अतिरेकी हल्ल्याच्या पाश्र्वभूमीवर ठाणे महापालिका सरसावली
न्यायालयाच्या आदेशानंतरही शहरातील उड्डाणपुलाखालील मोकळ्या जागांवर लहान-मोठी वाहने उभी करून नियमांना हरताळ फासणाऱ्यांना आता पायबंद बसण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. फ्रान्समधील अतिरेकी हल्ल्याच्या पाश्र्वभूमीवर ठाणे महापालिकेने उड्डाणपुलाखालील मोकळ्या जागा तातडीने ताब्यात घेऊन तेथील सुशोभीकरणाचा मार्ग प्रशस्त करण्याच्या जोरदार हालचाली सुरू केल्या आहेत. विशेष म्हणजे रेल्वे स्थानक परिसरातील सॅटिस उड्डाणपुलाखालील परिसरातही तातडीने सुशोभीकरण योजना राबविण्याचे आदेश आयुक्त संजीव जयस्वाल यांनी दिले असून, यामुळे या ठिकाणी होणारे बेकायदा पाìकग तसेच फेरीवाल्यांना पायबंद बसू शकेल, असा दावा केला जात आहे.
ठाणे शहराला भेदून जाणाऱ्या पूर्व द्रुतगती महामार्गावर राज्य सरकारने जागोजागी उड्डाणपूल उभारले आहेत. यापैकी तीन हात नाका आणि कॅडबरी जंक्शन परिसरातील उड्डाणपुलाखाली मोठय़ा प्रमाणावर वाहने उभी केली जात असल्याचे दिसून आले आहे. ठाणे शहर वाहतूक पोलिसांकडून या वाहनांवर वेळोवेळी कारवाई केली जाते. तरीही उड्डाणपुलाखाली वाहने उभी करण्याचे प्रकार अद्याप थांबलेले नाहीत. सार्वजनिक बांधकाम विभाग तसेच मुंबई महानगर विकास प्राधिकरणामार्फत उभारण्यात आलेल्या या उड्डाणपुलाखाली वाहने उभी केली जाऊ नयेत, असे स्पष्ट निर्देश न्यायालयांनीही यापूर्वी दिले आहेत. मध्यंतरी मुंबई महानगर विकास प्राधिकरणाने यासंबंधी ठाणे महापालिकेस पत्रव्यवहार केला होता. हे लक्षात घेऊन ठाणे महापालिकेने उड्डाणपुलाखालील मोकळ्या जागांच्या सुशोभीकरणाची योजना आखली आहे.
उड्डाणपुलाखालील मोकळ्या जागा संबंधित प्राधिकरणाने महापालिकेकडे हस्तांतरित कराव्यात, अशास्वरूपाचे पत्र महापालिकेने सार्वजनिक बांधकाम विभाग तसेच मुंबई महानगर विकास प्राधिकरणाकडे यापूर्वीच पाठविले आहे, अशी माहिती ठाणे महापालिकेचे जनसंपर्क अधिकारी संदीप माळवी यांनी ठाणे लोकसत्ताला दिली. येत्या काळात ही प्रक्रिया अधिक वेगाने सुरू होईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
पॅरिस हल्ल्याच्या पाश्र्वभूमीवर हालचालींना वेग
फ्रान्स येथे झालेल्या अतिरेकी हल्ल्याच्या पाश्र्वभूमीवर उड्डाणपुलाखाली सुरू असलेल्या वाहनतळास पायबंद बसावा यासाठी सुशोभीकरण योजनेला वेग देण्यात आला आहे, अशी माहिती महापालिकेतील वरिष्ठ सूत्रांनी दिली. यासंबंधी ठाणे वाहतूक पोलिसांसोबत येत्या काळात बैठक घेऊन पुढील योजना आखली जाईल, असेही सूत्रांनी स्पष्ट केले. ठाणे रेल्वे स्थानक परिसरातील सॅटिससह शहरातील एकाही मोठय़ा उड्डाणपुलाखाली वाहने उभी राहू नयेत यासाठी परिसराचे सुशोभीकरण करण्याची योजना यापूर्वीच आखण्यात आली आहे. यासंबंधीच्या एकत्रित प्रस्तावास सर्वसाधारण सभेची मंजुरी मिळाली आहे. सॅटिसचा परिसर महापालिकेच्या अखत्यारित येत असल्याने सुशोभीकरणाचा प्रकल्प त्याठिकाणी तातडीने सुरू केला जाईल, असेही सूत्रांना स्पष्ट केले.