कल्याण, डोंबिवलीतील रिक्षाचालकांची मनमानी; अंतर नियम पायदळी तुडवून वाहतूक

कल्याण : करोना संसर्ग वाढू लागल्याने कल्याण, डोंबिवलीत एकावेळी केवळ दोनच प्रवाशांची वाहतूक करण्याच्या अटीवर शेअर रिक्षाचे प्रतिप्रवासी भाडे वाढवून २० रुपये करण्यात आले होते. मात्र, गेल्या काही दिवसांपासून रिक्षाचालकांनी दोनऐवजी चार प्रवाशांची वाहतूक करण्यास सुरुवात केली आहे. मात्र, शेअर भाड्यात कपात करण्याऐवजी प्रवाशांकडून २० रुपयेच वसूल करण्यात येत आहेत.

परिवहन विभाग तसेच वाहतूक पोलिसांचे नेहमीप्रमाणे या प्रकारांकडे लक्ष नाही. काही प्रवाशांनी यासंबंधीच्या तक्रारी केल्या आहेत. मात्र, परिवहन अधिकारी या तक्रारींना दाद देत नाहीत असे प्रवाशांचे म्हणणे आहे. करोनाकाळात रिक्षा प्रवासाला परवानगी देताना एका रिक्षेत दोनच प्रवासी असा नियम करण्यात आला. शेअर रिक्षा चालवून आपला उदरनिर्वाह करणाऱ्या चालकांना हे गणित जमेनासे झाले होते. त्यामुळे रिक्षा संघटनांनी पुढाकार घेऊन परिवहन अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. या बैठकीत प्रति प्रवासी दहा रुपयांऐवजी २० रुपये आकारणी करावी, असे सामंजस्याने ठरले. मात्र, रिक्षात एकावेळी दोनपेक्षा अधिक प्रवासी असता कामा नये, असेही ठरवण्यात आले. करोनामुळे अंतर नियमन आवश्यक झाल्याने त्या मोबदल्यात ही भाडेवाढ प्रवासी संघटनांनीही मान्य केली. मात्र, रिक्षाचालकांनी आता याचा गैरफायदा घेण्यास सुरुवात केली आहे.

शहरातील बहुतांश भागात रिक्षाचालक दोनऐवजी चार प्रवासी घेऊन वाहतूक करत आहेत. असे असताना प्रवाशांकडून २० रुपयांची आकारणी सुरूच आहे. करोनामुळे आखण्यात आलेले नियम पाळले जात नाहीत याविषयी प्रवाशांमध्ये नाराजीचा सूर आहेच. शिवाय दर आकारणीदेखील नव्याच दराने सुरू आहे हे अन्यायकारक आहे, अशी प्रतिक्रिया सागर जोशी या प्रवाशाने दिली. चार प्रवासी घेऊन रिक्षाचालक प्रवासी वाहतूक करीत असेल तर त्याने जुन्या भाडेदराप्रमाणे प्रवासी वाहतूक करावी, अशी प्रवाशांची मागणी आहे. जुन्या भाड्या दराने प्रवाशांनी पैसे दिले तर रिक्षाचालक प्रवाशांकडे २० रुपये दराची मागणी करतात. प्रवाशाने तेवढे भाडे दिले नाही तर हुज्जत घालतात. उपनगरी रेल्वे प्रवासी महासंघाच्या उपाध्यक्षा लता अरगडे यांनी हा लूटमारीचा प्रकार असल्याची टीका केली. यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, परिवहनमंत्री अ‍ॅड. अनिल परब यांच्याकडे तक्रार केल्याचे त्यांनी सांगितले.

करोनाकाळात जे भाडे ठरले होते त्याच दराने रिक्षाचालक भाडे आकारत आहे, अशा तक्रारी आल्या आहेत. करोना संसर्गाचे नियम पाळण्यासाठी एका रिक्षेत दोन प्रवासी घेऊन चालकांनी वाहतूक करावी असे शासनाचे आदेश होते. त्यामध्ये वाढीव दर आकारा असे कोठेही नव्हते. अशा प्रकारे कोणी वाढीव प्रवाशी, वाढीव दर कोणी रिक्षाचालक आकारत असेल आणि त्याची तक्रार प्रवाशाने आमच्याकडे केली तर नक्की त्याची दखल घेण्यात येईल. – तानाजी चव्हाण, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, कल्याण

करोनाकाळात रहिवाशांनी शासन, प्रशासनाला सर्व प्रकारचे सहकार्य केले. आता त्या वेळी सुरू करण्यात आलेले रिक्षाचे वाढीव भाडे कमी केले नाही तर प्रवासी जनआंदोलन करतील.  – लता अरगडे, उपनगरी रेल्वे प्रवासी महासंघ

 

कल्याणमध्ये पत्रीपूल, दुर्गाडी पूल, डोंबिवलीत कोपर उड्डाणपूल बंद आहे. रिक्षाचालकांना वळसा घेऊन प्रवाशी वाहतूक करावी लागते. त्यात वाहतूक कोंडीचा फटका रिक्षांना बसतो. जेथे पाच फेऱ्या होणे आवश्यक आहे तेथे दोन प्रवासी फेऱ्या मुश्किलीने होतात. त्यामुळे वाढीव दर कायम ठेवला आहे. पत्रीपूल सुरू झाला की भाड्यात कपात केली जाईल. – प्रकाश पेणकर, अध्यक्ष, कोकण रिक्षा-टॅक्सी महासंघ