जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानंतर अधिकाऱ्यांची पाहणी

कोळंबी प्रकल्पासाठी डहाणू तालुक्यातील आसनगाव येथे भाडेतत्त्वावर दिलेल्या खाडी क्षेत्रात प्रकल्प सुरू करण्यासाठी ठेकेदाराने कांदळवनाची कत्तल केल्याची घटना घडली होती. ‘लोकसत्ता’ने याबाबत वृत्त प्रसिद्ध केल्यानंतर जिल्हा प्रशासनाने या परिसराची पाहणी करून पंचनामे तयार करण्यात आले आहेत.

आसनगाव येथील सर्वे क्रमांक २१६ खाडी क्षेत्रात कोळंबी प्रकल्पासाठी ५० हेक्टर जमीन मत्स्यविभागाने ठेका पद्धतीने एका कंपनीला दिली आहे. मत्स्यविभाग आयुक्तांनी २०१०मध्ये प्रकल्पाच्या जागेवर असलेली झाडेझुडपे काढण्याचे आदेश देण्यात आले होते. मात्र ठेकेदारांनी काम सुरू करण्याआधी या जागेची मत्स्यविभागाच्या अधिकाऱ्यांनी कोणत्याही प्रकारची पाहणी न करता ठेकेदाराला काम सुरू करण्यास सांगितले. कांदळवनाच्या कत्तलीला मत्स्यविभाग जबाबदार असल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे.

मत्स्यविभाग आयुक्तांनी खारफुटी क्षेत्रातील झाडेझुडपे काढण्यासाठी दिलेल्या आदेशाआधी वनविभाग व महसूल विभागाची कोणत्याही प्रकारची परवानगी घेतली नसल्याचे समोर आले आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानंतर वनविभाग, महसूल विभाग, मत्स्य विभाग, भूमी अभिलेखन, महाराष्ट्र प्रदूषण महामंडळ, स्थानिक पोलिसांच्या समितीने या जागेवर पंचनामे केले असून अहवाल डहाणूच्या तहसीलदारांमार्फत जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात आला.

कारवाईची मागणी

कांदळवन क्षेत्र अबाधित राहावे यासाठी सर्वोच्च न्यायालयाने कायद्यात बदल करून कायदा कठोर केला असतानाही प्रशासनाच्या हलगर्जीमुळे आसनगाव येथील खारफुटीत असलेल्या कांदळवनाची तोड झाल्याने संबंधित ठेकेदार आणि दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थ करत आहेत.

मत्स्य विभाग आयुक्तांनी झाडेझुडपांच्या सफाईचे आदेश दिले होते. या वेळी वनविभागाची परवानगी घेण्यात आली नव्हती, तसेच जानेवारीमध्ये काम सुरू केले, त्या वेळी मत्स्य विभागाकडून जागेची पाहणी केली होती.

– दिनेश पाटील, साहाय्यक आयुक्त, मत्स्य विभाग, पालघर

डहाणूच्या तहसीलदारांच्या आदेशानुसार आसनगाव येथील तोडण्यात आलेल्या कांदळवनाची पुन्हा सर्व प्रशासकीय विभागासमोर पाहणी करून पंचनामे करण्यात आले आहेत. त्यानुसार तहसीलदारांकडे अहवाल सादर करण्यात येईल.

– किरण राठोड, मंडळ अधिकारी, चिंचणी- वाणगाव

आसनगाव येथील कांदळवनाची कत्तल ठेकेदाराने केली आहे. मत्स्य विभागाने कोणत्याही प्रकारची पाहणी न करताच ठेकेदाराला काम सुरू करण्याचे आदेश दिल्याने येथील खाडीचा परिसर धोक्यात आला आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी तातडीने दोषींवर फौजदारी कारवाई करणे गरजेचे आहे. कोलंबी प्रकल्पाला ग्रामस्थांचा विरोध आहे.

– कैलास राऊत, ग्रामस्थ, आसनगाव