tvlog03‘तुमची महाराष्ट्र सरकारच्या आरोग्य मंत्रालयात दूरध्वनी चालक पदावर निवड करण्यात आली आहे’  आपल्याला सरकारी सेवेचे भविष्य निर्वाह निधी, जीवन विमा इत्यादी सर्व फायदे मिळतील. असे एखादे पत्र आपल्या घरच्या पत्त्यावर स्पीड पोस्ट, रजिस्ट्ररने आले तर तात्काळ सरकारी नोकरी मिळते म्हणून हुरळून जाऊ नका. कारण तुमची फसवणूक करण्यासाठी टाकण्यात आलेला हा फास असू शकतो. कारण अशाच प्रकारे नोकरी मिळून देण्याचे आमिष दाखवून काही भामटय़ांनी डोंबिवलीतील एका तरुणाची तब्बल ३१ हजार रुपयांची फसवणूक केली आहे.
राजेश कणेरे (२५) यांनी बी. कॉम.पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले आहे. ते डोंबिवलीत राहतात. राजेश हे मूळचे कोकणातील राजापूरजवळील कणेरी गावचे रहिवासी आहेत. नोकरीसाठी राजेश अनेक ठिकाणी अर्ज करतात. सेवा योजन कार्यालयात त्यांनी सरकारी नोकरीसाठी नाव नोंदणीही केली आहे. नोकरीसाठी ते विविध कार्यालयांत दूरध्वनी करीत असतात. तीन महिन्यांपूर्वी राजेश यांच्या कोकणातील घरी स्पीड पोस्टाने एक दहा पानांचे बाड असलेले पाकीट आले. पाठवण्यात आलेल्या कागदपत्रांवर तीन सिंहांची राजमुद्रा, पंतप्रधान नरेंद्र मोदींची रंगीत छबी असलेले छायाचित्र, केंद्र, राज्य सरकारची शीर्षक पत्र, एलआयसीची कागदपत्रे जोडण्यात आली होती. या कागदपत्रांमध्ये राजेश कणेरे यांना ‘दूरध्वनी चालक’ म्हणून सरकारी मराठी कॉल सेंटरतर्फे संजीवनी आरोग्य योजनेत नोकरी देण्यात आल्याचे पत्र होते. केंद्र, राज्य सरकारची मान्यता असलेली नोकरी देण्याचे पत्र घरी येताच, राजेशच्या वडिलांनी राजेशला डोंबिवलीत भ्रमणध्वनी करून तुला सरकारी सेवेत दूरध्वनी चालक म्हणून नेमणूक झाल्याची पत्रे आली आहेत अशी माहिती दिली.
सरकारी नोकरी मिळणार म्हणून राजेश खूष होते. या नोकरीत राजेश यांना सर्व शासकीय सेवांचा लाभ मिळणार होता. राजेश सध्या एका खासगी आस्थापनामध्ये नोकरी करतात. केंद्र, राज्य सरकार योजनेतील आस्थापनामध्ये नोकरी मिळणार म्हणून राजेशने तातडीने नेमणूक पत्रात असलेल्या ०९७१७९३०२३६ (पत्ता – २६, एफ, संजीवनी भवन, कोलव्हा बीच रोड, दक्षिण गोवा(४०३०११) येथे संपर्क साधला. त्या भ्रमणध्वनीवर सुनील सक्सेना, प्रिया शर्मा यांनी राजेश यांना अरुण कुमार यांच्या स्टेट बँकेतील खात्यात (क्र. ३४७१९०५६२१८) सुरक्षा अनामत रक्कम १३ हजार ५०० रुपये जमा करण्यास सांगितले. सरकारी सेवेतील नवीन नियम असेल म्हणून राजेश यांनी पहिला हप्ता भरणा केला. त्यानंतर भामटय़ांनी राजेशकडून १७ हजार ७०० रुपये जमा करून घेतले. एकूण ३१ हजार २०० रुपये भरणा करूनही सुनील, प्रिया राजेशला आणखी १६ हजार २०० रुपये भरणा करण्यास सांगत होते. हा सगळा प्रकार सुरू असताना राजेश यांच्या बहिणीचे लग्न होते. लग्नासाठी आर्थिक जुळवाजुळव सुरू होती. आईच्या सोन्याच्या बांगडय़ा विकण्यात आल्या होत्या. कणेरे यांची आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने त्यांनी वाढीव पैसे भरण्यास नकार दिला. ‘मला तुमची नोकरी नको. माझे पैसे मला परत करा,’ असे राजेश यांनी या नोकरी देणाऱ्यांना सांगण्यास सुरुवात केली. सुरुवातीला प्रिया, सुनील यांनी राजेशच्या भ्रमणध्वनीला प्रतिसाद दिला. नोकरी सरकारी आहे. अशा प्रकारे पैसे परत करता येत नाहीत. तुम्ही कामाला सुरुवात करा, असे सांगून राजेशची बोळवण करण्यात येऊ लागली. नंतर राजेशचे भ्रमणध्वनी या दोघांनी काळ्या यादीत टाकले.
आपला भ्रमणध्वनी उचलला जात नाही म्हणून राजेशने नातेवाईकांच्या भ्रमणध्वनीवरून संपर्क केला तर संपर्क तोडला जाऊ लागला. राजेशने बारकाईने नेमणुकीची पत्रे वाचली तेव्हा त्यांना पत्ता गोव्याचा, संपर्क नवी दिल्लीचा असल्याचे लक्षात आले. शीर्षक पत्रावर महाराष्ट्राचा उल्लेख आहे. तेव्हा लपाछपीचा प्रकार पाहून आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर राजेशने ठाण्यातील आर्थिक गुन्हे शाखेत जाऊन तक्रार केली. ही तक्रार आर्थिक गुन्हे विभागाने डोंबिवलीतील विष्णुनगर पोलीस ठाण्यात चौकशीसाठी वर्ग केली आहे. आईचे दागिने विकून पैशांचा भरणा केल्याने कणेरे कुटुंबीय अस्वस्थ आहेत. विष्णुनगर पोलीस या प्रकरणाचा तपास करीत आहेत. अलीकडेच सोलापूर परिसरात तेथील पोलिसांनी अशाच प्रकारची सरकारी नोकरी देतो सांगून फसवणाऱ्या एका टोळीला गजाआड केले आहे. त्यांचा या प्रकरणाशी काही संबंध आहे का याचा पोलीस शोध घेत आहेत.