कैद्यांकडून निम्म्या दरात कपडय़ांची धुलाई व इस्त्री; उपक्रमाला ठाणेकरांची पसंती

ठाणे मध्यवर्ती कारागृहामध्ये कैद्यांमार्फत चालविण्यात येणाऱ्या धोबी विभागातील कपडे इस्त्री तसेच धुलाईचे दर बाहेरच्या दुकानांपेक्षा निम्मे ठेवण्यात आले आहेत. या स्वस्त दरामुळे ठाणेकरांनी कपडे इस्त्री तसेच धुलाईसाठी आता कारागृहाचा प्रवास सुरू केला आहे. त्यामुळे कारागृहाच्या धोबी विभागातून मिळणाऱ्या उत्पन्नामध्ये वाढ होऊन कारागृहाला वर्षांकाठी दोन लाखांचे उत्पन्न मिळू लागले आहे. त्याचप्रमाणे सुतार विभागात तयार करण्यात येणाऱ्या आराम खुर्चीलाही विशेष मागणी असून ग्राहकांना आधी नोंदणी करून खुर्ची खरेदी करावी लागत आहे.

विविध स्वरूपाच्या गुन्ह्य़ांमध्ये कारागृहात शिक्षा भोगत असलेल्या कैद्यांमध्ये सुधारणा व्हावी तसेच कारागृहातून शिक्षा भोगून बाहेर पडल्यानंतर कैद्यांना स्वत:च्या पायावर उभे रहाता यावे, या उद्देशातून कारागृहांमध्ये कौशल्य प्रशिक्षण तसेच व्यावसायिक विभाग चालविण्यात येतात. या विभागांच्या माध्यमातून विविध प्रकारचे उत्पादन तयार करून त्याची बाजारपेठेत विक्री करण्यात येते. ठाणे मध्यवर्ती कारागृहामध्ये अशाच प्रकारचे विविध व्यावसायिक विभाग चालविण्यात येत असून त्यामध्ये सुतारकाम, शिवणकाम, धोबीकाम, यंत्रमाग, बेकरी आणि फरसाण विभागाचा समावेश आहे. या विभागांमधून उत्पादित होणाऱ्या वस्तूंची गेल्या काही वर्षांपासून बाजारपेठेत मागणी वाढली आहे. त्याचप्रमाणे धोबी विभागातून कपडे इस्त्री आणि धुलाई करून घेणाऱ्या ग्राहकांची संख्या दिवसेंदिवस वाढू लागली आहे. ठाणे शहरातील विविध भागात असलेल्या दुकानांमध्ये शर्ट आणि पँटच्या इस्त्रीसाठी किमान दहा रुपये घेतले जातात. मात्र, ठाणे मध्यवर्ती कारागृहातील धोबी विभागाकडून याच कामासाठी पाच रुपये आकारले जातात. कपडय़ाची धुलाई असेल तर त्यासाठी आणखी पाच रुपये आकारले जातात. शहरातील दुकानांच्या तुलनेत कारागृहातील इस्त्री तसेच धुलाईचे दर निम्मे आहेत. या स्वस्ताईमुळे ठाणेकरांनी आता कपडे इस्त्री व धुलाईसाठी कारागृहाचा पर्याय निवडण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे धोबी विभागामध्ये दिवसाला शंभरहून अधिक कपडे इस्त्रीला येऊ लागले असून त्यातून कारागृहाला महिन्याकाठी १५ ते १८ हजारांचे उत्पन्न मिळत आहे.

‘कारागृहाबाहेरील प्रवेशद्वारावर ग्राहकांचे कपडे स्वीकारले जातात आणि त्यानंतर कारागृह कर्मचाऱ्यांमार्फत ते कपडे धोबी विभागामध्ये पोहचवले जातात. ठरलेल्या वेळेनुसार संबंधित ग्राहकाला पुन्हा कर्मचाऱ्यांमार्फत कपडे दिले जातात,’ असे ठाणे कारागृहाचे अधीक्षक नितीन वायचळ यांनी सांगितले.

वर्षभरात सव्वा कोटीहून अधिक महसूल

ठाणे मध्यवर्ती कारागृहातील सुतारकाम, शिवणकाम, धोबीकाम, यंत्रमाग, बेकरी आणि फरसाण विभागांमार्फत गेल्या वर्षभरात मोठी आर्थिक उलाढाल झाली आहे. या सर्वच विभागांमधून कारागृहाला तब्बल एक कोटी ३३ लाख रुपयांचा महसूल मिळाला आहे, असेही अधीक्षक वायचळ यांनी सांगितले.