वर्षभरातील ६६८ पैकी ४२८ अपघात अंतर्गत मार्गावर; ठाणे वाहतूक पोलिसांचे सर्वेक्षण

किशोर कोकणे, लोकसत्ता

ठाणे : भरधाव तसेच अवजड वाहनांची वाहतूक यांमुळे महामार्गावर होणाऱ्या अपघातांत बळींचे प्रमाण अधिक असल्याच्या नोंदी असतात. ठाणे वाहतूक पोलिसांनी नुकत्याच केलेल्या एका सर्वेक्षणात मात्र अंतर्गत मार्गही वाहनचालकांसाठी धोकादायक ठरत असल्याचे स्पष्ट झाले आहे. ठाणे ते बदलापूर आणि भिवंडी शहरात वर्षभरात झालेल्या ६६८ अपघातांपैकी ४२८ अपघात हे अंतर्गत मार्गावर झाले आहेत. यामध्ये १०८ जणांना जीव गमवावा लागला आहे. डोंबिवली, अंबरनाथ, कल्याण, भिवंडी येथील अपघातांचे प्रमाणही अधिक आहे.

ठाणे पोलीस आयुक्तालय क्षेत्रात ठाणे ते बदलापूर आणि भिवंडी ही शहरे येतात. या शहरांतून मुंबई-नाशिक आणि मुंबई-आग्रा हे राष्ट्रीय महामार्ग जातात. घोडबंदर, शिळफाटा हे महत्त्वाचे राज्य महामार्ग आहेत. शहरातील वाहतुकीसाठी आणि महामार्गाना जोडण्यासाठी विविध अंतर्गत मार्ग आहेत. या मार्गावरून दररोज हजारो जड-अवजड तसेच हलक्या वाहनांची ये-जा सुरू असते. काही दिवसांपूर्वीच ठाणे वाहतूक पोलिसांनी या शहरांतून जाणाऱ्या राष्ट्रीय, राज्य महामार्ग आणि इतर अंतर्गत रस्त्यांवर होणाऱ्या अपघातांचे सर्वेक्षण केले. २०२० मध्ये झालेल्या ६६८ अपघातांच्या या सर्वेक्षणात सर्वाधिक ४२८ अपघात हे अंतर्गत मार्गावर झाल्याचे आढळून आले. त्यामध्ये १०८ जणांचा मृत्यू झाला आहे. २४७ जण गंभीर जखमी झाले. तर, १४५ जणांना किरकोळ दुखापत झाली. या व्यतिरिक्त राष्ट्रीय महामार्गावर १९४ अपघात झाले. त्यामध्ये ७१ जणांचा मृत्यू झाला. ९७ जण गंभीर आणि ७५ जण किरकोळ जखमी झाले. राज्य महामार्गावर ४६ अपघात झाले असून १३ जणांचा मृत्यू आणि ३४ जण गंभीर जखमी झाले. १४ जणांची नोंद किरकोळ जखमींमध्ये करण्यात आली आहे.

अंतर्गत मार्गावर भरधाव वाहने चालविणे, काही अंतर्गत मार्गावर जड-अवजड वाहनांची वाहतूक तसेच रस्ते खराब असणे यामुळे हे अपघात वाढले असल्याचे वाहतूक शाखेतील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

सर्वाधिक धोक्याचे रस्ते

अंतर्गत मार्गावरील सर्वाधिक धोक्याच्या रस्त्यांमध्ये डोंबिवली येथील टाटा नाका, विको नाका, निसर्ग ढाबा परिसर, काटई नाका, अंबरनाथ येथील जांभूळ फाटा, ऑर्डनन्स फॅक्टरी परिसर, भिवंडीतील राहनाळ गाव, कशेळी पूल, अंजूर फाटा, पिंपळास, धामनकरनाका या रस्त्यांचा समावेश आहे.

अपघातांची संख्या

मार्ग              मृत्यू      गंभीर जखमी   किरकोळ  जखमी

राष्ट्रीय             ७१          ९७                    ७५

राज्य               १३          ३४                     १४

अंतर्गत रस्त    १०८         २४७                   १४५

एकूण               १९२        ३७८                   २३४