ठाणे महापालिका निवडणुकीत अन्य पक्षांतून आलेल्या आयारामांना तिकीट दिल्याने नाराज झालेले भाजपचे निष्ठावान कार्यकर्ते आक्रमक झाले असून त्यांनी रविवारी पत्रकार परिषद घेऊन पक्षाच्या तिकीटवाटपामध्ये पारदर्शकता नसल्याचा आरोप केला आहे.विविध प्रभागांमध्ये बंडखोरी करणाऱ्या २० ते २२ उमेदवारांचे अर्ज मागे घ्यायचे की नाही, याबाबत अद्याप कोणताही निर्णय झाला नसून त्यासंबंधीचा अंतिम निर्णय लवकरच जाहीर करू, असेही त्यांनी स्पष्ट केले.  दरम्यान, पक्षहित डोळ्यासमोर ठेवून नाराजांची समजूत काढण्याचे प्रयत्न सुरू असून त्यामध्ये आम्हाला यश येईल, असे भाजपचे आमदार संजय केळकर यांनी स्पष्ट केले.

नाराज  २० ते २२ निष्ठावान कार्यकर्त्यांनी बंडखोरी करीत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. या नाराजांची शनिवारी ठाण्यात एक बैठक पार पडली असून त्यामध्ये ठाण्यातील भाजप नेत्यांच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त करण्यात आली होती. त्यापाठोपाठ रविवारी दुपारी उमेदवारी कापल्याने नाराज झालेले अ‍ॅड. सुभाष काळे, भाजपचे शहर सचिव शशी यादव यांच्यासह नाराजांनी पत्रकार परिषद घेऊन ठाण्यातील पक्षनेत्यांची नावे घेण्याचे टाळत त्यांच्या नेतृत्वावर टीकेचा भडिमार केला.

नाराजांचे राजीनामे

ठाणे शहर सचिव शशी यादव, अ‍ॅड. सुभाष काळे आणि तृप्ती जोशी-पाटील, संदीप तोरे, मनीषा देवरे, वनिता कांबळे, रमेश कांबळे, प्रदीप सिंग या पदाधिकाऱ्यांसह अनेकांनी पदांचे राजीनामे दिले आहेत.पक्षात राहणार असल्याचे अ‍ॅड. काळेंनी स्पष्ट केले.