महापौरांसह १२ पदाधिकाऱ्यांची कार्यालये बंद; आयुक्तांचा कारभार मनमानी असल्याचा आरोप

मीरा-भाईंदर महापालिकेतील सत्ताधारी भाजप आणि प्रशासनाचे प्रमुख असलेले आयुक्त यांच्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेले शीतयुद्ध चव्हाटय़ावर आले आहे. आयुक्त मनमानी कारभार करत असल्याचा आरोप करत महापौरांसह उपमहापौर, स्थायी समिती सभापती आणि इतर पदाधिकाऱ्यांनी आपापली कार्यालये बंद केली आहेत. नागरिकांची कामे आता वैयक्तिक कार्यालयातून केली जातील, असे महापौरांनी जाहीर केले आहे.

आयुक्त आणि सत्ताधारी भाजप यांच्यात गेल्या काही दिवसांपासून सुप्त संघर्ष सुरू आहे. या संघर्षांतून तोडगा काढण्याचा प्रयत्न करण्यात आला होता, मात्र त्याआधीच शुक्रवारी भाजपच्या नगरसेवकाशी संबंधित असलेल्या एका लॉजवर महापालिकेने हातोडा चालवल्याने या संघर्षांचा भडका उडाला. शुक्रवारी महापौरांनी मुख्यालयातील दुसऱ्या मजल्यावरील महापौर दालनाला कुलूप लावले. ‘कार्यालय बंद आहे मात्र जनतेच्या सेवेसाठी उपलब्ध आहे,’ असे स्पष्टपणे या कार्यालयाच्या दरवाजावर लिहिण्यात आले आहे.

महापौरांसह उपमहापौर, स्थायी समिती सभापती, सभागृह नेते, महिला बालकल्याण सभापती आणि उपसभापती तसेच सहा प्रभाग कार्यालयातील सभापती अशी एकंदर १२ कार्यालये शुक्रवारी बंद करण्यात आली. आयुक्त मनमानी कारभार करत असल्याच्या निषेधार्थ दालने बंद करण्यात आली आहेत. मात्र नागरिकांची गैरसोय होऊ नये यासाठी आपण आपल्या वौयक्तिक कार्यालयातून जनतेची कामे सुरू ठेवणार आहोत, असे महापौर डिंपल मेहता यांनी स्पष्ट केले. सर्वच पदाधिकाऱ्यांनी आपली कार्यालये बंद केल्याने महापालिकेत एकदम सामसूम पसरली होती.

..आणि वादाला तोंड फुटले

काही महिन्यांपूर्वी आयुक्तांनी बार आणि लॉजवर सुरू केलेल्या कारवाईदरम्यान त्यांच्यात आणि सत्ताधाऱ्यांमध्ये वादाला तोंड फुटले होते. ही कारवाई आपण सांगू त्याप्रमाणे करावी, असा सत्ताधाऱ्यांचा आग्रह होता. आयुक्तांनी मात्र त्यांनी दिलेल्या प्राथमिकतेनुसार कारवाई सुरू केली होती. त्यावेळीही सत्ताधाऱ्यांनी महापालिकेत न फिरकण्याचा इशारा दिला होता. मात्र प्रत्यक्षात तो अमलात आला नाही, परंतु दोघांमधील शीतयुद्ध सुरूच होते. त्यातच काही प्रभाग अधिकाऱ्यांनी आयुक्त अधिकारी देत नसल्याच्या कारणावरून आपली कार्यालये बंद केली, त्यापाठोपाठ वृक्ष प्राधिकरण समिती तयार होऊनही आयुक्त बैठक नसल्याच्या कारणावरून भाजपच्या समितीमधील १० सदस्यांनी राजीनामा दिला होता.  यावर तोडगा काढल्यानंतर सदस्यांनी आपले राजीनामे मागे घेतले, परंतु तरीही दोन्ही बाजूंमध्ये धुसपुस सुरूच होती.

सामायिक बैठक वाया

दोन्ही बाजूने समेट व्हावा यासाठी दोन दिवसांपूर्वी सामायिक बैठकही झाली. या बैठकीत काही अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप करण्यात आले. बैठकीनंतर हा वाद शमेल, असे वाटत असतानाच शुक्रवारी भाईंदर येथील भाजप नगरसेवकाशी संबंधित  लॉजवर प्रशासनाने कारवाई केली. परिणामी शीतयुद्धाचा भडका उडाला आणि महापौरांसह १२ पदाधिकाऱ्यांनी कार्यालये बंद केली.

शासनाने आखून दिलेल्या नियमांच्या चौकटीत राहूनच प्रशासन चालवण्याचे काम करत आहे आणि नियमांचे पालन करणाऱ्यांना कायमच पाठिंबा देण्यात आला आहे. अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्यासाठी अतिरिक्त आयुक्तांना अधिकार देण्यात आले आहेत. ते त्यानुसार कारवाई करत आहेत. -डॉ. नरेश गीते, आयुक्त, महापालिका