचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. त्यामुळे गणेशाची मूर्ती असलेली भित्तिपत्रके छापून त्याखाली ‘पाणी नाही तर माझे विसर्जन नाही’ अशी ओळ देऊन ही भित्तिपत्रकेही अनेक मंदिरात लावण्यात आली आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 23, 2018 2:59 am

Web Title: information about ngo drop dead foundation
Next Stories
1 अनैतिक संबंधातून हत्या, मराठी चित्रपट निर्मात्याला अटक
2 कल्याण स्थानक परिसरात कचऱ्याचे ढीग
3 कळव्यातही पदव्युत्तर वैद्यकीय शिक्षणाचा मार्ग मोकळा
Just Now!
X