ठाण्यातील एका शासकीय वसाहतीमधील एका बंगल्यात पोलीस उपायुक्तपदाच्या अधिकाऱ्याने प्रेमसंबंधातून आयएएस दर्जाच्या महिला अधिकाऱ्यास मारहाण केल्याची आणि या महिला अधिकाऱ्याच्या सुरक्षारक्षकाने त्या पोलीस अधिकाऱ्यास बेदम चोप दिल्याची चर्चा मंगळवारी दिवसभर शहरात होत होती. तसेच ही घटना एका बडय़ा शासकीय अधिकाऱ्याच्या घरात घडल्याने तिन्ही अधिकाऱ्यांची बदनामी होऊ नये म्हणून ठाणे पोलीस दलातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने हे प्रकरण मिटविल्याचीही चर्चा सुरू होती.

या घटनेत मारहाण झालेला पोलीस उपायुक्त ठाणे पोलीस दलात कार्यरत असून तो आयपीएस दर्जाचा अधिकारी आहे. काही दिवसांपूर्वीच त्याचा घटस्फोटही झाला आहे. तसेच राज्यातील एका जिल्ह्य़ात अधीक्षकपदावर कार्यरत असताना त्याचे एका आयएएस दर्जाच्या महिला अधिकाऱ्यासोबत सूत जुळले. त्यानंतर या अधिकाऱ्याची ठाणे पोलीस दलात बदली झाली. त्यामुळे तिनेही नवी मुंबईतील एका विभागात बदली करून घेतली. दरम्यान, काही दिवसांसाठी मूळ गावी जात असल्याचे सांगून ती महिला अधिकारी ठाण्यातील शासकीय अधिकाऱ्याच्या बंगल्यात त्याच्या कुटुंबासोबत राहत होती. त्यामुळे संतापलेला पोलीस अधिकारी त्या बंगल्यात पोहोचला आणि त्यांच्यात शाब्दिक बाचाबाची झाली. त्यानंतर त्याने तिला मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यामुळे तिच्या सुरक्षारक्षकांनी त्याला बेदम मारहाण केल्याचे सूत्रांनी सांगितले.