कल्याण शहरातील घटनेच्या पाश्र्वभूमीवर सर्वच कर्षित वाहनावरील (टोइंग व्हॅन) कर्मचाऱ्यांना दुचाकी उचलण्यापूर्वी उद्घोषणा करण्याचे आदेश ठाणे वाहतूक शाखेच्या पोलीस उपायुक्त डॉ. रश्मी करंदीकर यांनी दिले आहेत. उद्घोषणानंतरच वाहनांवर कारवाई करण्यात यावी तसेच कारवाईपूर्वी घटनास्थळाचे फोटो काढण्यात यावेत, अशा सूचनाही त्यांनी दिल्या आहेत.
कल्याण येथील म्हारळ गावातील मधुकर कासारे यांच्या मृत्यूमुळे वाहतूक पोलिसांच्या कार्यपद्धतीवर चौफेर टीका होऊ लागली असून या पाश्र्वभूमीवर पोलीस उपायुक्त करंदीकर यांनी शुक्रवारी कर्षित वाहन मालक आणि कर्मचाऱ्यांची बैठक घेतली.
ठाण्यातील तीन हातनाका येथील वाहतूक शाखेच्या कार्यालयात ही बैठक पार पडली असून त्या वेळी सहायक पोलीस आयुक्तांसह वरिष्ठ पोलीस निरीक्षक उपस्थित होते. या बैठकीत कर्षित वाहनांकरिता लागू असलेल्या अटी आणि शर्तीचे पालन करण्याच्या सूचना करंदीकर यांनी बैठकीत दिल्या. तसेच शहरातील दुचाकी वाहने उचलण्यापूर्वी कर्षित वाहनांवरील कर्मचाऱ्यांना उद्घोषणा करण्याचे आदेशही त्यांनी दिले आहेत. या संदर्भात पोलीस उपायुक्त करंदीकर यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी या वृत्तास दुजोरा दिला. कुणाचे वाहन असेल तर बाजूला करावे, अशा स्वरूपाची ही उद्घोषणा असणार आहे. तसेच या उद्घोषणानंतरही वाहन बाजूला काढण्यात आले नाही तर त्या वाहनांवर कारवाई केली जाईल. त्याचप्रमाणे कारवाई करण्यापूर्वी घटनास्थळाचे फोटोही काढण्याचे आदेश देण्यात आले आहेत, असेही त्यांनी सांगितले.
तसेच शहरात दुचाकी उचलणाऱ्या कर्षित वाहनांसंबंधी काही तक्रारी असल्यास वाहतूक शाखेकडे थेट तक्रार करावी, असे आवाहन करत तक्रारींच्या आधारे संबंधितांवर कारवाई केली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
ठाणे वाहतूक पोलिसांच्या ताफ्यातील सर्वच कर्षित वाहनांवर सीसी टीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. मधुकर कासारे यांची दुचाकी उचलण्यात आली, त्या वाहनांवर सीसी टीव्ही कॅमेरा होता. त्यामुळे त्या दिवशीच्या घटनेचे सीसी टीव्ही कॅमेऱ्यात चित्रीकरण झाले असून ते महात्मा फुले चौक पोलिसांना तपासाकरिता देण्यात आले आहेत. तसेच या प्रकरणाची सविस्तर चौकशी करण्याचे आदेश कल्याणच्या सहायक पोलीस आयुक्तांना दिले असून या चौकशीत दोषी आढळणाऱ्यांविरोधात कडक कारवाई करण्यात येईल, असे रश्मी करंदीकर यांनी सांगितले. त्याचप्रमाणे उल्हासनगर, भिवंडी आणि अंबरनाथ भागातील कर्षिक वाहनांवर सीसी टीव्ही कॅमेरे बसविल्याचे आढळून आले असून या वाहनांचे काम थांबविण्यात आले आहे, असे त्यांनी सांगितले.