उल्हास, बारवी नदीतून लाखो लिटर पाण्याचा बेकायदा उपसा करणाऱ्या रिसॉर्टकडे पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष

सागर नरेकर, बदलापूर

ठाणे जिल्ह्य़ातील जलस्रोतांमधील पाण्याचे येत्या जूनपर्यंत व्यवस्थित नियोजन करता यावे, याकरिता विविध शहरांत आठवडय़ाला ३० तासांपर्यंत पाणीकपात करण्यात येत असताना उल्हास नदी आणि बारवी नदीपात्रातून लाखो लिटर पाण्याचा बेकायदा उपसा सुरू आहे. कर्जत, नेरळ, बदलापूर, वांगणी परिसरात उभ्या राहिलेल्या रिसॉर्ट आणि शेतघरांच्या मालकांनी नदीपात्रात पंप बसवून बेकायदा पाणीउपसा चालवला आहे. त्यामुळे एकीकडे सर्वसामान्यांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागत असताना धनाढय़ांच्या शेतघरांना मात्र मुबलक पाणीपुरवठा होत आहे.

ठाणे जिल्ह्य़ातील शहरांना बारवी धरण आणि उल्हास नदीच्या पात्रातून पाणीपुरवठा करण्यात येतो. गेल्यावर्षी पावसाने ऑगस्टनंतर पाठ फिरवल्याने या दोन्ही जलस्रोतांत वर्षभर पुरेल इतका जलसंचय होऊ शकलेला नाही. त्यामुळे नोव्हेंबर महिन्यापासूनच विविध शहरांत आठवडय़ातून २४ तास पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येत आहे. ही कपात करूनही पाण्याची तूट १५ टक्के राहिल्याने पाणीकपात ३० तासांवर नेण्यात आली आहे. अंबरनाथ, बदलापूर या शहरांत तर दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात येणार आहे.

कर्जतपासून प्रवास करत येणाऱ्या उल्हास नदीवर कर्जत, नेरळ, वांगणी, बदलापूर या भागात अनेक रिसॉर्ट आणि शेतघरे गेल्या काही वर्षांत उभे राहिले आहेत. बाराही महिने या रिसॉर्ट आणि शेतघरांमध्ये पर्यटकांची गर्दी असते. पाण्यावरचे विविध खेळ, तरणतलाव, कृत्रिम धबधबे चालवण्यासाठी हे रिसॉर्ट आणि फार्महाऊ स मालक थेट उल्हास नदीत मोटारीच्या साहाय्याने पाणी उपसा करतात. यावर कोणतेही नियंत्रण, निरीक्षण किंवा निर्बंध नाहीत. त्यामुळे नदीपात्रात आणखीच घट येते आहे.

यंत्रणा आणि मनुष्यबळच नाही

पाटबंधारे विभागाच्या अखत्यारीत येणाऱ्या या जलसाठय़ांवर लक्ष ठेवण्यासाठी पाटबंधारे विभागाकडे यंत्रणाच नसल्याची बाब समोर येते आहे. अंबरनाथ विभागात अवघे दोन अधिकारी असून मोठे क्षेत्र त्यांच्याकडे आहे. तर अशाप्रकारे पाणी चोरी होत असल्याची बाब पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांकडून मान्य केली जाते आहे. शेतघरांच्या सिंचनासाठी फार्महाऊ स मालक परवानगी घेतात. मात्र व्यावसायिक वापर करून पाणी उचलत असल्याचे पाटबंधारे विभागाचे अभियंते खासगीत मान्य करतात. त्यामुळे यावर कारवाईची मागणी आता होते आहे