24 February 2021

News Flash

ठाण्यात आयपीएल सराव?

दादोजी कोंडदेव स्टेडियममध्ये सरावाकरिता बंगळूरुसह ३ संघांकडून विचारणा

दादोजी कोंडदेव स्टेडियममध्ये खेळपट्टी आणि अन्य कामे करण्यात येत आहेत. (छायाचित्र : सचिन देशमाने)

|| नीलेश पानमंद

दादोजी कोंडदेव स्टेडियममध्ये सरावाकरिता बंगळूरुसह ३ संघांकडून विचारणा

ठाण्यातील दादोजी कोंडदेव स्टेडियमवर रणजी क्रिकेटचे नियमित सामने भरण्यास अद्याप अवकाश असला, तरी यंदाच्या मोसमात ठाणेकरांना या मैदानात आयपीएलच्या संघातील खेळाडू सराव करताना पाहता येऊ शकतील. भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीचा संघ असलेल्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूसह तीन आयपीएल संघांनी या मैदानात सराव करण्यासाठी ठाणे महापालिकेकडे विचारणा केली आहे.

एक रणजी सामना वगळता अन्य कोणतीही प्रतिष्ठेची क्रीडास्पर्धा अद्याप न झाल्यामुळे दादोजी कोंडदेव स्टेडियम ठाणे महापालिकेसाठी पांढरा हत्ती ठरले आहे. ही ओळख पुसण्यासाठी महापालिका प्रशासनाने गेल्या काही वर्षांपासून प्रयत्न सुरू केले होते. यातूनच दोन वर्षांपूर्वी महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी क्रीडाप्रेक्षागृहासंबंधीचा एक प्रस्ताव तयार केला होता. त्यामध्ये रणजी सामने खेळविण्यासाठी आवश्यक असलेली खेळपट्टी आणि मैदान विकसित करण्याचा निर्णय घेतला होता. हा निर्णय प्रत्यक्षात उतरविण्याची जबाबदारी त्यांनी महापालिकेच्या संघातून क्रिकेट खेळणारे शिवसेनेचे नगरसेवक विकास रेपाळे यांच्यावर सोपविली होती. त्यांनी मुंबई क्रिकेट असोसिएशनचे सदस्य नदीम मेमन यांच्या मदतीने क्रीडा प्रेक्षागृहात आंतरराष्ट्रीय दर्जाची खेळपट्टी आणि मैदान विकसित केले. १ ते ३ फेब्रुवारीदरम्यान मैदानात सेलिब्रेटी लीगचे सामने खेळविले जाणार असून त्यानंतर रणजी सामने खेळविण्यासाठी प्रयत्न केला जाणार आहे.

यंदाच्या आयपीएलच्या मौसमातील सामने मुंबईतही होणार आहेत. या सामन्यांकरिता येणारे पाहुणे संघ खेळाडूंच्या सरावासाठी मैदानाच्या शोधात आहेत. बंगळूरु संघाच्या व्यवस्थापनाला कोंडदेव स्टेडियम पसंत पडले असून या संघाचा कर्णधार विराट कोहलीनेही त्याला अनुकूलता दर्शवली आहे.  त्याच्या व्यवस्थापकाने दोन दिवसांपूर्वी यासंदर्भात प्रेक्षागृह प्रशासनाशी संपर्क साधला. क्रीडा अधिकारी मीनल पालांडे यांनीही या वृत्तास दुजोरा दिला. आयपीएलचे आणखी दोन संघ येथे सरावासाठी इच्छुक असल्याचे त्यांनी सांगितले.

मैदानाचा कायापालट

  • दादोजी कोंडदेव स्टेडियममधील क्रिकेट मैदानासाठी ७० मीटर परिघाची सीमारेषा आखण्यात आली आहे. ते मुंबईतील वानखेडे स्टेडियमपेक्षाही मोठे असल्याचा दावा क्रीडा प्रशासनाने केला आहे.
  • मैदानात ऑस्ट्रेलियातील बरमुडा गवताचे रोपण करण्यात आले आहे. मैदानात पाण्याची फवारणी करण्यासाठी आधी दहा माळी काम करत होते. मात्र, आता मैदानात ७२ भूमिगत फवारे बसविण्यात आले आहेत. पाण्याचा शिडकावा करायचा असेल तेव्हा ते जमिनीतून आपोआप वरती येतात. त्यामुळे पाण्याचाही अपव्यय टळतो.
  • एक मुख्य खेळपट्टी व सरावासाठी तीन खेळपट्टय़ा तयार करण्यात आल्या आहेत. मुख्य खेळपट्टीजवळ तिसऱ्या पंचांसाठी कॅमेरे बसविण्यात आले आहेत.
  • डिजिटल स्कोअर बोर्ड उभारणीचे काम शिल्लक आहे, अशी माहिती स्टेडियम प्रशासनाने दिली.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 29, 2019 1:13 am

Web Title: ipl practice in thane
Next Stories
1 बदलापुरातही ‘मेट्रो’ संघर्ष
2 पालघरमध्ये घरात शिरला बिबट्या
3 ठाणे : शिवसेनेच्या ‘त्या’ नेत्याच्या पत्नीची जेलमध्ये आत्महत्या?
Just Now!
X