News Flash

एका फसवणुकीचा खुनापर्यंतचा प्रवास

अंबरनाथ गावात २१ जुलैच्या दुपारी एक खळबळजनक वार्ता पसरली आणि गावात साऱ्यांनाच ते ऐकून धक्का बसला होता.

| August 19, 2015 12:47 pm

तपासचक्र
अंबरनाथ गावात २१ जुलैच्या दुपारी एक खळबळजनक वार्ता पसरली आणि गावात साऱ्यांनाच ते ऐकून धक्का बसला होता. त्या दिवशी दुपारचे दीड वाजून गेले होते. अंबरनाथ गावातीलच ५८ वर्षांचे परशुराम पाटील अत्यंत विमनस्क मन:स्थितीत अंबरनाथ पूर्वेच्या शिवाजीनगर पोलीस स्थानकात पोलिसांपुढे बसले होते. पाटील पोलिसात त्यांच्या मुलाच्या मृत्यूबाबतची फिर्याद देण्यासाठी गेले होते. त्यांचा मुलगा अखिलेश पाटील परमेश्वर चाळीजवळ अंबरनाथ पूर्वेला स्वत:च्याच एका बांधकाम कामाच्या ठिकाणी रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. त्याचा जागीच मृत्यू झाला होता.
अंबरनाथ पूर्वेच्या शिवाजी नगर पोलीस स्थानकात याबाबत हत्येच्या गुन्ह्याची नोंद केल्यानंतर अंबरनाथ पोलिसांची तपासचक्रे वेगाने फिरू लागली. या गुन्ह्य़ाच्या शोधासाठी पोलिसांनी दहा कर्मचाऱ्यांचे तपास पथक स्थापन केले. प्रथमदर्शनी अखिलेश पाटील याच्यावर चॉपरने वार केल्याचे आढळून आले होते. अशा प्रकारे निर्घृण हत्या झाल्याने मृत अखिलेशचे राजकीय, घरगुती वाद असतील अशी शंका येऊन पोलिसांनी या दृष्टिकोनातूनच तपासाला सुरुवात केली. त्यामुळे प्राथमिक तपासात पोलिसांनी ७४ साक्षीदारांची तपासणी केली. नेमके गुन्हा घडताना तेथे उपस्थित असलेल्या दोन साक्षीदारांच्या सांगण्यावरून पोलिसांनी मारेकऱ्यांचे स्केच तयार करून घेतले. या स्केचमुळे पोलिसांच्या हाताला प्रथमच काही धागेदोरे लागले. यात दोन मारेकरी होते हे पोलिसांना कळले. तसेच गुन्हा घडल्यानंतर आजूबाजूच्या पोलीस स्थानकातील फरार गुन्हेगार व मिसिंग रजिस्टरही पोलिसांनी तपासण्यास सुरुवात केली. त्यात पोलिसांना अखिलेशच्या कुटुंबीयांनी सांगितल्याप्रमाणे अखिलेश कामावर जाताना त्याची पांढऱ्या रंगाची अॅक्टिव्हा घेऊन गेला होता. मात्र ही अॅक्टिव्हा गुन्हा घडल्याच्या ठिकाणी सापडलीच नव्हती. ही दुचाकी नवी मुंबईतील तळोजा औद्योगिक क्षेत्रातील दीपक फर्टिलायझर या कंपनीजवळच्या झुडपात आढळली. लागलीच पोलिसांनी या रस्त्याकडे जाणारे सर्व रस्त्यांचे सीसी टीव्ही चित्रीकरण तपासले. तसेच अंबरनाथ व कल्याण, कर्जत रेल्वे स्थानकांवरील सीसी टीव्ही चित्रीकरणही तपासले. यात कर्जत रेल्वे स्थानकावर दोन व्यक्ती संशयितरीत्या फिरत असल्याचे पोलिसांना आढळले. या व्यक्तींची शहानिशा पोलिसांनी प्रत्यक्ष साक्षीदाराकरवी केली. यातील एक व्यक्ती अंबरनाथ गावातीलच असल्याचे पोलिसांना यातून कळाले. त्यांनी गावात चौकशी केली असता, सागर पाटील नावाचा तरुण हा २० जुलैपासून मित्र व नातेवाईकांना न कळवता निघून गेल्याचे कळले आणि पोलिसांची संशयाची सुई सागर पाटीलकडे वळली. त्याच्या मोबाइल क्रमांकावरून त्याचा पोलिसांनी शोध घेत त्याला ताब्यात घेतले. सागरकडे पोलिसांनी चौकशी केल्यावर त्याने या गुन्हय़ाची कबुली दिली.
अखिलेश व सागर हे दोघे एकमेकांचे चुलत भाऊ असून दोघेही छोटय़ा-मोठय़ा चाळींचे बांधकामाचा व्यवसाय करत होते. अखिलेश हा रिअल इस्टेटचाही व्यवसाय करत असल्याने सागरने त्याचे एक दोन खोल्यांचे घर अखिलेशला विकण्यास सांगितले होते. अखिलेशने हे घर एक परप्रांतीय ४ लाखास घेण्यास तयार असून यावर याची किंमत देण्यास कोणीच तयार नसल्याचे सांगितले. त्यानुसार अखिलेशच्या सांगण्यावरून सागरने हे घर त्या परप्रांतीयाला विकून टाकले. मात्र सागरला नंतर कळल्याप्रमाणे अखिलेशने हे घर त्या परप्रांतीयाला १४ लाखांना विकले असून १० लाख स्वत:कडेच ठेवले आहेत. याबाबत सागरने अखिलेशला विचारले असता अखिलेशने सागरला शिवीगाळ करून दम दिला. पुढेही एका घराचे बांधकाम अखिलेशने सागरकडून करून घेतले. मात्र हिशोबात १ लाख रुपयांचा घोळ केला. याबाबतही सागरने अखिलेशला विचारले असता त्याने पुन्हा सागरला शिवीगाळ करत दम दिला. तसेच पुढे येथील दुर्गापाडा, गायकवाड पाडय़ातील कामे अखिलेश एकटाच करत असल्याने सागरला कामे मिळत नव्हती. सागरला यामुळे नेहमीच पैशांची चणचण भासत होती. अखेर सागरने वैफल्यग्रस्त अवस्थेत १९ जुलैला अंबरनाथ पूर्वेला राहणाऱ्या आपल्या सलमान खान या मित्रासह अखिलेश पाटीलच्या खुनाचा कट रचला. त्यानुसार सागर व सलमान २० जुलैला सोलापूर जिल्ह्य़ातल्या हैद्रा येथील दग्र्यास जाण्यास निघाले. सागरने त्याच्या शानू या मित्राला दग्र्याला येण्यासाठी सांगितले. कल्याण स्थानकावर त्यांनी दुपारी ३.३० ला सोलापूरला जाण्याचे रेल्वे तिकीट काढले व ४ वाजता ते कोणार्क एक्स्प्रेसमध्ये कल्याण रेल्वे स्थानकाहून बसले. मात्र प्रवासात सागर याने त्याचा मोबाइल फोन शानू याच्याकडे दिला व मी आणि सलमान मागून येतो तू पुढे हो असे सांगितले व सागर व सलमान हे कर्जतला उतरले. तेथून त्यांनी थेट ६०० रुपये रिक्षाला देऊन अंबरनाथचे सागरचे घर गाठले. दुसऱ्या दिवशी दुपारी १२.३०च्या सुमारास अखिलेश त्याच्या बांधकामाच्या ठिकाणी निघाला असता या दोघांनीही त्याचा पाठलाग केला. तो बांधकामाच्या ठिकाणाहून निघाल्यावर त्याला रस्त्यातच या दोघांनी अडवले आणि सागरने चॉपरने थेट त्याच्या गळ्यावर व छातीवर आणि सलमानने त्याच्या पोटावर वार केले. अखिलेशला तिथेच रक्ताच्या थारोळ्यात सोडून त्याची पांढरी अॅक्टिव्हा घेऊन नवी मुंबईतील तळोजा औद्योगिक क्षेत्राकडे पळून गेले. तेथेच ती दुचाकी टाकून कर्जतला पोहचले. कर्जतवरून त्यांनी सोलापूरची गाडी पकडत हैद्रा हा दर्गा गाठला आणि तेथून २७ जुलैला कल्याणला परतले होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 19, 2015 12:47 pm

Web Title: investigation story
Next Stories
1 टीएमटी कर्मचाऱ्यांच्या थकबाकीचा निर्णय आठ दिवसांत
2 एपिलेप्सी रुग्णांना ‘उत्तेजन’
3 सार्वजनिक गणेशोत्सवात नागरिकांचे हाल
Just Now!
X