वसई-विरार महापालिकेची निर्मिती; शहरात सहा ठिकाणी उद्याने
सांडपाण्याचा निचरा करणारे नाले ही शहराची गरज असली तरी असे नाले दरुगधीयुक्त असतात. स्थानिक रहिवाशांना त्याचा नेहमीच त्रास होत असतो. वसई-विरार महापालिकेने मात्र अशा नाले आणि पडीक जागेवर कल्पक उद्याने बनवून ही समस्या सोडविली आहे. अशी सहा उद्याने वसईकरांची आकर्षणाची केंद्रे ठरली आहेत.
वसईच्या अंबाडी परिसरात सुसज्ज, अत्याधुनिक आणि आकर्षक अशी सहा उद्याने वसई-विरार महापालिकेतर्फे तयार करण्यात आली आहेत. या उद्यानांमध्ये तरुण व ज्येष्ठ नागरिकांसाठी व्यायाम व योगासने यांची व्यवस्था आहे, तसेच लाफ्टर क्लब आणि बच्चे कंपनीसाठी मौजमजेची साधने आहेत.
परिसरातील सप्तश्री हे उद्यान तयार करण्यापूर्वी येथे घाणीचे साम्राज्य होते. सांडपाण्याचा निचरा व्हावा यासाठी तिथे नाला बांधण्यात आला. या नाल्यावर आकर्षक उद्यान तयार करता येईल हा विचार स्थानिक नगरसेवक वृंदेश पाटील यांच्या मनात आला आणि त्यांनी महापालिकेच्या साहाय्याने तो पूर्णत्वास नेला.
सूर्या गार्डन या उद्यानाची जागा पूर्वी पडीक होती. या ठिकाणी उद्यान तयार करून योगासने करण्यासाठी प्रशस्त जागा तसेच आंबा, चिकू, सीताफळ अशा फळझाडांची लागवड करण्यात आली आहे. किलबिल उद्यानात खुला व्यायाम करता यावा यासाठी साधने आणि लहान मुलांसाठी खेळाची साधने ठेवण्यात आली आहेत. या ठिकाणी जुनी झाडे असून त्यावर पक्ष्यांची घरटी आहेत. या ठिकाणी ज्येष्ठ नागरिकांना स्नायूंचा व्यायाम करता यावा यासाठी व्यवस्था करण्यात आली आहे. विघ्नेश्वर उद्यान येथे एक मंदिर असून मंदिराच्या बाजूलाच सुशोभित उद्यान उभारले. कारंजे व ज्येष्ठांसाठी कट्टा हे विशेष आकर्षण आहे. ‘विरंगुळा कट्टा’ हे उद्यान वसईच्या खाडीकिनारी पडीक जागेवर उभारण्यात आले आहे. येणाऱ्या नागरिकांच्या स्वागतासाठी नमस्कार मुद्रा, शांततेसाठी ध्यानमुद्रा, वेळेची माहिती व्हावी यासाठी सूर्य दिशादर्शक तर हवामान दिशादर्शक या उद्यानात लावण्यात आले आहे.

कामावरून थकून आल्यानंतर रहिवाशांना, घरातील कामे उरकल्यानंतर महिलांना आणि निवृत्त झालेल्या नागरिकांना विसावा आणि आनंद मिळावा यासाठी अशी उद्याने तयार करण्यात आली आहेत. लहान मुले टीव्ही, इंटरनेटच्या गराडय़ात न अडकता या उद्यानामध्ये मौजमजा करत आहेत. ही उद्याने नाल्यावर बनली आहेत यावर विश्वासच बसत नाही.
– सचिन राऊत, स्थानिक रहिवासी.