tvlog03त्यासाठी काहीजण चांगला मार्ग निवडतात तर काहीजण वाईट मार्गाचा अवलंब करतात. पण, झटपट पैसा कमविण्यासाठी स्वीकारलेल्या मार्गाचे दरवाजे नेहमीच तुरुंगाच्या दिशेने जातात. असाच काहीसा प्रकार आंध्रप्रदेश राज्यातून मुंबई शहरालगत असलेल्या भिवंडीत पैसा कमाविण्यासाठी आलेल्या चौघा मित्रांच्या बाबतीत घडला.
हरीश मारपेल्ली, अनिल बल्ला, विनोद कुंदारपू आणि रविकुमार बंडी हे चौघे एकमेकांचे जिवलग मित्र. चौघेही मूळचे आंध्रप्रदेश राज्यातील रहिवासी. अमाप पैसा कमविणे हे त्यांचे स्वप्न होते आणि ते पूर्ण करण्यासाठी त्यांनी भिवंडी गाठली. रवी आणि विनोद हे दोघे चायनीज खाद्यपदार्थ विक्रीचे दुकान चालवायचे तर हरीश आणि अनिल हे दोघे नोकरी करायचे. मात्र, यातून फारसे पैसे मिळत नसल्याने चौघेही निराश होते. यामुळे आपण श्रीमंत कसे होऊ आणि त्यासाठी झटपट पैसा कसा मिळेल, याचा विचार चौघे सतत करत होते. चौघे एकमेकांना भेटायचे तेव्हा त्यांच्यात याविषयी चर्चा व्हायची.
पाच महिन्यांपूर्वी ते भिवंडीतील गायत्रीनगर परिसरात विनोदच्या आजीच्या चहाच्या टपरीजवळ भेटले. नेहमीप्रमाणे त्यांच्यात झटपट पैसे कमविण्यावरून चर्चा सुरू झाली. त्यादिवशी रवीच्या डोक्यात भलतीच कल्पना होती. ती त्याने सर्वासमोर मांडली. एका श्रीमंत व्यक्तीचे अपहरण करायचे आणि त्याच्या सुटकेसाठी खंडणी मागायची. त्यांच्यात सुरुवातीला एकमत झाले नाही पण, त्यानंतर पैशांच्या लालसेपोटी चौघांचे एकमत झाले. सर्व काही ठरले आणि चौघेही सावज शोधू लागले. या शोध मोहिमेत त्यांची नजर गायत्रीनगर भागात राहणाऱ्या राजमुल्ला आलुवाला (४७) यांच्यावर पडली. राजमल्ला आणि त्यांचा भाऊ तिरुपती आलुवाला या दोघांचा भागीदारीमध्ये गायत्री टेक्सटाइल्स नावाचा लुम कारखाना आहे. याशिवाय राजमुल्ला यांचे कामुर्ती कम्पाऊंड भागात गणेश तर गायत्रीनगर रोड परिसरात गजानन नावाचे दोन कारखाने आहेत. राजमुल्ला यांच्या गायत्रीनगर लूम कारखान्याजवळच विनोदच्या आजीची चहाची टपरी आहे. तिथे राजमुल्ला चहा पिण्यासाठी येत असत. यामुळे त्यांची रवी आणि विनोद या दोघांसोबत ओळख होती. यामुळे चौघांनी त्यांचे अपहरण करायचे ठरविले. राजमुल्ला यांना खोणी गाव भागातील तीन गोदामे भाडय़ाने द्यायची होती. याविषयी त्यांनी विनोदला सांगितले होते. त्याचाच आधार घेत चौघांनी त्यांच्या अपहरणाचा कट रचला. ठरल्याप्रमाणे विनोदने फोन करून गोदामे भाडय़ाने घेणारा शेठ आल्याची बातवणी केली. त्यानंतर विनोद आणि रवी दुचाकीवरून त्यांच्या घराजवळ गेले आणि तेथून त्यांना सोबत घेऊन निघाले. विनोदने पद्मानगर येथील नारायण मंचकटला यांचे घर भाडय़ाने घेतले होते. या घरामध्ये त्यांना दोघे घेऊन आले. घरात शिरताच चौघांनी त्यांना पकडले आणि एका खुर्चीवर बसवून त्यांचे हायपाय बांधले. यानंतर त्यांच्याकडे खंडणीची मागणी केली पण, त्यांनी देण्यास नकार दिला. यामुळे चौघांनी त्यांच्या तोंड आणि नाकावरही चिकटपट्टी चिकटवली. चौघांच्या तावडीतून सुटका करण्यासाठी  धडपड करत असतानाच खुर्चीचा एक पाय तुटल्यामुळे ते खाली पडले. या गोंधळामुळे बिथरलेल्या चौघांनी राजमुल्ला यांना मारहाण सुरू केली. त्यातच राजमुल्ला यांचा मृत्यू झाला. एका गोणीमध्ये त्यांचा मृतदेह भरला आणि तो कारमधून टिटवाळा भागातील काळू नदीजवळ नेला. तिथे नदीच्या जुन्या पुलाजवळील वाहत्या पाण्यामध्ये मृतदेह दगडाने बांधून फेकून दिला. या चौघांनी हत्येनंतर त्यांच्या अंगावरील सोन्याचे दागिने काढून घेतले होते. ते दागिने नारपोली येथील एका फायनान्स कंपनीत रवीच्या नावावर गहाण ठेवून त्यांनी ३३ हजार रुपये घेतले. कारखान्यात गेलेले राजमुल्ला रात्री उशिरापर्यंत घरी परतले नव्हते. यामुळे दुसऱ्या दिवशी कुटुंबाने शोधाशोध सुरू केली, पण त्यांचा कुठेच ठावठिकाणा लागला नाही. अखेर त्यांनी शहर भिवंडी शहर पोलीस ठाण्यात बेपत्ता झाल्याची तक्रार दिली.
पोलीस उपायुक्त सुधीर दाभाडे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक एन.टी. रोडे यांच्या पथकाने या तक्रारीच्या अनुषंगाने तपासाला सुरुवात केली. राजमुल्ला यांना मोटारसायकलवरून घेऊन जात असताना त्यांच्या मुलाने पाहिले होते आणि या घटनेनंतर दोघेही फरार झाले होते. तसेच अपहरण झालेल्या दिवशी विनोदचा राजमुल्ला यांच्या मोबाइलवर शेवटचा फोन आला होता. अशी महत्त्वपूर्ण माहिती पोलिसांना मिळाली पण, चौघेही परराज्यात पळून गेले होते. पोलीस निरीक्षक सी.आर. चव्हाण, पोलीस उपनिरीक्षक के. एन. वाघ यांच्या पथकाने त्यांचा शोध घेऊन त्यांना ताब्यात घेतले. तपासामध्ये या चौघांनी गुन्ह्य़ाची कबुली देताच पोलिसांनी त्यांना बेडय़ा ठोकल्या. झटपट पैसा कमाविण्यासाठी चौघांनी वाईट मार्ग स्वीकारला आणि तुरुंगाची हवा खावी लागली.  
नीलेश पानमंद