News Flash

पक्ष्यांना उष्माघाताचा फटका

उन्हाळ्यात तीव्र उन्हाच्या चटक्यांमुळे उष्माघाताचा फटका प्राणी-पक्ष्यांना नेहमीच बसतो.

गेल्या आठवडय़ातील जखमी पक्ष्यांची नोंद

घोडबंदर परिसरात जखमी पक्ष्यांचे प्रमाण जास्त; अनेक पक्षी रुग्णालयात भरती

गेल्या काही दिवसांत वाढलेल्या तापमानाची झळ पक्ष्यांसाठी घातक ठरत असून उष्माघातामुळे जखमी अवस्थेत सापडणाऱ्या पक्ष्यांमध्ये वाढ झाली आहे. उंचावर उडणाऱ्या पक्ष्यांना उन्हाची तीव्रता अधिक भासत असल्याने कबुतर, घार, घुबड, ससाणे अशा पक्ष्यांचे रुग्णालयात भरती होण्याचे प्रमाण वाढले असल्याचे निदर्शनास येत आहे. घोडबंदर परिसरात जंगलतोडीमुळे उन्हाचा चटका तीव्र बसत असल्याने या परिसरात जखमी अवस्थेत सापडणाऱ्या पक्ष्यांचे प्रमाण जास्त असल्याचे ठाणे सोसायटी फॉर प्रोटेक्शन ऑफ क्रूएल्टी टू अ‍ॅनिमल्स या रुग्णालयाचे निरीक्षण आहे.

उन्हाळ्यात तीव्र उन्हाच्या चटक्यांमुळे उष्माघाताचा फटका प्राणी-पक्ष्यांना नेहमीच बसतो. यंदा तापमानाचा पारा कमालीचा वाढल्याने दुपारच्या वेळी नागरिक रस्त्यावरून फिरणेही टाळतात. तापमानात मोठय़ा प्रमाणात झालेली वाढ पक्ष्यांच्या जीवावर बेतली असून गेल्या काही दिवसांत घोडबंदर, वर्तकनगर, वागळे इस्टेट परिसरात पक्षी जखमी अवस्थेत सापडत आहेत. गेल्या आठवडय़ात उष्माघातामुळे शहराच्या विविध भागांत १८ पक्षी जखमी अवस्थेत ‘वाइल्ड लाईफ वेलफेअर असोसिएशन’ या संस्थेच्या निदर्शनास आले आहेत, तसेच  ठाणे ‘सोसायटी फॉर प्रोटेक्शन ऑफ क्रूएल्टी टू अ‍ॅनिमल्स’ या रुग्णालयात गेल्या आठवडय़ात जखमी अवस्थेतील १७ पक्षी उपचारासाठी प्राणी संस्थांकडून दाखल करण्यात आले आहेत. साधारण ३८ ते ४० अंशापेक्षा जास्त असलेल्या तापमानाचा त्रास पक्ष्यांना होत असतो. दोन दिवसांपूर्वी ४१ अंशापर्यंत तापमान वाढले होते. वाढत्या उष्माघातामुळे पक्ष्यांच्या शरीरातील पाणी कमी होऊन हवेत उडतानाच जमिनीवर कोसळून पक्षी जखमी होण्याचे प्रकार वाढत आहेत. यात पक्ष्यांचे पंख तुटणे, डोक्याला दुखापत होणे या उपचारासाठी पक्ष्यांना रुग्णालयात दाखल करण्यात येत आहेत, अशी माहिती एसपीसीए रुग्णालयाचे संचालक डॉ. सुहास राणे यांनी दिली.

आठवडाभर शहराच्या विविध भागात जनजागृती सुरू असून ठिकठिकाणी पाण्याने भरलेली भांडी प्राणी-पक्ष्यांसाठी ठेवण्यात आले आहेत, असे त्यांनी सांगितले.

गेल्या तीन दिवसांत जखमी अवस्थेत आढळणाऱ्या पक्ष्यांचे प्रमाण वाढले असून त्यात कबुतर आणि घार या पक्ष्यांचे प्रमाण जास्त आहे. प्रत्येक दिवशी किमान तीन ते चार पक्षी उष्माघातामुळे जखमी अवस्थेत सापडत आहेत, असे वाईल्ड लाईफ वेल्फेअर असोसिएशन संस्थेच्या आदित्य पाटील यांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 28, 2018 1:50 am

Web Title: injured birds in ghodbunder area is high due to heat stroke
Next Stories
1 ‘ठाण्याचे आयुक्त हुकूमशहा!’
2 ‘केडीएमटी’चे खासगीकरण अटळ!
3 मुंबईची कूळकथा : नालासोपाऱ्याच्या नोंदी अडीच हजार वर्षांपूर्वीच्या
Just Now!
X