News Flash

अध्यात्मातील ‘वसंत’

या व्यक्तिमत्त्वानेआपल्या गीतेवरील ओघवत्या प्रवचनांच्या माध्यमातून औषध अगदी फुकट उपलब्ध करून दिले आहे.

वसंत नारायण मराठे ऊर्फ योगीदास

असं म्हणतात की, स्वभावाला औषध नाही, परंतु हे खरे नाही. ठाण्याच्या वसंत नारायण मराठे ऊर्फ योगीदास या आदरणीय, ऋषीतुल्य, सात्त्विक व प्रसन्न व्यक्तिमत्त्वानेआपल्या गीतेवरील ओघवत्या, रसाळ प्रवचनांच्या माध्यमातून ‘ते’ औषध अगदी फुकट उपलब्ध करून दिले आहे. ‘भगवंताने आनंदाची अभिव्यक्ती करण्यासाठी गायलेलं गीत म्हणजे गीता. हिच्या अभ्यासाने माणूस अंतर्बाह्य़ बदलतो. गीता आपल्याला आपण परमात्मस्वरूप आहोत याची ओळख करून देते,’ असं त्याचं स्पष्ट व प्रामाणिक मत आहे.
योगीदास मूळचे पनवेलचे. ते दोन महिन्यांचे असताना त्यांची आई आजारी पडल्यामुळे आत्याकडेच ते वाढले. सामाजिक कार्याकडे ओढा असलेल्या आत्याच्या यजमानांच्या सहवासात राहिल्यामुळे समाजसेवेचं बीज मनात रुजलं. पाचवीनंतर पुण्याला आणि मॅट्रिक झाल्यावर प्रीमियर ऑटोमोबाइल्समधील नोकरीच्या निमित्ताने ते ठाण्यात राहायला आले. संयुक्त महाराष्ट्र चळवळीत झोकून दिल्यामुळे दत्ताजी ताम्हणे, नी. गो. पंडितराव, आचार्य अत्रे व बाळासाहेब ठाकरे अशा प्रभृतींच्या संपर्कात आले. उत्साही आणि धडपडय़ा स्वभावामुळे शिवसेनेच्या स्थापनेपासून त्यात सहभाग घेऊन दोन वर्षे नगराध्यक्ष व सहा वर्षे नगरसेवक असे योगदान दिले. कोपरगाव येथे कॉन्फरन्ससाठी ते गेले असताना रात्री २ वाजता शिर्डीचे साई स्वप्नात आले. ‘हा काय खेळ आरंभला आहेस. तुला वेगळं काम करायचं आहे’ असं म्हणत साईनाथांनी चक्क योगीदासांच्या श्रीमुखात ठेवून दिली. त्या झिणझिण्या या घटकेलाही योगीदास यांना जाणवतात आणि त्यांचा हात गालावर स्थिरावतो. ‘त्या’ स्वप्नातून दोन-तीन दिवस ते बाहेर आले नाहीत. ठाण्यात परतल्यावर विचारपूर्वक, सन्मानाने त्यांनी राजकारणातून संन्यास घेतला.
‘मराठे इन्फोटेक’ या नावाने व्यवसाय सुरू केला. ठाणा कॉलेजमधून बीए (स्पेशल ऑनर्स) ही पदवी संपादन केली. कॉलेजमधून पदवी प्राप्त केलेली त्याची पहिली बॅच. प्रपंचाची गाडी रुळावर आणत त्यांनी आपला मोर्चा धर्मग्रंथांकडे वळवला. धुळे निवासी महायोगी श्री. अ. ल. भागवत यांच्या मार्गदर्शनाखाली अध्यात्मविद्येचे पहिले धडे गिरवले. ‘जे वैराग्याची शीव न देखती, विवेकाची भाषा नेणती, ते कैसे पावती, मज ईश्वरा ते’ या माऊलींच्या ओवीचा आदर्श ठेवला. फक्त स्वत:ला मोक्ष मिळवायचाय हा संकुचित विचार सोडून रामकृष्ण परमहंस यांचं प्रवृत्तीवादी, आध्यात्मिक तत्त्वज्ञान अभ्यासले. उद्धरेदात्मनात्मानं असा संदेश देणारी गीता त्यांना अतिशय भावली. चिन्मयमिशनचे काम करणाऱ्या अनुभवानंद यांची भेट घेऊन गीताभ्यासाचा मनोदय प्रदर्शित केला. अनुभवानंद यांनी स्वत:च्या एकशे ऐंशी हिंदी कॅसेट्स दिल्या. प्रत्येक कॅसेट शंभर वेळा ऐकायची आणि नंतर त्याची टिपणं काढायची. अशी श्रवणभक्ती चालू झाली.
यात खंड पडला तो योगीदास यांना रेल्वेरूळ ओलांडताना झालेल्या अपघातामुळे. अठरा टाक्यांनी जणू गीतेच्या अठरा अध्यायांकडे त्यांना वळवले. जवळपास पूर्ण व्यवसायाची धुरा मुलाच्या खांद्यावर सोपवून योगीदासांनी आध्यात्मिक स्वाध्यायाला वाहून घेतले. गीतेबरोबरच उपनिषदे, शांकरभाष्य, ब्रह्मसूत्रे, ज्ञानेश्वरी, दासबोध याचे वाचन मनन, चिंतन, स्वअध्ययन करून आचारविचार, कृती शुद्ध व पवित्र करण्यावर भर दिला. देह, मन, बुद्धी, इंद्रियं यांना शिस्त लावून षड:रीपूंना दूर करण्यासाठी संयम आणि सहनशीलतेचे धडे गिरवले. जयास एकांत मानला। अवघ्या आधी कळे तयाला। हे सूत्र आचरणात आणल्यामुळे अभ्यासाला गती झाली. साईनाथांच्या प्रेरणेनेच गीतेवरील प्रवचनांची मालिका २००० पासून सुरू झाली. अठरा अध्यायांना आठवडय़ातून दोन दिवस, प्रत्येकी एक तास याप्रमाणे साधारण अडीच वर्षे लागतात. अशी सात आवर्तने आतापर्यंत झाली आहेत. फक्त ठाणे, मुंबई नाही, तर महाराष्ट्रात गीता केंद्रस्थानी ठेवून वेगवेगळ्या विषयांवर प्रवचनासाठीही ते फिरू लागले.
लोकाग्रहास्तव ही प्रवचने, भगवद्गीता चिंतनमाला खंड १ ते ६, भगवद्गीतेच्या प्रत्येक श्लोकाचा अन्वय, मराठीत अर्थ व त्यावर मराठीमध्ये सविस्तर विवेचन, अशा स्वरूपात प्रकाशित करण्याचे अत्यंत अवघड काम जुलै २०१२ मध्ये वयाच्या एकोणऐंशीव्या वर्षी चालू करून फेब्रुवारी २०१५ मध्ये त्यांनी हातावेगळे केले. प्रत्येक खंडामध्ये तीन अध्याय व एकूण पाने तीन हजार सहाशेच्या आसपास आहेत. रोज दहा पाने लिहिण्याचा त्यांचा वेग थक्क करून टाकतो. शिवाय भगवंताकडे वाटचाल व श्री महादेवी स्तोत्र अशी छोटी पुस्तकेही प्रकाशित झाली.
देवीचे स्तोत्र तर पहाटे पाच वाजता स्फुरले आणि पंचवीस मिनिटांत कागदावर उतरले. ‘शब्द धावति ओळी ओळी। तोच खरा लिहविता।’ असंच सगळं लेखन. याच काव्यातला ‘योगीदास’ हा शब्द हीच त्यांची आता ओळख झाली आहे. १ ऑक्टोबर २०१५ रोजी ठा.म.पा.तर्फे सामाजिक आणि आध्यात्मिक कार्यासाठी ‘ठाणे भूषण’ या सन्मानाने त्यांना गौरविण्यात आले. वेदांत उत्तम रीतीने जगणारे ‘योगीदास’ म्हणजे आध्यात्मातील ‘वसंत’ हे आपल्यासाठी वर्तमान आहे आणि आपण त्याचे साक्षीदार आहोत हा ‘योग’ किती सुंदर आहे नाही का?

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 9, 2015 2:20 am

Web Title: information about vasant narayan marathe
टॅग : Information
Next Stories
1 कोंडीचे ग्रहण सुटणार कधी?
2 ज्ञान, विज्ञान आणि मनोरंजनाचा संगम
3 वाचक वार्ताहर
Just Now!
X