स्वत:च्याच घरावर ग्रामस्थांचा हातोडा

एखाद्या रस्त्याचे, चौकाचे, नाक्याचे रुंदीकरण करायचे असल्यास प्रशासनाकडून रस्त्याच्या कडेला असलेल्या इमारतीतील रहिवाशांनी नोटिसा पाठवून या इमारती जमीनदोस्त केल्या जातात. अशा वेळी अनेक रहिवासी घरांचा ताबा सोडण्यास टाळाटाळ करतात, अनेक जण पुनर्वसनाची, नव्या जागेची मागणी करतात. मात्र उत्तनमधील ग्रामस्थांनी गावातील नाक्याच्या रुंदीकरणासाठी स्वत:च पुढाकार घेतला. या नाक्यावर वारंवार वाहतूक कोंडी होत असल्याने ती दूर करण्यासाठी रहिवाशांनी स्वत:च आपल्या घरांचा काही भाग तोडण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे या ठिकाणी होणाऱ्या वाहतूक कोंडीच्या त्रासातून सुटका होणार आहे.

महापालिका प्रशासनाने सध्या शहरातील मुख्य रस्ते आणि वळणे रुंद करण्याची मोहीम हाती घेतली आहे. भाईंदर आणि मीरा रोड येथील रस्ते रुंद केल्यानंतर आता उत्तन येथे मोहीम सुरू करण्यात आली आहे, परंतु आयुक्तांनी केलेल्या आवाहनाला येथील रहिवाशांनी प्रतिसाद देत स्वत:च रुंदीकरणाच्या कामात सहकार्य केले आहे. उत्तन येथील नाक्यावर गेल्या अनेक वर्षांपासून असणाऱ्या घरांचा पुढचा हिस्सा रहिवाशांनी तोडून टाकला आहे. इतकेच नव्हे तर प्रशासनाने अपेक्षा केलेल्या रस्त्यापेक्षा या ठिकाणी रस्ता आणखी रुंद करावा, अशी विनंतीही ग्रामस्थांनी केली आहे.

उत्तन हा निसर्गसौंदर्याने नटलेला परिसर आहे. समुद्रकिनारा, रिसॉर्ट यांमुळे पर्यटकांची सतत या ठिकाणी ये-जा असते. या ठिकाणी असलेले वेलंकनी माता चर्च तर तीर्थक्षेत्र घोषित झाल्यापासून भाविकांचा ओढाही वाढला आहे. शिवाय उत्तन हे पश्चिम किनारपट्टीवरील महत्त्वाचे बंदर असून या ठिकाणी मत्स्यव्यवसायही मोठय़ा प्रमाणात होत असतो. त्यामुळेच येथे वाहनांची गर्दी होत असते. त्यातच महापालिकेच्या परिवहन सेवेतील बसचीही सतत ये-जा सुरू असते. रस्त्यावरील वाहनांची संख्या दिवसेंदिवस वाढत असली तरी उत्तनचे रस्ते मात्र अरुंद आहेत. त्यातच उत्तन नाका तर अतिशय अरुंद असा आहे. या ठिकाणी परिवहन सेवेची एक बस जरी आली तरी संपूर्ण वाहतूक कोलमडून जाते, अशी सध्याची अवस्था होती.

त्यामुळेच हा नाका आणि पुढील रस्ते रुंद करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आणि रहिवाशांनी त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. त्यामुळेच सध्या ५ मीटर रुंद असलेला रस्ता आता या ठिकाणी नऊ मीटर रुंद होत आहे. रस्त्याने बाधित होत असलेल्या घरमालकांना त्यांच्या मालकी हक्काप्रमाणे ‘टीडीआर’सारखा मोबदला महापालिकेकडून दिला जाणार आहे.