X

सेना नगरसेवकांत शाब्दिक बाचाबाची

कल्याण-डोंबिवली महापालिका सभागृहाबाहेर समर्थकांत संघर्ष

कल्याण-डोंबिवली महापालिका सभागृहाबाहेर समर्थकांत संघर्ष

मोठागाव रेतीबंदर रस्त्याविषयीच्या चर्चेवरून शिवसेनेचे नगरसेवक रमेश म्हात्रे आणि दीपेश म्हात्रे यांच्यात सोमवारी पालिका सभागृहात सर्वसाधारण सभेतच शाब्दिक चकमक झाली. तर याचे वृत्त समजताच सभागृहाबाहेर दोन्ही नगरसेवकांचे समर्थक एकमेकांना भिडल्याचे पाहायला मिळाले. काही समर्थकांनी सभागृहात शिरण्यासाठी पालिकेच्या सुरक्षारक्षकांना धक्काबुक्की केल्याचेही सूत्रांनी सांगितले.

मोठागाव रेतीबंदर येथील रस्त्याच्या मुद्दय़ावरून सेनेचे नगरसेवक रमेश म्हात्रे यांनी सोमवारी पालिकेच्या सर्वसाधारण सभेत प्रश्न विचारले. हा रस्ता रद्द करण्यात आल्याचा संशय व्यक्त करताना यामागे स्वामी नारायण ट्रस्ट आणि बालाजी या विकासकाचे हित साधण्याचा प्रयत्न असल्याचा आरोपही त्यांनी केला. त्यावर सेनेचेच नगरसेवक दीपेश म्हात्रे यांनी हा रस्ता योग्यरीतीने बांधण्यात येत असल्याचे सांगत रमेश म्हात्रे यांचा आरोप खोडून काढला. यावरून दोन्ही नगरसेवकांत शाब्दिक चकमक सुरू असताना दीपेश यांचे बंधू जयेश म्हात्रे यांनी या वादात उडी घेतली. त्यानंतर प्रेक्षागृहात बसलेले रमेश म्हात्रे यांचे खासगी सुरक्षा रक्षकही सभागृहात आले व त्यांनी जयेश व दीपेश यांच्याशी वाद सुरू केला. त्याचवेळी दीपेश म्हात्रे यांचे सुरक्षा रक्षकही सभागृहात शिरण्याचा प्रयत्न करू लागले. यामुळे सभागृहात गोंधळाची स्थिती निर्माण झाली. दोन्ही गट एकमेकांना तुफान घाणेरडय़ा शिवीगाळ करू लागले. सभा सोडून नगरसेवक या दोन्ही गटांना रोखण्याचा प्रयत्न करू लागले. त्यांनाही ते दाद देत नव्हते. सभागृहाबाहेर २० मिनिटे द्वंद्व सुरू होते. तत्काळ बाजारपेठ पोलीस सभागृहाच्या दिशेने आले. त्यांनी रमेश यांच्या समर्थकांना पोलीस ठाण्यात नेले. दीपेशच्या समर्थकांना पालिका आवारातून पिटाळून लावले.

नियमांचे उल्लंघन

पालिका सभागृहात एका नगरसेवकाच्या एका खासगी सुरक्षा रक्षकाला बसण्याचा नियम आहे. पण, पालिका सुरक्षा रक्षक सर्व सुरक्षा रक्षकांना आत सोडतात, अशा तक्रारी आहेत. नगरसेविका खुशबू चौधरी यांनी नगरसेवकांचे सुरक्षा रक्षक पालिकेत कशासाठी पाहिजेत. त्यांना पालिका आवारात प्रवेश प्रतिबंधित करा, अशी मागणी केली. नगरसेवकांनी आपले अग्निशस्त्र सभागृहाबाहेरील सुरक्षा दालनात जमा करणे आवश्यक असते, पण नगरसेवक सुरक्षा रक्षकांना दाद देत नाहीत, असे सांगण्यात येते.