विमा काढणा ऱ्या शेतक ऱ्यांच्या संख्येत तिपटीने वाढ

ठाणे : जिल्हा कृषी विभागाने यंदा प्रधानमंत्री पीक विमा योजनेची प्रभावी अंमलबजावणी केल्यामुळे जिल्ह्यातील विमा संरक्षित शेती क्षेत्रात गेल्या वर्षीच्या तुलनेत मोठी वाढ झाली आहे. या योजनेच्या माध्यमातून १३ हजार ७७० हेक्टर क्षेत्र विम्याच्या सरंक्षणाखाली आले आहे. यंदा विमा काढणा ऱ्या शेतक ऱ्यांची संख्या तिपटीने वाढली आहे. अतिवृष्टीमुळे शेतीचे वारंवार होणारे नुकसान लक्षात घेता विमा संरक्षणासाठी शेतकरी पुढे येत आहेत.

ठाणे जिल्ह्यातील शहापूर, मुरबाड, भिवंडी, कल्याण आणि अंबरनाथ या पाच तालुक्यांमध्ये ६५ हजार हेक्टर क्षेत्रांवर शेतीची लागवड केली जाते. जिल्ह्यात अनेकदा अवकाळी पाऊस आणि अतिवृष्टी या नैसर्गिक आपत्तींमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होते. शेतकऱ्यांना होणा ऱ्या नुकसानीची भरपाई मिळावी यासाठी कृषी विभागाकडून जिल्ह्यात प्रधानमंत्री पीक विमा संरक्षण योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येत आहे. जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर हे वेळोवेळी प्रधानमंत्री पीक विमा योजनेबाबत आढावा घेऊन मार्गदर्शन करत आहेत. त्यामुळे मागील वर्षीच्या तुलनेत यंदा पीक वीमा संरक्षण योजनेत सहभागी होणा ऱ्या शेतकऱ्यांची संख्या तिपटीने वाढली आहे. जिल्ह्यात २०१९-२० मध्ये कर्जदार १४ हजार ३८९ आणि बिगर कर्जदार ९४८ अशा एकूण १५ हजार ३३७ शेतकऱ्यांच्या १० हजार ५०९.५० हेक्टर क्षेत्राचा विमा उतरविण्यात आला.  गेल्या वर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील पिकांचे मोठे नुकसान झाले होते. त्यामुळे १३ हजार ७९० शेतकऱ्यांना विम्याचा लाभ मिळाला होता. जिल्ह्याने यंदा ५३ हजार ५७३ कर्जदार शेतकऱ्यांचे १२ हजार ८२३.९९ क्षेत्र तर, २ हजार ५१३ बिगर कर्जदार शेतकऱ्यांचे ९४६.३७ क्षेत्र असे मिळून ३८ हजार ८६ शेतकऱ्यांच्या १३ हजार ७७० हेक्टर क्षेत्राचा विमा उतरवण्यात आला आहे. त्यामुळे मागील वर्षापेक्षा यंदा पीक विमा उतरविलेल्या क्षेत्रात ३ हजार २६०.८६  हेक्टर क्षेत्राची वाढ झाली असल्याची माहिती जिल्हा कृषी अधीक्षक अंकुश माने यांनी दिली.

अांबा उत्पादक शेतक ऱ्यांना दिलासा

गेल्या वर्षी आलेल्या संकटामुळे जिल्ह्यातील १ हजार २९४ आंबा उत्पादक शेतक ऱ्यांचे नुकसान झाले होते. या सर्व शेतकऱ्यांनी पीक विमा उतरवला असल्यामुळे त्यांना चांगलाच फायदा झाला आहे. नुकसान झालेल्या या सर्व शेतकऱ्यांना नुकतेच नुकसान भरपाईचे ६ कोटी रुपये देण्यात आल्याची माहिती जिल्हा कृषी अधीक्षक अंकुश माने यांनी दिली.

करोना काळात विशेष उपाययोजना

करोनाकाळात शेतक ऱ्यांनी पीक विमा उतरवावा यासाठी जिल्हा कृषी विभागाने विशेष प्रयत्न केले. ‘आपले सरकार सेवा केंद्र’ सुट्टीच्या दिवशी सुरू ठेवण्यात आले होते. कर्मचाऱ्यांना घरातून केंद्रावर पोहोचवण्यासाठी ई-पास उपलब्ध करून देण्यात आले होते. तसेच शेतकऱ्यांचा सहभाग वाढविण्यासाठी इफको टोकिओ जनरल इन्शुरन्स कंपनी लि.या पिकविमा कंपनीच्या माध्यमातून प्रचार आणि प्रसिद्धीसाठी ग्रामीण स्तरावर दोन कृषीरथ पाठवण्यात आले. या माध्यमातून मोठ्या प्रमाणात प्रसिद्धी करून शेतकऱ्यांचा पीक विम्यासाठी सहभाग मिळवण्यात आला.