News Flash

आठवडय़ाची मुलाखत : लोकसहभागामुळे वनांना पुन्हा बहर!

१९९२ मध्ये जंगलांचे रक्षण करण्यासाठी वन कायदा अमलात आणला गेला.

 

सुनील लिमये मुख्य वनसंरक्षक, ठाणे वन विभाग

ठाणे जिल्ह्य़ातील शहापूर, मुरबाड भागात स्थापन झालेल्या संयुक्त वन व्यवस्थापन समित्यांनी चांगल्या प्रकारे जंगल राखले आहे. मुरबाड तालुक्यात स्थानिकांच्या सहभागाने वन विभागाने राखलेल्या जंगलांमुळे मोर, ससे आदी प्राणी नव्याने आढळून आले आहेत. मुंबई आणि ठाणे शहरांच्या परिघात बोकाळलेल्या काँक्रीटच्या जंगलांत आता खरीखुरी वनसंपदा किती उरली आहे? नव्याने हिरवे पट्टे निर्माण करण्यासाठी वन विभाग कोणते प्रयत्न करीत आहे? त्यांना कितपत यश मिळत आहे? या आणि अशा काही प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्यासाठी ठाणे वन विभागाचे मुख्य वनसंरक्षक सुनील लिमये यांच्याशी साधलेला संवाद.

ठाणे वनक्षेत्र किती आहे?

ठाणे, रायगड, शहापूर, पालघर, मुंबई, मुंबई उपनगर असा परिसर ठाणे वनक्षेत्रात येतो. ठाणे आणि शहापूर, मुंबई आणि मुंबई उपनगर अशा काही विभागांमध्ये त्याचे वर्गीकरण करण्यात आले आहे. ठाणे वनहद्दीत ठाणे आणि शहापूर, रायगड वनहद्दीत अलिबाग आणि रोहा तसेच पालघर वनहद्दीत डहाणू आणि जव्हार असे विभाग करण्यात आले आहेत. ठाणे, शहापूर आणि जव्हार या वनहद्दीच्या परिसरात आदिवासींची वस्ती आहे. ठाणे जिल्ह्य़ाचे वनक्षेत्र म्हणजेच ठाणे आणि शहापूर एक हजार ५२६ चौरस किलोमीटर एवढे आहे. साठ चौरस किलोमीटर क्षेत्र मुंबई, मुंबई उपनगर परिसरातील वनासाठी आहे. पाच हजार चौरस किलोमीटर हे पाच जिल्ह्य़ांतील वनक्षेत्र आहे. या वनक्षेत्रात तीन प्रकारचे जंगल आहे. कदापर्णी म्हणजे वृक्षांचे जंगल, माथेरानसारखे निमसदाहरित जंगल आणि कांदळवनांचे जंगल अशा प्रकारची जंगले ठाणे वन विभागात आहेत.

वनसंपदा वाढवण्यासाठी वन विभागाकडून काय प्रयत्न केले जातात?

१९९२ मध्ये जंगलांचे रक्षण करण्यासाठी वन कायदा अमलात आणला गेला. जंगल वाचवायचे असल्यास जंगलाच्या जवळपास राहणाऱ्या नागरिकांना एकत्र घेऊन उपक्रम व्हायला हवेत असे ठरवण्यात आले. त्यानुसार १९९२ पासून संयुक्त वन व्यवस्थापन समिती अस्तित्वात आहे. जंगलापासून तीन किलोमीटर अंतरावर राहत असणाऱ्या नागरिकांची संयुक्त वन व्यवस्थापन समिती तयार करण्यात येते. त्यात लोकांना एकत्रित करून वन विभाग आणि नागरिकांच्या सहभागाने एकत्रितरीत्या जंगलाचे रक्षण करण्यात येते. ठाणे आणि शहापूर वनहद्दीत ८५० गावे आहेत. त्यापैकी ४२३ गावांमधील सहभाग या संयुक्त वन व्यवस्थापन समितीमध्ये आहे. संयुक्त वन व्यवस्थापन समितीच्या मार्फत दहा वर्षांचा आराखडा शासनातर्फे तयार करण्यात येतो. त्यानुसार जंगलांचे रक्षण गावातील नागरिक आणि वन विभाग यांच्या मार्फत केले जाते. जाळरेषा काढणे, वृक्ष लागवडीसाठी खड्डे खोदणे अशी कामे या समितीच्या मार्फत केली जातात. या समितीच्या अंतर्गत मुरबाडमधील दहा गावे निवडण्यात आली आहेत. फळझाडे लावणे, बांबूची लागवड कशी करायची याचे प्रशिक्षण वन विभागातर्फे गावकऱ्यांना देण्यात येते. ‘हरित सेना’ प्रकल्पाच्या माध्यमातून वन विभागातर्फे आयोजित केल्या जाणाऱ्या उपक्रमांची माहिती नागरिकांना त्वरित कळत असल्याने नागरिकांचा सहभाग वाढतो. मुरबाड, टोकावडेमधील बांगवाडी, दिवाणपाडा, झिलवाडी, दुर्गापूर, भेरेवाडी, शिसेवाडी, बनाची वाडी, खरपटवाडी, पेजवाडी, विघानगर या ठिकाणी नागरिकांना प्रशिक्षण दिले जाते. वनयुक्त शिवारच्या अंतर्गत पाण्याच्या ठिकाणी वृक्ष लागवड करणे, विहिरीतील पाण्यात वाढ होण्यासाठी प्रयत्न करणे यांसारखे उपक्रम राबवण्यात येतात.

गेल्या वर्षी केलेल्या वृक्ष लागवडीचे यश किती?

२०१६ मध्ये ठाणे वनवृत्तात तेरा लाख त्रेसष्ट हजार रोपे लावली होती. या वृक्ष लागवडीपैकी ९२ टक्के वृक्ष अस्तित्वात असल्याचे निदर्शनास येत आहे. म्हणजेच त्यापैकी बारा लाख पासष्ट हजार वृक्ष जिवंत असल्याची नोंद वन विभागाकडे आहे. वनहद्दीत अधिकाधिक वृक्ष लागवड संयुक्त पद्धतीने होण्यासाठी नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानशी वन विभाग संलग्न आहे. त्यानुसार वृक्ष लागवड करण्याचे विचाराधीन आहे.

वणव्यांसाठी काय उपाययोजना आहेत?

पावसाळ्यात मुबलक पाऊस पडण्यासाठी पावसाच्या आधी काही ग्रामस्थ जंगलातील सुके गवत जाळतात. मात्र ग्रामस्थांचा हा गैरसमज आहे. आग संरक्षित योजना (फायर प्रोटेक्शन प्लॅन) च्या अंतर्गत वणवे जागृती कार्यक्रम राबवले जातात. वणवे प्रतिबंधात्मक उपायांसाठी हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधल्यास वन विभागाचे अधिकारी त्वरित संबंधित ठिकाणी जाऊन वणवे विझवण्याचे काम करतात.

कोणते इको सेन्सिटिव्ह झोन आहेत?

संजय गांधी राष्ट्रीय उद्यान आणि तुंगारेश्वरचे जंगल इको सेन्सिटिव्ह झोन म्हणून जाहीर करण्यात आले आहेत. वनक्षेत्रात रासायनिक कंपनी उभारण्यात येऊ नये, यासाठी वन विभागातर्फे पाळत ठेवण्यात येते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 2, 2017 1:47 am

Web Title: interview of sunil limaye chief conservator
Next Stories
1 कचरा वेगळा न केल्यास पाणी बंद
2 शहरबात : फेरीवाला समस्येचे उग्र स्वरुप
3 चर्चेतील चर्च : धर्मगुरूंच्या अथक परिश्रमाचे फळ
Just Now!
X