काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी सरकारच्या काळातील सिंचन घोटाळ्याप्रकरणी सरकारी अधिकारी आणि कंत्राटदार यांच्याविरुद्ध सोमवारी आणखी एक गुन्हा ठाण्यातील कोपरी पोलीस ठाण्यात लाचलुचप प्रतिबंधक विभागाने दाखल केला. ठाणे जिल्ह्यातील मुरबाड येथील काळू प्रकल्पामध्ये गैरव्यवहार झाल्याचे प्रथमदर्शनी निष्पन्न झाल्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राज्य सरकारनेच या प्रकरणी चौकशी करण्याचे आदेश दिले होते.
एफ. ए. एंटरप्रायझेसचे निसार खत्री आणि इतर भागीदार तसेच सरकारी अधिकारी गिरीश बाबर, बाबासाहेब पाटील, सतीश वडगावे, जयवंत कासार आणि हरिदास टोणपे यांच्याविरुद्ध भारतीय दंडविधान संहितेतील विविध कलमांच्या आधारे गुन्हा दाखल करण्यात आला.
मुरबाडला काळू नदीवर धरण बांधण्याचा निर्णय जलसंपदा विभागाने घेतल्यानंतर कोकण पाटबंधारे विकास महामंडळाने धरणाच्या बांधकामासाठी २००९ मध्ये निविदा मागवल्या होत्या. एकूण ४ कंत्राटदारांनी या निविदा प्रक्रियेमध्ये भाग घेतल्याचे दाखविण्यात आले. त्यात एफ. ए. एंटरप्रायजेस कंपनीला कामाचा ठेका देण्यात आला. ही निविदा प्रक्रिया स्पर्धात्मकरित्या झाली हे दाखविण्यासाठी एफ. ए. एंटरप्रायजेसचे निसार खत्री यांनी इतर बनावट कंपन्यांच्या नावाने निविदा प्रक्रियेत भाग घेतला, असा आरोप ठेवण्यात आला आहे. गुन्हेगारी कृत्य, गुन्हेगारी कट रचून सरकारची फसवणूक केली. तसेच संबंधित प्रकल्पावर काम करणाऱ्या अधिकाऱ्यांनी या बाबीकडे हेतुपूर्वक दुर्लक्ष केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे.