कल्याण-डोंबिवली पालिका हद्दीत झालेल्या नालेसफाईची माहिती देण्यास विलंब करणे आणि उशिरा दिलेल्या माहितीत दिशाभूल माहिती दिल्याचा ठपका ठेवत महापालिकेचे मुख्य आरोग्य निरीक्षक प्रभात शिंगडे यांना कोकण विभागीय माहिती आयुक्त टी. एफ. थेकेक्करा यांनी २५ हजार रुपयांचा दंड ठोठावला. ही रक्कम शिंगडे यांच्या दरमहा वेतनातून कापून घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
कल्याणमधील नागरिक विशाल शेलार यांनी महापालिकेकडे गेल्या वर्षी नालेसफाईची माहिती देण्याची मागणी माहिती अधिकारात केली होती. आरोग्य निरीक्षक शिंगडे यांनी ही माहिती देण्यास उशीर लावला. तसेच देण्यात आलेली माहिती दिशाभूल करणारी होती, अशी तक्रार शेलार यांनी माहिती आयुक्तांकडे केली होती.
या प्रकरणी शेलार यांनी महापालिकेत दाद मागितली. तेथे त्यांना प्रतिसाद मिळाला नाही. त्यानंतर शेलार यांनी कोकण विभागीय माहिती आयुक्तांकडे या प्रकरणी दाद मागितली.
तेथील सुनावणीला प्रभात शिंगडे उपस्थित राहिले नाहीत. त्यामुळे संतप्त आयुक्तांनी शिंगडे यांच्या बेशिस्त वर्तनाबद्दल त्यांना २५ हजारांचा दंड ठोठावून तो त्याच्या वेतनातून कापून घेण्याचे व शेलार यांना सर्व माहिती देण्याचे आदेश प्रशासनाला दिले.