स्कीमरने माहिती चोरणारे ठाण्यातील सात वेटरसह दहा जण अटकेत
हॉटेलमध्ये कार्डद्वारे बिल देताना सावधान! स्कीमरद्वारे कार्डची माहिती घेऊन त्याद्वारे एटीएममधून पैसे काढणाऱ्या टोळीला ठाणे पोलिसांनी अटक केली आहे. बिल चुकते करणाऱ्या ग्राहकांच्या नकळतपणे स्किमर यंत्रणेद्वारे त्यांच्या एटीएम कार्डाची नक्कल करून त्याद्वारे नंतर त्यांच्या खात्यातून पैसे उकळणारे तीन चोरटे आणि त्यांना साथ देणारे सात वेटर्स अशा दहा जणांच्या टोळीस ठाणे पोलिसांनी जेरबंद केले.
बनावट कार्डाद्वारे या टोळीने जवळपास ३० लाख रुपये एटीएममधून काढले. यात ३०० ते ३५० जणांना याचा फटका बसल्याचा प्राथमिक अंदाज आहे. याप्रकरणी फसवणूक झालेल्यांच्या संख्येत, तसेच रकमेत वाढ होण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. याप्रकरणी मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी कांदिवलीतील ठाकूर कॉम्प्लेक्समधील एचएसबीसी बँकेच्या एटीएमजवळ लावलेल्या सापळ्यात सुमित झिंगरन, विकी काव्‍‌र्हालो, केव्हीन डिसोझा यांना बनावट कार्डाद्वारे एटीएममधून २५ हजार रूपये काढताना मुद्देमालासह पकडले. त्यांच्याकडे ३० बनावट डेबीट, क्रेडीट कार्डस् मिळाले.
सुमित झिंगरन या हा प्रकरणातील मुख्य आरोपी असून त्याने इतर दोघांच्या मदतीने पब, बारमधील वेटर्सनाही या कटात सामील करून घेतले. ग्राहकांनी वेटरकडे बिल देण्यासाठी एटीएम कार्ड दिले की ते शिताफीने स्किमर यंत्रणेत त्यातील गोपनीय माहिती उतरवून ठेवत. तसेच ग्राहकांनी सांगितलेला पीन क्रमांक वेटर नोंदवून ठेवत. अशाप्रकारे या टोळीने सुमारे ३० लाख रूपयांची लूट केल्याचा पोलिसांचा अंदाज आहे.
याप्रकरणी मुंबई-ठाणे परिसरातील विविध बार आणि पबमध्ये काम करणारे बिपीन रॉय, सौरभ जयस्वाल, नारायण यादव, महेश किशन, अशोक महांतो, विनोद पटेल, शिवनाथ गुप्ता या सात वेटर्सनी ग्राहकांची माहिती चोरल्याचे निष्पन्न झाले आहे.