कल्याण शहराच्या अनेक भागांतील दूरध्वनी, इंटरनेट सेवा गेल्या महिन्यापासून बंद आहेत. वारंवार तक्रारी करूनही भारत संचार निगमचे कर्मचारी त्याची दखल घेत नाहीत, अशा तक्रारी नागरिकांकडून करण्यात येत आहेत. खडकपाडा, आधारवाडी, श्री कॉम्प्लेक्स परिसर भागातील रहिवासी दूरध्वनी, इंटरनेट सेवा सतत ठप्प होत असल्याने त्रस्त आहेत. काळा तलाव येथील बीएसएनएल कार्यालयात तक्रार करण्यासाठी दूरध्वनी केला की तक्रार विभागाचा दूरध्वनी कर्मचाऱ्यांकडून वेळेत उचलला जात नाही. उचलला तरी उडवाउडवीची उत्तरे दिली जातात, अशा तक्रारी ग्राहकांकडून केल्या जात आहेत. काळा तलाव येथील कार्यालयात जाऊन तक्रार करण्याचा प्रयत्न केला तरी कार्यालयीन वेळेत तेथे कर्मचारी उपलब्ध नसतो. अनेक वेळा तक्रार करण्यासाठी गेलेले ग्राहक दूरध्वनी उचलून कर्मचारी अजून आले नाहीत, अशी उत्तरे देतात, असेही या नागरिकांनी सांगितले. कधी दूरध्वनी, इंटरनेट सेवा सुरू झाली की ती चार ते पाच दिवसांत पुन्हा बंद पडते. अलीकडे सगळे व्यवहार, देवाणघेवाण इंटरनेट, दूरध्वनीच्या माध्यमातून होत आहे. असे असताना बीएसएनएल मात्र ग्राहकांच्या तक्रारींकडून दुर्लक्ष करून ग्राहकांना अन्य खासगी सेवांकडे वळवण्यात भाग पाडत आहे, अशा नागरिकांच्या तक्रारी आहेत.

तात्काळ समस्या सोडवतो
पावसामुळे काही ठिकाणी वाहिन्या खराब होत आहेत. काही ठिकाणी खोदकाम सुरू आहेत. रस्त्यांवर खड्डे आहेत. त्यामुळे काही ठिकाणी वाहिन्या खराब झाल्या असतील. ग्राहकांच्या तक्रारी येतात त्याप्रमाणे त्या प्राधान्याने सोडवण्यात येत आहेत. आधारवाडी येथे समस्या असेल तर तात्काळ आपण ती सोडवतो.
-एल. एस. रोपिया,
वरिष्ठ महाव्यवस्थापक ,
भारत संचार निगम, कल्याण</strong>