गृहअलगीकरणातील रुग्णांना करोना केंद्रात दाखल करण्याचे निर्देश; चार हजार रुग्णांसाठी पुरेशी जागा असल्याचा दावा

ठाणे : जिल्ह्य़ात चार हजारांहून अधिक करोनाबाधित रुग्ण गृहअलगीकरणात उपचार घेत आहेत. राज्य शासनाच्या नव्या निर्देशानुसार या रुग्णांना करोना काळजी केंद्रात दाखल करावे लागणार असल्याने जिल्हा आणि महापालिका प्रशासनाची धावपळ सुरू झाली आहे. शहरी तसेच ग्रामीण भागात यापूर्वी उभारण्यात आलेल्या करोना काळजी केंद्रात पुरेशी जागा उपलब्ध आहे, असा दावा जरी प्रशासनामार्फत केला जात असला तरी इतक्या मोठय़ा प्रमाणावर रुग्णांची देखभाल तसेच त्यांना इतर सुविधा पुरविताना यंत्रणांवरील भार आणखी वाढणार आहे.

पहिल्या लाटेत करोनाची साखळी तोडण्यासाठी करोनाबाधित रुग्णांसह त्यांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींना करोना केंद्रात ठेवले जात होते. काही महिन्यांनंतर केंद्र शासनाने नियमावलीत बदल करत सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांना गृहअलगीकरणात राहण्याचा पर्याय उपलब्ध करून दिला. दुसऱ्या लाटेत अनेकांनी हा पर्याय निवडत घरीच उपचार घेण्यावर भर दिला. अशा रुग्णांची संख्या मोठी होती. सद्य:स्थितीत जिल्ह्य़ात १० हजार ९५३ उपचाराधीन रुग्ण आहेत. त्यापैकी ४ हजार २८ रुग्ण गृहअलगीकरणात आहेत. राज्य शासनाच्या नव्या निर्देशामुळे या रुग्णांना आता करोना केंद्रात दाखल व्हावे लागणार आहे. ठाण्यासह १८ जिल्ह्य़ांतील करोनाबाधितांचे प्रमाण राज्याच्या सरासरीपेक्षा अधिक असल्याने या सर्व जिल्ह्य़ांतील अलगीकरण बंद करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. त्यामुळे गृहअलगीकरणातील रुग्णांना करोना केंद्रात दाखल व्हावे लागणार आहे. ठाणे महापालिका क्षेत्रातील करोना केंद्रामध्ये ८९५ रुग्ण ठेवण्याची क्षमता असून त्या ठिकाणी १३७ रुग्ण उपचार घेत आहेत. तसेच ३६२ रुग्ण गृहअलगीकरणात उपचार घेत आहेत. गेल्या काही दिवसांपासून रुग्णसंख्या कमी होऊ लागली आहे. त्यामुळे सद्य:स्थितीत उपलब्ध असलेली करोना केंद्रे पुरेशी आहेत. रुग्णसंख्या वाढली तर, आणखी कुठे करोना केंद्र उभारता येऊ शकतात का, याचेही नियोजन करण्यात येत आहे, अशी माहिती ठाणे महापालिका उपायुक्त संदीप माळवी यांनी दिली. कल्याण-डोंबिवली, भिवंडी, उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर आणि ठाणे ग्रामीण भागांत यापूर्वी उभारण्यात आलेल्या करोना केंद्रांत गृहअलगीकरणातील रुग्णांसाठी पुरेशी जागा उपलब्ध असल्याचा दावा जिल्हा तसेच पालिका प्रशासनाकडून करण्यात आला आहे.

करोना केंद्रांची सद्य:स्थिती

शहर                       क्षमता  दाखल रुग्ण

ठाणे                       ८९५      १३७

कल्याण-डोंबिवली    २५४९     २२०

भिवंडी                    १३४       ०

अंबरनाथ                  १५०    ३४

बदलापूर                  ५००    ७४

उल्हासनगर             ५५१    २८

ठाणे ग्रामीण            ५४३    १५७

ठाणे जिल्ह्य़ात रुग्णसंख्या कमी होत आहे. शहरी तसेच ग्रामीण भागातील करोना केंद्रात गृहअलगीकरणातील रुग्णांसाठी पुरेशी जागा उपलब्ध असून राज्य शासनाच्या निर्देशानुसार गृहअलगीकरणातील रुग्णांना करोना केंद्रात दाखल करण्यात येईल. तसेच तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर पालिका तसेच ग्रामीण क्षेत्रात आणखी करोना केंद्र कुठे उभी करता येऊ शकतात, यासाठी जागांचा शोध सुरू आहे.

राजेश नार्वेकर, ठाणे जिल्हाधिकारी