पाणी उपशावरून पाटबंधारे विभागाची शिवसेना पदाधिकाऱ्यांना तंबी ; नियोजन करण्याची सूचना
पाटबंधारे विभागाने आखलेल्या नव्या वेळापत्रकामुळे कल्याण-डोंबिवली शहरात गेल्या तीन दिवसांपासून पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाल्याची ओरड एकीकडे सुरू असतानाच पाटबंधारे विभागाने मात्र या टंचाईला स्थानिक स्वराज्य संस्थांचा बेशिस्त कारभार जबाबदार असल्याचे सणसणीत प्रतिउत्तर दिले आहे. नव्या वेळापत्रकामुळे पाणीटंचाई निर्माण झाल्याची ओरड करत कल्याण-डोंबिवलीचे महापौर राजेंद्र देवळेकर यांच्यासह शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी गुरुवारी पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरण्याचा प्रयत्न केला खरा, मात्र ‘पाण्याचे असेच नियोजन केलेत तर मे महिन्याच्या अखेरीस १० एमएलडी इतके पाणीही तुमच्या वाटय़ाला येणार नाही’, असे उत्तर पाटबंधारे विभागाकडून मिळताच या पदाधिकाऱ्यांची बोलतीच बंद झाली. वाट्टेल तसे पाणी उपसायचे आणि योग्य नियोजन करायचे नाही, असे प्रकार सुरू राहिल्यास त्यास जबाबदार महापालिका राहील, असा इशाराही पाटबंधारे विभागाने दिला आहे.
जून-जुलैच्या मध्यांतरापर्यंत धरणांमधील पाण्याचा साठा पुरावा यासाठी पाटबंधारे विभागाने पाणीपुरवठय़ाचे नवे वेळापत्रक जाहीर केले असले तरी फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्याच आठवडय़ात ते बिघडल्याचे स्पष्ट झाले. कल्याण-डोंबिवली महापालिकेसारख्या स्थानिक स्वराज्य संस्था पाणीपुरवठय़ाचे वेळापत्रक योग्य प्रकारे अमलात आणत नसल्याने ही परिस्थिती निर्माण झाली आहे. हे असेच सुरू राहिल्यास १५ मेपर्यंतच पाणीपुरवठा करता येईल हे लक्षात ठेवा, त्यानंतर गंभीर परिस्थिती निर्माण होईल असा इशारा लघु पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता सुभाष वाघमारे यांनी दिल्याने या बैठकीस उपस्थित असलेले शिवसेनेचे पदाधिकारी आवाक झाले.
कल्याण-डोंबिवलीतील काही भाग तसेच महापालिकेत समाविष्ट झालेल्या गावांमध्ये गेल्या आठवडाभरापासून पाण्याची तीव्र अशी टंचाई निर्माण झाली आहे. शनिवार, रविवार असे दोन्ही दिवस पाणीपुरवठा बंद राहिला. कल्याण पूर्व, ग्रामीण भागात सोमवारपासून पाणीच आले नाही. या पाश्र्वभूमीवर महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने एका तातडीच्या बैठकीचे आयोजन केले होते. यावेळी लघु पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता वाघमारे, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे अधीक्षक अभियंता सुभाष तुपे, कार्यकारी अभियंता शंकर जगताप, महापौर राजेंद्र देवळेकर, खासदार श्रीकांत शिंदे यांच्यासह अन्य लोकप्रतिनिधी उपस्थित होते.
शनिवार-रविवार पाणीपुरवठा बंद ठेवण्यात आला होता. त्यानंतर सर्वच स्थानिक स्वराज्य संस्थांनी पाण्याचा जोरदार उपसा सुरू केला. त्यामुळे कल्याण, डोंबिवलीतील काही भाग तसेच ग्रामीण भागात पाणीपुरवठा होऊ शकला नाही. महापौर देवळेकर यांनी यावेळी सलग दोन दिवस पाणी कपातीचा निर्णय योग्य नसल्याचे सांगितले. परंतु स्थानिक स्वराज्य संस्था योग्य प्रकारे पाण्याचे वेळापत्रक पाळत नसल्याचे पाठबंधारे विभागाकडून सांगण्यात आले.
स्थानिक संस्था वेळापत्रक योग्य प्रकारे पाळत नसतील तर त्यांच्या जलवाहिन्या सील करण्यात याव्यात अशी मागणी गटनेते रमेश जाधव यांनी केली. यावर कठोर कारवाई करू, परंतु सर्वच संस्था जादा पाणी उचलतात त्यात कल्याण-डोंबिवलीचाही समावेश आहे असे सांगून पाटबंधारे विभागाने शिवसेना पदाधिकाऱ्यांना सणसणीत टोला दिला. महापौरांनी विषय सावरत आम्ही जादा पाणी उचलत असू तर आमचाही पाणीपुरवठा बंद करा असे सांगितले.
एकाच दिवशी पाणी उपसा
याविषयी सुभाष वाघमारे यांना विचारले असता ते म्हणाले, अधिकारी तेथे पहाणी करण्यासाठी गेले आहेत. पहाणी झाल्यानंतर पाण्याची नक्की काय परिस्थिती आहे हे लक्षात येईल. एकाच दिवशी सर्व संस्था पाणी उचलत असल्याने पाण्याची पातळी खाली गेली आहे. म्हणून पूर्वीप्रमाणेच पाणीपुरवठा करण्यात यावा याविषयी वरिष्ठांशी चर्चा करण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.