31 May 2020

News Flash

रेल्वे स्थानकांतील तपासणी यंत्रे नावापुरती

मध्य रेल्वेच्या ठाणे आणि कल्याण रेल्वे स्थानकांतून दररोज लाखो प्रवासी प्रवास करतात.

 

|| आशीष धनगर

‘बॅग स्कॅनर’मधून सामान तपासणी होत नसल्याचे निष्पन्न :- ठाणे आणि कल्याण रेल्वे स्थानकांत कोटय़वधी रुपये खर्च करून बसविण्यात आलेली अद्ययावत सामान तपासणी यंत्रे फक्त देखाव्यापुरतीच उरली असून या बॅग स्कॅनरमधून दिवसाला एकही बॅग तपासली जात नसल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. स्थानकांवर सामानाची तपासणी होत नसल्याने रेल्वे स्थानकांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे.

मुंबईवर २६/११ चा दहशतवादी हल्ला झाल्यानंतर मध्य रेल्वेच्या अनेक महत्त्वाच्या रेल्वे स्थानकांत रेल्वे प्रशासनातर्फे मेटल डिटेक्टर आणि सामान तपासणी यंत्रे बसविण्यात आली होती. या यंत्रांच्या देखभालीचे काम मध्य रेल्वेच्या सिग्नल आणि टेलिकॉम यंत्रणेकडे देण्यात आले होते, तर आरपीएफ कडून या यंत्रणांचा वापर करण्यात येतो. मध्य रेल्वेच्या ठाणे आणि कल्याण रेल्वे स्थानकांतून दररोज लाखो प्रवासी प्रवास करतात. तसेच या स्थानकांमध्ये लांब पल्ल्याच्या अनेक गाडय़ा सुटतात. त्यामुळे ठाणे आणि कल्याण रेल्वे स्थानकांच्या सुरक्षेसाठी प्रशासनातर्फे अशी अद्ययावत यंत्रे बसविण्यात आली आहेत. असे असले तरी ही यंत्रे केवळ दिखाव्यापुरती मर्यादित असल्याचे चित्र पाहायला मिळत आहेत. ठाणे रेल्वे स्थानकात पूर्वेला दोन सामान तपासणी यंत्रे बसविण्यात आली आहेत. त्यापैकी एक यंत्र हे नादुरुस्त असल्याचे पाहायला मिळत आहे, तर दुसरे यंत्र सुरू असले तरी त्या ठिकाणाहून कोणतेही सामान तपासले जात नाही. ठाणे स्थानकात पश्चिम दिशेकडून येणाऱ्या प्रवाशांची मोठी गर्दी असते. असे असले तरी पश्चिमेला एकही सामान तपासणी यंत्र ठेवण्यात आलेले नाही. कल्याण रेल्वे स्थानकातही अशाच प्रकारची दोन यंत्रे असून त्या ठिकाणी दोन आरपीएफ  तैनात ठेवण्यात आले आहेत.

या यंत्रणांचा वापर होत नसल्याने केवळ देखभाल दुरुस्तीवरच अधिक खर्च होत असल्याचे पाहायला मिळत आहेत. या विनावापर ठेवण्यात आलेल्या यंत्रांमुळे विनाकारण स्थानकावरील जागा अडत असल्याचा आरोपही प्रवाशांकडून करण्यात आला आहे.

मध्य रेल्वेच्या स्थानकातील सर्व सामान तपासणी यंत्रे सुरळीत सुरू आहेत. त्या ठिकाणी जर प्रवाशांचे सामान तपासले जात नसेल तर त्याची माहिती घेण्यात येईल. त्यानुसार पुढील कारवाई करण्यात येईल. – के.के. अशरफ, विभागीय सुरक्षा अधिकारी, मध्य रेल्वे

ठाणे आणि कल्याण रेल्वे स्थानकांत सामान तपासणीसाठी ठेवण्यात आलेल्या यंत्रमध्ये दिवसाला कोणत्याही प्रवाशाचे सामान तपासले जात नाही. तेथे तैनात असलेले आरपीएफ दिवसभर केवळ बसून असतात. – ऋतिक कदम, प्रवासी

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 6, 2019 1:49 am

Web Title: inspection instrument railway station akp 94
Next Stories
1 डोंबिवलीकर गोपेंद्र बोहराची ओमानच्या राष्ट्रीय क्रिकेट संघात निवड
2 जिल्ह्य़ातील २६ हजार हेक्टर भातपीक पाण्यात
3 बावळण दुरुस्ती अधांतरी
Just Now!
X