पोलीस महासंचालकांशी सकारात्मक चर्चा
वाय-फाय शहर होऊ पाहणाऱ्या ठाणे शहरातील नागरिकांना इंटरनेट साक्षर आणि सुरक्षित करण्याच्या दृष्टीने सुरू करण्यात आलेल्या ‘डिजिटल आणि सेफ ठाणे’ हा उपक्रम आता महाराष्ट्रातील वेगवेगळ्या शहरांत पोहोचणार आहे. ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या सहकार्याने सुरू असलेला हा उपक्रम महाराष्ट्र पोलिसांच्या मदतीने संपूर्ण राज्यात राबवण्यात येणार आहे. त्या दृष्टीने डिजिटल आणि सेफ ठाण्याची संकल्पना सुरू करणाऱ्या आहान फाऊंडेशनच्या कार्यकर्त्यांनी नुकतीच महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांची भेट घेऊन या विषयावर विस्तृत चर्चा केली. त्यांनीही या उपक्रमाला सकारात्मक प्रतिसाद दिला असून राज्यात वेगवेगळ्या ठिकाणी भरवण्यात येणाऱ्या सायबर मेळाव्याच्या निमित्ताने आहान फाऊंडेशनचा हा उपक्रम महाराष्ट्रभर राबवला जाणार आहे.
इंटरनेटच्या आगमनामुळे गेल्या दहा वर्षांमध्ये मोठी प्रगती झाली असून अनेक गोष्टी अगदी एका क्लिकवर येऊन ठेपल्या आहेत. या प्रणालीच्या सदुपयोगाप्रमाणेच अनेक दुरुपयोगही वाढू लागले आहेत. गुन्ह्यांसाठी याचा मोठा वापर होऊ लागल्याने सायबर सेलसारख्या यंत्रणेची निर्मिती करण्याची वेळ पोलीस प्रशासनावर आली आहे. इंटरनेटचा अतिरेकी वापर आणि अज्ञान यामुळे सामान्य नागरिकांचा गैरफायदा घेऊन त्यांची फसवणूक करणारेही मोठय़ा प्रमाणात वाढल्याने जनजागृती आणि इंटरनेट साक्षरतेची गरज भासू लागली आहे.
लाखो ठाणेकरांना फायदा
ठाणे शहरातील आहान फाऊंडेशनच्या माध्यमातून गेल्या पाच वर्षांपासून या विषयावर काम केले जात असून त्यातून नवनवे उपक्रम हाती घेण्यात आले आहेत. त्यापैकी डिजिटल आणि सुरक्षित ठाणे हा उपक्रम गेल्या दोन वर्षांपासून सुरू असून ठाणे पोलिसांच्या मदतीने हा उपक्रम लाखो ठाणेकरांपर्यंत पोहोचला आहे. या माध्यमातून वाय-फाय शहर होऊ पाहणाऱ्या ठाण्याच्या सुमारे २० हजारांहून अधिक सार्वजनिक भागातील वाय-फायच्या सुरक्षेचा आढावा घेण्यात आला आहे. इंटरनेटच्या क्षेत्रात इतक्या सक्षमपणे काम करणारी ही एकमेव संस्था असून या संस्थेचा विस्तार ठाणे शहराबाहेर जाण्याची गरज होती. ही गरज ओळखून ‘आहान फाऊंडेशन’ने महाराष्ट्र पोलिसांच्या मदतीने विस्तार करण्याचे ठरवले. त्यातूनच नुकतीच दीक्षित यांची भेट घेण्यात आली असून त्यांना ही संकल्पना समजावून सांगण्यात आली आहे.
महाराष्ट्र पोलीसही या प्रकारच्या कामांमध्ये जनजागृती करण्यास उत्सुक असल्याने या उपक्रमास त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. महाराष्ट्र पोलिसांच्या सायबर सेल विभागाकडून राज्यातील विविध शहरांमध्ये सायबर मेळावे घेतले जाणार असून सायबर सुरक्षिततेचे धडे दिले जाणार आहेत.
जनजागृती, साक्षरता आणि सुरक्षितता..
या संकल्पनेवर आधारित हा उपक्रम असला तरी महाराष्ट्रातील विविध भागांतील समविचारी व्यक्तींना या निमित्ताने जोडता येणे शक्य होणार आहे. आहान फाऊंडेशनप्रमाणे काम करणाऱ्या अत्यंत मोजक्या संस्था राज्यात आहेत. मात्र त्यांना एकत्र घेऊन त्यापैकी काहींना प्रशिक्षित करून हा उपक्रम अधिक विस्तृतपणे राबवण्यात येणार आहे.आता काम करण्याचा उत्साह वाढला असल्याचे, आहान फाऊंडेशनचे कार्यकर्ते उन्मेश जोशी यांनी सांगितले.