वसई-विरार महापालिकेचा निर्णय; दाट वस्तीतील रुग्णांची केंद्रात रवानगी

वसई : सौम्य लक्षणे असलेल्या करोनाबाधित रुग्णांना आता घरातच अलगीकरण करण्यास वसई-विरार पालिकेने परवानगी दिली आहे. त्यामुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. जर घरात स्वतंत्र खोली असेल तरच ही परवानगी मिळणार आहे.

करोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असली तर त्यात सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांचे प्रमाण अधिक आहे. सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांना पालिकेच्या अलगीकरण केंद्रात ठेवले जात होते. त्यामुळे रुग्णांची मोठी गैरसोय होत होती. अनेक रुग्णांच्या घरात लहान मुले असल्याने त्यांची मोठी पंचाईत होत होती.

मुंबई महापालिका क्षेत्रामध्ये करोना चाचणी होकारात्मकअसलेल्या रुग्णांना घरीच राहण्याची मुभा होती. मात्र वसई विरार महापालिकेने केवळ करोना रुग्णांच्या कुटुंबीयांनाच घरात राहण्याची परवानगी दिली होती. सध्या शहरातील वाढते रुग्ण आणि विलगीकरण कक्षातील जागा अपुरी पडत असल्याने सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांना घरीच राहण्याची परवानगी दिलेली आहे. जर घरात पुरेशी जागा असेल तरच राहता येणार आहे.

याबाबत माहिती देताना पालिकेचे मुख्य आरोग्य अधिकारी डॉ. तब्बस्सुम काझी यांनी सांगितले की, ज्यांच्या घरात स्वतंत्र खोली आहे किंवा पुरेशी जागा आहे, अशा सौम्य लक्षणे असलेल्या बाधित रुग्णांना आम्ही घरात राहण्याची परवानगी दिली आहे. त्यासाठी आरोग्य अधिकारी तपासणी करतील. मात्र संबंधित रुग्णांनी अन्य कोणाच्या संपर्कात येऊ नये, घर निर्जंतुकीकरण करण्यात यावे. या रुग्णांना औषधे दिली जातील.

सध्या सर्वाधिक रुग्ण हे दाटीवाटीत असलेल्या चाळ परिसरातील आहेत. तेथील नागरिक सार्वजनिक शौचालयांचा वापर करतात. त्यामुळे तेथील रुग्णांना घरात ठेवता येणार नाही. अशा रुग्णांना विरारच्या विवा महाविद्यालय, म्हाडा कॉलनी आणि वसईच्या संत गोन्सालो गार्सिया महाविद्यालयातील अलगीकरण केंद्रात ठेवण्यात येत आहे.

सौम्य लक्षणे असलेल्या करोनाबाधित रुग्णांना घरातच अलगीकरणात राहण्याची परवानगी देण्यात आली आहे. ज्यांना तीव्र लक्षणे आहेत आणि उपचारांची गरज आहे अशा रुग्णांना मात्र आम्ही रुग्णालयात उपचार करीत आहोत.

– गंगाथरन डी., आयुक्त, वसई-विरार महापालिका

परदेशातून आलेल्यांसाठी पंचतारांकित सुविधा

वसई : परदेशातून परतलेल्या नागरिकांचे अलगीकरण करण्यासाठी वसईतील रॉयल गार्डन, सुवी पॅलेस, रुद्र शेलटर ही तारांकित हॉटेल निश्चित करण्यात आली आहेत. यातील सुवी पॅलेस येथे अलगीकरणात असलेल्या काहींना करोना संसर्ग झाल्याने हॉटेलमधील कर्मचारी गावाकडे निघून गेल्याने ते बंद असल्याचे पालघर नोडल अधिकारी संदीप कळंबे यांनी सांगितले.

वसई, विरारसह पालघर जिल्ह्य़ातील अनेक भारतीय नागरिक परदेशात अडकून पडले होते. हळूहळू हे नागरिक परतू लागले आहेत. परदेशातून परतलेल्या नागरिकांना अलगीकरण करण्याची सुविधा पालघर जिल्हा प्रशासनाने रुद्र हॉटेल, रॉयल गार्डन यासह विवा महाविद्यालय येथे केली असल्याची माहिती पालघर जिल्हा प्रशासनाने दिली आहे. या नागरिकांवर लक्ष ठेवण्यासाठी व त्यांना सोयी सुविधा पुरविण्यासाठी प्रशासनाने पथक स्थापन केले आहे.

या प्रवाशांची दैनिक आरोग्य तपासणी करणे, संशयित प्रवाशांची वैद्यकीय अधिकाऱ्यांमार्फत तपासणी करणे, मान्यताप्राप्त प्रयोगशाळेतून नमुने तपासणे, त्यांचा अहवालाच्या माहितीनुसार प्रमाणपत्र देणे आदी कामे केली जात आहेत. प्रवाशांची गैरसोय होणार नाही, याकडे लक्ष देण्याच्या  सूचना केल्या असल्याचे संदीप कळंब यांनी सांगितले.

माफक दरात सुविधा

परदेशातून येणाऱ्या नागरिकांना अलगीकरणासाठी माफक दरात सुविधा उपलब्ध करून दिली जाते. या नागरिकांच्या सोयीसाठी तारांकित हॉटेलची निवड करण्यात आली आहे. साधारणपणे या हॉटेलमधील रूम भाडे ३ ते साडेतीन हजार इतके आहेत. तर चहा, नाश्ता व जेवण यासाठी ४५० ते ५०० रुपये घेतात. परंतु या हॉटेल मालक व मॅनेजर यांची चर्चा करून साधारण प्रतिदिन २ हजार १०० रुपयांमध्ये रूम व चहा नाश्ता तसेच जेवणासाठी ३०० रुपये आकारले जात आहेत. ही सुविधा माफक दरात उपलब्ध करून दिली आहे. तर ज्या परदेशी नागरिकांची आर्थिक स्थिती बिकट आहे त्यांच्यासाठी विवा महाविद्यालयात राहण्याची उत्तम सुविधा केली आहे.