माहिती आयोगाचे ठाणे महापालिकेला आदेश

ठाणे महापालिका क्षेत्रात सुरू असलेल्या सर्व कामांचा सविस्तर तपशील, संबंधित ठेकेदारांची नावे, कामांची सद्य:स्थिती आणि काम पूर्ण होण्याची तारीख अशी सर्व माहिती महापालिका संकेतस्थळावर दोन महिन्यांत प्रकाशित करण्याचे आदेश राज्य माहिती आयोगाच्या कोकण खंडपीठाने महापालिका आयुक्तांना दिले आहेत.

ठाणे महापालिकेच्या विविध प्रकल्पांचा तसेच कामांचा तपशील माहिती अधिकार कार्यकर्त्यांना देण्यासोबत ही माहिती त्याच दिवशी संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने तीन आठवडय़ांपूर्वी घेतला होता. या निर्णयामुळे माहिती अधिकारात संबंधित अर्जदारांकडून मागविण्यात आलेल्या माहितीचा तपशील नागरिकांनाही संकेतस्थळावर उपलब्ध होणार आहे. असे असले तरी माहिती अधिकाराव्यतिरिक्त इतर कामांची माहिती संकेतस्थळावर टाकण्याचे कोणतेही नियोजन महापालिकेने आखले नव्हते. केवळ माहिती अधिकाराच्या माध्यमातून प्राप्त होणाऱ्या अर्जाविषयीची माहितीच संकेतस्थळावर टाकली जात असल्याने पारदर्शकतेच्या आघाडीवर महापालिका हात आखडता घेत असल्याच्या तक्रारी पुढे येत होत्या. कोकण खंडपीठाचे राज्य माहिती आयुक्त थँक्सी थेकेकरा यांनी मात्र महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांना दिलेल्या आदेशानुसार यापुढे प्रत्येक कामाची माहिती संकेतस्थळावर टाकणे प्रशासनाला बंधनकारक करण्यात आले आहे.

प्रकरण काय?

ठाणे महापालिका क्षेत्रात काम करणाऱ्या ठेकेदारांच्या देयकातून शासनाची रॉयल्टी वसूल करण्यात आली असेल तर त्यासंबंधीची सविस्तर महिती मिळावी, अशी माहिती विशाल जाधव यांनी महापालिकेकडे मागितली होती. मात्र वारंवार पाठपुरावा करूनही ही माहिती वेळेत मिळत नसल्याने जाधव यांनी राज्य माहिती आयोगाच्या कोकण खंडपीठाकडे यासंबंधी दाद मागितली होती. या सुनावणीदरम्यान कोकण विभागीय खंडपीठाने हा निर्णय दिला.