महाराष्ट्राची सांस्कृतिक उपराजधानी असलेल्या ठाणे महानगराने निरनिराळ्या प्रांतांतील बहुभाषिक नागरिकांना आपलेसे केले आहे. त्यामुळे महाराष्ट्रीय संस्कृतीबरोबरच काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत निरनिराळ्या संस्कृतींचे दर्शन ठाण्यात घडते. संस्कृतीचा थेट संबंध हा मुख्यत्वेकरून खाण्याशी असतो. त्यामुळे निरनिराळ्या प्रांतांतील अस्सल खाद्यपदार्थ त्या त्या मातीतील खास वैशिष्टय़ांसह ठाण्यात मिळतात. त्यातील एक म्हणजे श्रीनगर डोसा सेंटर. गेली २० वर्षे खास दाक्षिणात्य पद्धतीचे कुरकुरीत मेदुवडे आणि खमंग  डोशांसाठी ठाण्याच्या विविध भागांतून खवय्ये येथे येतात. कारण येथील येशुदास मार्कुस यांच्या हातच्या कुरकरीत डोशाची लज्जतच काही और आहे.

केरळमधील एका छोटय़ाशा गावातून येशुदास मार्कुस हे उदरनिर्वाहासाठी मुंबईत आले. सुरुवातीचे पाच वर्षे त्यांनी कुलाबा येथील एका छोटय़ाशा कॅन्टीनमध्ये स्वयंपाकी म्हणून काम केले. त्यानंतर त्यांनी पुढचे तीन वर्षे रस्त्यावर मेंदुवडा-इडली विकून त्यातून येणाऱ्या मिळकतीतून बचत करून २५ मार्च १९९४ रोजी श्रीनगर डोसा सेंटर सुरू केले. गेली २१ वर्षे श्रीनगरचा हा डोसा ठाणेकरांच्या जिभेचे चोचले पुरवीत आहे.

सकाळी मेदुवडय़ाच्या बेतानंतर संध्याकाळी येशुदास यांचा हात तव्यावर डोसे गिरवण्यासाठी फिरू लागतो. निरनिराळया स्वादांचे तब्बल ५०हून अधिक प्रकारचे डोसे येशुदास बनवितात. एकाच केंद्रावर तब्बल ५०हून अधिक प्रकारचे डोसे मिळणारे ठाण्यातील हे बहुधा एकमेव ठिकाण असावे. एरवी बहुतेक ठिकाणी तीन ते चार प्रकारचे डोसे मिळतात. त्यामुळे तेच ते प्रकार खाऊन कंटाळा येऊ शकतो. येशूदास यांच्या सेंटरवर भरपूर पर्याय उपलब्ध असल्याने अस्सल खवय्ये येथे येतात. म्हैसूर डोसा, शेजवान डोसा, पनीर डोसा, चायनीस डोसा, पनीर चिली डोसा, पनीर भुर्जी डोसा, चौप्सी डोसा, चीज डोसा असे विविध प्रकारचे डोसे येशुदास बनवितात. मात्र त्यात खवय्यांचा सर्वात आवडता डोसा म्हणजे चौप्सी डोसा. कारण तो खूपच कुरकुरीत असतो. दोन प्रकारच्या तांदळाचे पीठ, त्यात उडीद डाळ आणि मेथीचे दाणे टाकले जातात. या डोशात सिमला मिरची, गाजर, कांदा, कोबी, उकडलेला बटाटा, नुडल्स व तीन प्रकारचे सॉस टाकले जातात. अशा प्रकारे सर्व पदार्थ टाकल्यानंतर डोशाला ५ ते ७ मिनिटे झाकून ठेवण्यात येते. त्यामुळे सॉसमध्ये ते सारण अचूक मात्रात शिजले जाते. सारण शिजल्यानंतर ते डोशावर पसरवले जाते व डोसा गार्निश करून ग्राहकांना सव्‍‌र्ह केला जातो. डोशाबरोबर सव्‍‌र्ह केलेल्या चटणीमुळे ग्राहकांच्या तोंडाला पाणी सुटते. श्रीनगर डोसा सेंटरची चटणीही खास आहे. पुदिना, कोथिंबीर, लसूण, आले, चिंच, ओले खोबरे यांचे एकत्रित मिश्रण करून ती बनवली जाते. येशुदासच्या या श्रीनगरमधील डोशांची कीर्ती आता किसननगर, वागळे इस्टेटपुरती मर्यादित राहिलेली नाही. ठाण्याबाहेरही त्याची लोकप्रियता पोहोचली आहे.

श्रीनगर डोसा सेंटर

रोड न. २७, देना बँकेजवळ , वागळे इस्टेट , श्रीनगर ,ठाणे.