23 October 2020

News Flash

इमारत दुर्घटनेप्रकरणी चौकशी समिती

सात दिवसांत अहवाल सादर करण्याचे आयुक्तांचे आदेश

सात दिवसांत अहवाल सादर करण्याचे आयुक्तांचे आदेश

ठाणे : भिवंडी शहरातील धामणकर नाका भागात असलेली जिलानी इमारत कोसळल्याप्रकरणी महापालिकेने चौकशी समिती स्थापन केली आहे. अतिरिक्त आयुक्त ओमप्रकाश दिवटे यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती काम करणार असून सात दिवसांत याप्रकरणी सविस्तर अहवाल सादर करण्याचे आदेश आयुक्त डॉ. पंकज आशिया यांनी दिले आहेत.

भिवंडी शहरातील पटेल कम्पाऊंड परिसरात असलेली जिलानी ही ४५ वर्षे जुनी इमारत सोमवारी पहाटेच्या सुमारास कोसळली. या दुर्घटनेमध्ये इमारतीतील २२ जणांचा मृत्यू झाला असून २५ हून अधिक जखमी झाले आहेत. मंगळवारी उशिरापर्यंत या ठिकाणी बचावकार्य सुरूच होते. या प्रकारानंतर खडबडून जागे झालेल्या महापालिका प्रशासनाने या घटनेची चौकशी करण्यासाठी विशेष समिती स्थापन केली आहे. या समितीमध्ये महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त ओमप्रकाश दिवटे, साहाय्यक नगररचनाकार प्रल्हाद होगेपाटील, उपायुक्त दीपक सावंत आणि शहर अभियंता लक्ष्मण गायकवाड यांचा समावेश आहे. या समितीमार्फत इमारत दुर्घटना नेमकी कशामुळे घडली याची सविस्तर चौकशी केली जाणार असून त्याचा अहवाल ७ दिवसांत आयुक्तांना सादर केला जाणार आहे. तसेच भविष्यात शहरामध्ये अशा घटना घडू नये यासाठी विशेष उपाययोजनांची माहितीही अहवालात सादर केली जाणार असल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त ओमप्रकाश दिवटे यांनी दिली. या अहवालामुळे भविष्यात अशा प्रकारे घडणाऱ्या घटना रोखण्यास मदत होणार असल्याचे दिवटे यांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 23, 2020 2:49 am

Web Title: inquiry committee formed for investigation of bhiwandi building collapse zws 70
Next Stories
1 ठाण्यातील ५० टक्के सीसीटीव्ही बंद
2 Coronavirus : करोनाचा कहर सुरूच
3 माणकोली उड्डाणपुलावरून वाहतूक सुरू
Just Now!
X