प्रत्येक रहिवाशाने यापुढे भूजल पातळी वाढविण्यासाठी आपल्या परीने प्रयत्न करायला हवेत हा संदेश देण्यासाठी भारत विकास परिषदेच्या डोंबिवली शाखेने शहराच्या विविध भागांत शोष खड्डे तयार करण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. पाऊस सुरू होण्यापूर्वी डोंबिवलीतील मैदाने, उद्याने, शाळांची आवारे, मंदिर परिसर, वसाहती, बंगल्यांच्या परिसरात किमान दोनशे ते तीनशे शोष खड्डे तयार करण्याचा निर्णय परिषदेच्या कार्यकर्त्यांनी घेतला आहे.
केवळ पाऊस व धरणातील पाणीसाठय़ावर यापुढील काळात अवलंबून प्रत्येकाची तहान भागणार नाही. त्यामुळे या व्यवस्थेला पर्याय म्हणून प्रत्येक रहिवाशाने जमिनीतील पाणीसाठा वाढेल या दृष्टीने प्रयत्न करणे आवश्यक आहे. यासाठी पाऊल उचलले पाहिजे हा संदेश प्रत्येक रहिवाशापर्यंत पोहोचला पाहिजे. त्यामुळे परिषदेने नेहरू मैदान येथे पाच बाय पाच फूट आकाराचे शोष खड्डे तयार करण्याच्या कामाचा शुभारंभ केला आहे. एका खड्डय़ाच्या माध्यमातून किमान ५० हजार लिटर पाणी जमिनीत मुरेल हे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून शहराच्या विविध भागांत हे खड्डे तयार करण्यात येत आहेत, असे परिषदेचे कार्यकर्ते माधव जोशी यांनी सांगितले.
नेहरू मैदान येथे ज्येष्ठ समाजसेवक अप्पा जोशी यांच्या हस्ते शोष खड्डा खोदण्यात आला. या वेळी आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात आमदार रवींद्र चव्हाण, नगरसेवक संदीप पुराणिक, खुशबू चौधरी, सुलभा डोंगरे, अच्युत क ऱ्हाडकर, दीपाली काळे, जयंत फाळके, दीपक नामजोशी, प्रवीण दुधे, राजीव प्रभुणे, विनोद करंदीकर, राजू वडनेरकर, माधव जोशी सहभागी झाले होते. पावसाचे पाणी मुरण्याची प्रक्रिया शास्त्रोक्त पद्धतीने व्हावी म्हणून या खड्डय़ांमध्ये रेती, विटा, खडी यांचे मिश्रण टाकण्यात येणार आहे. प्रत्येक रहिवाशाने कर्तव्य म्हणून व येणाऱ्या काळातील पाणी टंचाईची समस्या विचारात घेऊन आपल्या परिसरात शोष खड्डे खोदावेत, असे आवाहन माधव जोशी यांनी केले आहे.