‘दत्तधाम वसाहती’मध्ये राहणाऱ्या महिलांनी कुष्ठरोगावर मात करत आज यशस्वी वाटचाल सुरू केली आहे. शालन कोळी आणि यशोदा पितळे या महिलांनी तर समाजाच्या हीन वागणुकीनंतरही संघर्ष करत आपला संसार उभा केला. त्यांचा लढा समाजासाठी प्रेरणादायी आहे.

कुटुंब उभारले

सांगली येथील शालन कोळी (७५) यांना वयाच्या आठव्या वर्षी कुष्ठरोग झाला. घरात आई-वडील, तीन भाऊ  आणि एक बहीण असा परिवार. कुष्ठरोग झाल्याने वडील बाहेर खेळायला जाऊ  देत नव्हते. शाळाही सुटली आणि रुग्णालयानेही ठेवण्यास नकार दिला. मिरज येथे राहणाऱ्या बहिणीने आसरा दिला. त्यानंतर लग्न लावून दिले. त्या वेळी कुष्ठरोग असलेल्या मुलीने कुष्ठरोगी मुलाशीच लग्न करायचे, असे समीकरण होते. मिरज येथे वयाच्या १७ व्या वर्षी लग्न झाल्यानंतर त्या वसईत स्थायिक झाल्या. पती वसईतील पाचूबंदर येथील जेट्टीवर ३ रुपये दिवस अशा पगारावर मोलमजुरी करायचे. दोन मुली आणि एक मुलगा पदरात पडल्यानंतर संपूर्ण लक्ष त्यांच्यावर केंद्रित केले. मुलांना कुष्ठरोग नव्हता, तरी कुष्ठरोग्यांची मुले असल्याने वसईतील शाळेमध्ये त्यांना चांगली वागणूक मिळत नव्हती. त्यामुळे सातवीनंतर मुलांचे शिक्षण बंद करावे लागले, असे सांगताना शालन यांच्यावर चेहऱ्यावर खंत भावना उमटली. आता मात्र त्यांनी नातवंडावाला चांगले शिक्षण देऊन मुख्य प्रवाहात आणले आहे.

कुटुंबाने झिडकारले, पण..

यशोदा सीताराम पितळे (६४) यांना लग्नानंतर कुष्ठरोग झाला. तेव्हा त्यांच्या पदरात ९ महिन्यांची मुलगी आणि साडेचार वर्षांचा मुलगा होता. कुष्ठरोग झाल्यानंतर नवऱ्याने घराच्या बाहेर काढले, तर माझ्या भावाने सरळ एसटीत बसवून पाहिजे तिकडे जाण्यासाठी रास्ता मोकळा केला, असे त्यांनी सांगितले. माझे आणि माझ्या कुटुंबाचे नाते संपुष्टात आले. मुलांना घेऊन जायचे कुठे अशा चिंतेत मी होते. त्यातूनही धीर न सोडता प्रवास करत करत या दत्तधाम वसाहतीत आले. इकडे आल्यावर माळोबा शेळके आणि दत्तू भाऊ  यांनी मला बहीण मानले. वसईत शिक्षण घेणे कठीण असताना मुलगा गुरुनाथ पितळे याला अमरावती येथील सामाजिक संस्थेत शिक्षणासाठी पाठवले. चौथीपर्यंत शिक्षण झाल्यानंतर तो वसईत परतला. वसईत त्याने बोटींच्या कामात मजुरी करायला सुरुवात केली. वसाहतीतील शालन कोळी यांच्या मुलीशी गुरुनाथचे लग्न झाले आणि आज आम्ही येथे एक सुखी कुटुंब म्हणून राहत आहोत.