News Flash

निमित्त : ७२ वर्षांचे सेवाव्रत!

समाजप्रबोधन व लोगजागृतीसाठी संस्थेने १७५८ ते १९६२ पर्यंत व्याख्यानमाला चालवली.

समाज उन्नती मंडळ, माणिकपूर

माणिकपूरमधील समाज उन्नती मंडळ ही सेवाभावी संस्था गेली ७२ वर्षे विविध सामाजिक, सांस्कृतिक कार्यात कार्यरत आहे. १९४५मध्ये सुरू झालेल्या या संस्थेचे सेवाव्रत अजूनही कायम आहे.

समाज उन्नती मंडळ, माणिकपूर

समाज उन्नती मंडळाची स्थापना स्वातंत्र्यापूर्वीच्या काळात झाली आहे. त्या काळात समाज आर्थिकदृष्टय़ा मागासलेला होता, शिक्षणाचा अभाव होता, अज्ञानाचा अंध:कार सर्वत्र पसरला होता. समाजात अनिष्ट चालीरीती, अस्पृश्यता, अंधश्रद्धा यांनी ग्रासले होते. या समस्या नष्ट व्हाव्यात, ग्रामसुधारणा व्हावी, तरुणांचा व्यक्तिविकास व्हावा, शिक्षणाचा प्रसार व्हावा, विविध कलागुणांना वाव मिळावा या हेतूने प्रेरित होऊन विशीतल्या काही तरुणांनी एकत्र येऊन १९४५ च्या ऑक्टोबर महिन्यात दसऱ्याच्या मुहूर्तावर या संस्थेची संकल्पना मांडली आणि समाज प्रबोधनासाठी इशारा हे हस्तलिखित त्रमासिक सुरू केले. त्या काळात समाजप्रबोधनाची आणि समाजाला मार्गदर्शन करण्याची अत्यंत आवश्यकता होती. हे मार्गदर्शनाचे कार्य प्रामुख्याने थोर समाजसेवक राघोबा नारायण वनमाळी आणि  बाबाजी सखाराम यांनी केले. ते समाजाचे नेते होते आणि त्यांनी तरुणांना सामाजिक कार्याची प्रेरणा दिली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली आणि मोरेश्वर बाबाजी वनमाळी यांच्या नेतृत्वाखाली १५ ते २० तरुणांनी एकत्र येऊन ऑक्टोबर १९४५ मध्ये समाज उन्नती मंडळ या संस्थेची स्थापना केली. त्यावेळी संस्थेला स्वत:ची जागा नसल्यामुळे सुरुवातीस माणिक बारकू जाधव आणि गोविंद जाधव यांच्या माडीवर संस्थेचे कार्य सुरू केले. १९५८ मध्ये संस्कार केंद्र सुरू केले. त्यावेळी इतर विभागही कार्यान्वित झाले, परंतु हे विभाग चालवण्यास स्वतंत्र जागेचा प्रश्न संस्थेपुढे उभा राहिला. त्यावेळी माजी महसूलमंत्री भाऊसाहेब वर्तक यांनी संस्थेच्या कार्यकर्त्यांची तळमळ लक्षात घेऊन शासनाकडून २० गुंठे जागा संस्थेला मिळवून दिली. त्यावर इमारत बांधण्यासाठी अल्पबचत योजनेतून ५००० रुपयांची मदत मिळून दिली. मंडळाच्या कलापथकाने आणि नाटय़विभागाने अतोनात मेहनत घेऊन महाराष्ट्रात ठिकठिकाणी कार्यक्रम केले आणि त्या निधीतून १९५९-६०मध्ये मंडळाची इमारत बांधण्यात आली.

संस्थेच्या स्थापनेपासून सुरू झालेल्या मनोहर वाचनालयाला ७२ वर्षे पूर्ण झाली आहे. या ग्रंथालयासाठी सुरुवातीच्या काळात सामाजिक कार्यकर्ते अर्जुन दामोदर वनमाळी आणि दिवंगत पद्माकर जाधव यांनी पापडी येथील त्यांचे ग्रंथप्रेमी मित्र जावळे यांच्याकडून एक लाकडी कपाटासह २५० ग्रंथ भेट म्हणून मिळवून दिले आणि या संस्थेने वाचनालयाची स्थापना केली. आज २६,००० पुस्तके असलेले हे वाचनालय जोमाने सुरू आहे आणि २००७मध्ये या वाचनालयाला ‘अ’ वर्ग मिळाला आहे.

अभिनय व्याख्यानमाला : समाजप्रबोधन व लोगजागृतीसाठी संस्थेने १७५८ ते १९६२ पर्यंत व्याख्यानमाला चालवली. ही व्याख्यानमाला माणिकपूर येथील जिल्हा परिषद मराठी शाळेत आयोजित केली होती. आचार्य अत्रे, प्रा. अनंत काणेकर, माधव मनोहर, प्रबोधनकार ठाकरे, अप्पा पेंडसे, विजय तेंडुलकर, विठ्ठलराव गाडगीळ, शांता शेळके, बाबूराव अर्नाळकर, नानासाहेब फाटक इत्यादी नामवंत साहित्यिक, लेखक, कवी, नाटककार, अभिनेते यांची व्याख्याने आयोजित केली होती.

मुलांसाठी विविध शिबिरे : १० ते १४ वर्षे वयोगटातील मुलांच्या व्यक्तिमत्त्व विकासासाठी, त्यांच्या अंगी असलेल्या विविध कलागुणांना वाव देण्यासाठी, त्यांच्यावर चांगले संस्कार घडवण्यासाठी महाराष्ट्र समाज कल्याण सल्लागार बोर्ड मुंबईच्या सहकार्याने संस्थेने १० दिवसांचे सुटीकालीन शिबीर लोणावळा, माथेरान, महाबळेश्वर आणि नाशिक येथे आयोजित केले.

सांस्कृतिक विभाग : संस्थेला आर्थिक मदत मिळवून देणारा हा महत्त्वाचा विभाग. समाजातील युवकांना आणि संस्थेच्या कार्यकर्त्यांना कलेच्या क्षेत्रात वाव मिळावा या हेतूने या विभागाची स्थापना करण्यात आली. ‘कवडीचूंबक’, ‘सैतानी सट्टा’, ‘हाच मुलाचा बाप’, ‘देवमाणूस’, ‘उसना नवरा’, ‘पाणीग्रहण’, ‘घराबाहेर’, ‘राणीचा बाग’, ‘उद्याचा संसार’ आदी नाटके बसवण्यात आली. त्यातून नरेश गोविंद जाधव, हरिभाऊ  वाळींजकर, गणेश जाधव, वसंत राघोबा वनमाळी, दत्तात्रय शिवराम वनमाळी आणि नरेश गोविंद जाधव यांनी नाटकातून स्त्रीच्या भूमिका अप्रतिम केल्या. दिवंगत पांडुरंग वनमाळी यांच्या नेतृत्वाखाली संस्थेने कलापथक निर्माण केले. कलापथकाने गणगौळण, लोकनाटय़े, नृत्ये बसवली आणि शाहिरी, लावण्या, पोवाडे, गीत गायली गेली. ‘नशीब फुटके सांधून द्या’, ‘आधी होता वाघ्या’ ही लोकनाटय़े महाराष्ट्रभर गाजली.

समाज उन्नती मंडळाने ७२ वर्षांची वाटचाल केली आहे.  ७२ वर्षांपूर्वीच्या सामाजिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक जीवनात आज फार मोठा बदल झाला आहे. आजची जीवनमूल्ये बदलली आहेत. कालपरत्वे समाजात बदल होतच असतात. गेल्या ७२ वर्षांत समाजात कार्य करणाऱ्या समाज उन्नती मंडळाची वाटचाल अमृत महोत्सवी वर्षांत सुरू आहे. भविष्यातील आव्हाने पेलत समाजाच्या भल्यासाठी संस्थेची तरुण पिढी सक्रिय होत आहे.

राष्ट्रभाषेचे प्रचारकार्य

प्रत्येक नागरिकास हिंदी भाषा शिकता यावी म्हणून देशात राष्ट्रभाषेचे प्रचारकार्य सुरू होते. संस्थेनेदेखील हे प्रचारकार्य हाती घेतले आणि १९४८ ते १९५८ अशी १० वर्षे राष्ट्रभाषा प्रचार समितीच्या मदतीने माणिकपूर येथील ‘मराठी ट्रेनिंग कॉलेज’मध्ये हिंदी वर्ग संस्थेने सुरू केले. संस्थेने १५ ऑगस्ट १९६२ पासून ३ ते ५ वर्षे वयोगटातील मुला-मुलींसाठी बालमंदिर सुरू केले. लहान मुलांवर बालपणीच चांगले संस्कार व्हावेत आणि त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा विकास व्हावा म्हणून हसतखेळत शिक्षणाची सोय केली. या वर्गातून शिकून बाहेर पडलेल्या विद्यर्थ्यांनी पुढील अभ्यासात प्रावीण्य मिळवले.

संस्थेची विविध सामाजिक कार्ये

१९५४ मध्ये हरिजन गिरीजन समाज उन्नती मंडळ आणि आपले समाज उन्नती मंडळ यांच्या सहकार्याने माणिकपूर येथे ‘ठाणे जिल्हा हरिजन महिला परिषद’ येथे घेण्यात आली. १९५४ मध्ये आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त दोन दिवसांचे शिबीर आयोजित करण्यात आले होते. महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळातर्फे संस्थेने गावातील पुरुष व महिलांना रोजगारासाठी गावातील १० ते १२ जणांना आणि वसई तालुक्यातील ६० दे ७० मागासवर्गीयांना प्रत्येकी ५०० ते २००० रुपये आर्थिक साहाय्य मिळवून दिले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 24, 2018 1:26 am

Web Title: information about ngo samaj unnati mandal in vasai road
Next Stories
1 ठाण्यात कारवाईचा धडाका
2 मांसविक्री दुकाने विनापरवाना
3 पडीक भिंतींही बोलक्या झाल्या..
Just Now!
X