नगरसचिव पालकमंत्र्यांचे सैनिक असल्याची काँग्रेसची टीका

ठाणे महापालिकेतील स्थायी समितीचे नव्याने गठण करताना प्रशासनाने सर्व नियमांना वाकुल्या दाखविल्या असून महापालिकेचे नगरसचिव अशोक बुरपुल्ले हे तर पालकमंत्र्यांचे सैनिक असल्यासारखे काम करतात, अशी टीका गुरुवारी काँग्रेसचे गटनेते विक्रांत चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत केली. महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल एरवी रामशास्त्री प्रभुणे असल्याप्रमाणे न्यायदान करण्यात मश्गूल असतात. असे असताना स्थायी समितीचे गठण करत असताना कोकण आयुक्तांचे आदेश डावलले जात असताना जयस्वाल मौनात का गेले, असा सवालही पक्षाने केला आहे.

ठाणे महापालिकेत तब्बल दीड वर्षांनी स्थायी समितीचे गठण होत असून प्रशासनाने यासंबंधी मांडलेला प्रस्ताव कायद्याला धरून नसल्याचा आक्षेप राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपने यापूर्वीच घेतला आहे. महापालिकेतील संख्याबळानुसार स्थायी समितीत सदस्य नियुक्तीसंबंधी कोकण आयुक्तांनी दिलेले आदेश डावलून समितीचे गठण सुरू आहे, असा विरोधकांचा आक्षेप आहे.

स्थायी समितीत शिवसेनेचे बहुमत व्हावे यासाठी आटापिटा सुरू असून खुद्द पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनीच एप्रिल महिन्यात या प्रस्तावास स्थगिती दिली होती. असे असताना ही स्थगिती उठवून हा प्रस्ताव चुकीच्या पद्धतीने मांडला जात आहे, असा आरोप गुरुवारी काँग्रेस पक्षातर्फे करण्यात आला. महापालिकेच्या अर्थकारणाची सूत्रे चुकीच्या पद्धतीने आपल्या हाती ठेवण्यासाठी शिवसेनेचा आटापिटा सुरू असून प्रशासन त्यास साथ देत आहे, असा आरोपही विक्रांत चव्हाण यांनी केला.

आयुक्तांचे मौन का?

शिवसेनेवर टीका करताना काँग्रेसने महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनाही लक्ष्य केले असून आयुक्त अचानक मौनात का गेले, असा सवाल पक्षाने केला आहे. महापालिकेचे आयुक्त एरवी रामशास्त्री प्रभुणे असल्याप्रमाणे सगळीकडे न्यायदान करत सुटतात. आपणच ठाणेकरांचे कैवारी कसे असा त्यांचा आव असतो. असे असताना आयुक्तांनीच ज्या प्रस्तावाला केराची टोपली दाखवली होती, त्यांच्याच प्रशासनाने हा ठराव पुन्हा कसा मांडला, असा सवाल विक्रांत चव्हाण यांनी केला. पालकमंत्री आणि जयस्वाल यांच्यात नेमका कोणता समझोता झाला की जयस्वाल कर्तव्यापासून पळ काढत आहेत, असा सवालही चव्हाण यांनी केला. महापालिकेतील काही अधिकारी तर शिवसैनिक असल्याप्रमाणे वागत असून सचिव बुरपुल्ले हे तर पालकमंत्र्यांचे खासगी सैनिक असल्याप्रमाणे काम करत आहेत, अशी टीका काँग्रेस पक्षाने केली.