भागशाळा मैदान, डोंबिवली (प.)

Victim education
सामूहिक बलात्कारामुळे शिक्षण सुटले, न्यायालय म्हणाले…
Project of Dutt Factory
कोल्हापूर : दत्त कारखान्याच्या क्षारपड जमीन सुधारणा पथदर्शी प्रकल्पावर शासनाकडून शिक्कामोर्तब; नापीक जमिनीवर पिकांची हिरवाई फुलली
Pune pubs
पुण्यात आता मध्यरात्री दीडपर्यंत ‘चिअर्स’… पब, मद्यालयांबाबत पोलीस आयुक्तांचा मोठा निर्णय
Mumbaikars should have a referendum on Mahalakshmi Race Course proposal ex-BJP corporators demand
महालक्ष्मी रेसकोर्सच्या प्रस्तावावर मुंबईकरांचे सार्वमत घ्यावे, भाजपच्या माजी नगरसेवकांची मागणी

रेतीबंदरचा अपवाद वगळता भागशाळा मैदान ही डोंबिवली पश्चिम विभागातील एकमेव जागा आहे. त्यामुळे खेळाडू आणि नागरिकांचा येथे सतत राबता असतो. मात्र महापालिका प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे या मैदानाची सध्या दुरवस्था झाली आहे..

मुळात डोंबिवलीत मैदाने अपुरी आहेत. त्यात जी आहेत, ती अत्यंत वाईट अवस्थेत आहेत. या काँक्रीटच्या जंगलात बऱ्यापैकी राखलेल्या मोजक्या मैदानांपैकी एक म्हणजे पश्चिम विभागातील भागशाळा. खेळाडू आणि सर्वसामान्य नागरिकांचा येथे कायम राबता असतो. त्याचप्रमाणे निवडणुकांच्या काळात राजकीय सभांसाठी हे मैदान वापरले जाते. मात्र सध्या महापालिका प्रशासनाची अनास्था, दारूडे, गर्दुल्यांचा विळखा, अस्वच्छता अशा अव्यवस्थांच्या कोंडाळ्यामध्ये अडकलेल्या भागशाळा मैदानामध्ये खेळणे तसेच मॉर्निग वॉक करणे सर्वसामान्यांसाठी जिकिरीचे झाले आहे.

डोंबिवली शहरामध्ये नागरिकांच्या विरंगुळ्यासाठी उपलब्ध मोजक्या ठिकाणांमध्ये भागशाळा मैदानाचे नाव आवर्जून घेतले जाते. साडेनऊ हजार चौरस मीटरच्या विस्तीर्ण जागेवर पश्चिमेतील भागशाळा मैदान वसलेले आहे. सकाळी चालण्यासाठी येणारे नागरिक, खेळाचे सराव करणारे खेळाडू, दिवसभर वेगवेगळ्या शाळांमधील विद्यार्थ्यांच्या स्पर्धा तर सायंकाळी ज्येष्ठ नागरिकांच्या गप्पा अशा विविध कारणांसाठी हे मैदान वापरले जाते. कबड्डी, खो-खो, फुटबॉल, क्रिकेट, योगवर्ग, लाफ्टर क्लब तसेच ज्येष्ठ नागरिक कट्टाही या मैदानात भरतो.

विस्तृत जॉगिंग ट्रॅक, झाडांची सावली आणि क्रीडा क्षेत्रात करिअर करण्यासाठी धडपडणारी मंडळी या सगळ्यांनी हे मैदान सतत गजबजलेले असते. सकाळी पाच वाजल्यापासूनच आजूबाजूच्या परिसरातील नागरिक मोठय़ा प्रमाणामध्ये या मैदानात हजेरी लावतात. जॉगिंग ट्रॅकवरून चालणे, धावणे सुरू असते, तर कुठे योगसाधना प्राणायाम करणारे नागरिक आढळतात. कुठे महिलांचा एक चमू प्राणायामाबरोबरच दिलखुलास गप्पा मारतानाही दिसतो.

भागशाळा मैदानातील समस्या

मैदानात सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरलेले आहे. महापालिकेच्या वतीने मैदानाची साफसफाई केली जात नाही. झाडांचा पालापाचोळा सर्वत्र पडल्याने पावसाने तो कुजतो त्यामुळे दरुगधीबरोबरच नागरिकांना घाणीचा त्रास सहन करावा लागतो. झाडांच्या पारांना तडे गेले आहेत. त्यावर जास्त पालापाचोळा साचल्याने पारावर निवांत बसून गप्पा मारता येणे हे केवळ निव्वळ अशक्य आहे. मैदानाच्या बाजूला नागरिकांना बसण्यासाठी लोखंडी बाकडे ठेवण्यात आली आहेत. मात्र ती तुटली असल्याने त्यावर बसता येत नाही. रोटरी क्लबच्या वतीने या मैदानात नागरिकांसाठी पाणपोईची सुविधा देण्यात आली आहे. मात्र पाणपोईला नळच नाहीत. शिवाय टाकी स्वच्छ केली जात नाही. आजूबाजूला घाणीचे साम्राज्य असल्याने त्याचा उपयोग होत नाही. उन्हाळ्यामध्ये नागरिकांना याचा मोठा फटका बसतो.

मैदानाची देखभाल दुरुस्ती केली जात नाही. येथे कोणत्याही प्रकारची नियमावली नसल्याने मनमानी पद्धतीने सराव केला जात असून त्यामुळे मैदानावर अनेक ठिकाणी उंचसखल भाग निर्माण झाला आहे. मैदानावरील हिरवळीचा पट्टा नाहीसा झाला असून पावसाळ्यात खड्डय़ामध्ये पाणी साचून राहिले आहे. त्यामुळे येथे मोठय़ा प्रमाणावर डासांची पैदास होते. या डासांमुळे सायंकाळच्या वेळी मैदानातून फिरणेही नागरिकांना नकोसे होते.

जॉगिंग ट्रॅकची दुरवस्था

जॉिगग ट्रॅकची दुरवस्था झाली असून मैदानाची माती कधी कधी या ट्रॅकवर येते. अनेक जण मैदानात वाहने घुसवत असल्याने त्याचाही फटका बसतो.

भिकारी, गर्दुले, दारूडय़ांचा उपद्रव

भिकारी, गर्दुल्ले, महाविद्यालयीन प्रेमीयुगुले आणि दारूडय़ांचा विळखा या मैदानाला बसला असून सुरक्षारक्षक नसल्याने त्याचा नागरिकांना त्रास होतो. त्यांच्यावर वचक बसविण्यासाठी येथे पोलीस चौकी उभारण्यात आली आहे. मात्र तिथे पोलीसच तैनात नसल्याने त्याचा काहीएक उपयोग होत नाही.

खेळण्यासाठी वेळेचे बंधन हवे

मैदानावर मुलांना खेळण्यासाठी स्वतंत्र वेळ ठरवून देण्यात यावी, अशी मागणी गेली कित्येक वर्षे येथील नागरिक करीत आहेत. मात्र त्याला कुणीही दाद देत नाही. अनेकदा चेंडू लागल्याने नागरिक जखमी होण्याच्या घटना घडत आहेत.

राजकीय सभा नकोत

मैदानाचा उपयोग खेळासाठी होण्यापेक्षा जास्तीत जास्त संस्थांना कार्यक्रमासाठी दिला जात असल्याने अशा वेळी खेळाडू तसेच नागरिकांची मोठय़ा प्रमाणात गैरसोय होते. त्यामुळे मैदानावर कोणतेही राजकीय कार्यक्रम होऊ नयेत. केवळ खेळासाठी व फिरण्यासाठी हे मैदान उपलब्ध असावे, अशी स्थानिकांची मागणी आहे.

नियमित स्वच्छता हवी

मैदानाचे सुशोभीकरण करून देखभाल दुरुस्तीची कामे करण्यात यावीत. चालण्याच्या वेळेपूर्वी स्वच्छतेची कामे पूर्ण केली जावीत. मैदानात लॉन लावण्यात यावे. त्यामुळे सकाळच्या वेळी लॉनवर चालण्याचाही फायदा नागरिकांना करून घेता येईल.

मैदानाच्या आजूबाजूला स्वच्छतागृहाची उभारणी करण्यात यावी. मैदानाच्या परिसरात असलेले विजेचे खांब अनेकदा नादुरुस्त होतात. त्यांची वरच्यावर तपासणी करण्यात यावी.

ज्येष्ठ नागरिक कट्टा

भागशाळा मैदानातील ज्येष्ठ नागरिक कट्टा उत्तम कार्यरत असून येथे अनेक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. फिरण्यासाठी सुरुवातीला काही ज्येष्ठ नागरिक येत असत. त्यांची एकमेकांशी ओळख झाल्यानंतर ज्येष्ठ नागरिकांना सोयीसुविधा मिळाव्यात, त्यांचा विरंगुळा व्हावा म्हणून येथे ज्येष्ठ नागरिक कट्टय़ाची स्थापना करण्यात आल्याचे डी. के.पाटकर सांगतात. या कट्टय़ाच्या वतीने अनेक ज्येष्ठांचा वाढदिवस, समाजप्रबोधनात्मक कार्यक्रम पार पडतात. शिवाय मैदानाची स्वच्छता मोहीमही कट्टय़ातील सदस्यच करतात. या संघातील विलास ढोनसळे हे नागरिकांना योगाचे धडे देतात. येथे हास्यक्लबही भरतो. तसेच क्लॅप वॉकही येथे केला जातो. दोनशे टाळ्या वाजवून एक आनंदाचा उत्साह सकाळी सकाळी येथे साजरा केला जातो.

अनुभवाचे बोल

उन्हाळ्यात पाणी मारावे

उन्हाळ्यामध्ये धुळीचा प्रचंड त्रास होतो, त्यामुळे या काळात मैदानावर पाणी मारण्यात यावे. येथील पाणपोई, बोअरवेल दुरुस्त करून ती सुरू करण्यात यावी. मैदानाची स्वच्छता राखली जावी. सुरक्षारक्षकांची नेमणूक करावी. पोलीस चौकी केवळ नावाला उभारली असून तिथे पोलीसच नसल्याने मैदानात अनेक अनैतिक प्रकार चालतात. मैदानातील वीज मुद्दाम काही लोक घालवतात. या प्रकारांना आळा बसण्यासाठी या चौकीत पोलिसांचा पहारा असणे आवश्यक आहे.

डी. के. पाटकर

मैदानाची निगा राखली जावी

महापालिकेचे या मैदानाकडे दुर्लक्ष होत आहे. लोकप्रतिनिधी, बडे नेते परिस्थिती बदलण्याचे केवळ आश्वासन देतात. मात्र त्या घोषणा पोकळ ठरल्या आहेत. प्रत्यक्षात मैदानाची परिस्थिती ‘जैसे थे’ अशीच आहे. सुरक्षारक्षक, माळी आणि मैदानाची निगा राखणाऱ्या मंडळींची नियुक्ती पालिका करीत नाही. या ठिकाणी पिण्याच्या पाण्याची व्यवस्थाही नाही. सकाळ-संध्याकाळ फेरफटका मारण्यासाठी नागरिक येथे मोठय़ा प्रमाणात येत असल्याने पालिकेने त्याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.

अशोक गोडबोले

वेळ ठरवून द्यावा

येथे मॉर्निग वॉकला यायला लागल्याने अनेकांशी ओळख झाली आणि यातूनच महिलांचा एक संघ आता तयार झाला आहे. या संघाच्या वतीने अनेक कार्यक्रम आम्ही आखतो. तसेच मैदानाची साफसफाई करण्यातही महिला ज्येष्ठ नागरिक संघाला मदत करतात. मैदान असल्याने येथे मुलांनी खेळू नये असे आमचे म्हणणे नाही. मात्र त्याची काही ठरावीक वेळ ठरवून द्यावी. नागरिक फिरायला येतात, त्या वेळी खेळण्यासाठी बंदी ठेवावी. काही दिवसांपूर्वीच नेहा कुलकर्णी या महिलेला चेंडू लागल्याने ती जखमी झाली आहे. काही नियम पालिकेने आखून दिल्यास नक्कीच या चांगल्या मैदानाचा फायदा सगळ्यांनाच घेता येईल.              – सायली देवळे

अनैतिक कृत्यांना आळा घालावा

अत्यंत दर्जेदार मैदान म्हणून ओळख असलेल्या भागशाळा मैदानाची राजकीय अनास्थेमुळे दुर्दशा झाली आहे. त्यामुळे डोंबिवलीमधील हे मैदान नष्ट होण्याची शक्यता निर्माण होत आहे. रात्रीच्या वेळी या मैदानाचा ताबा गर्दुल्ले, दारूडे घेतात. दारू पिऊन ते येथेच बाटल्या फेकतात. मैदानाची साफसफाई केली जात नाही. सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरले आहे.

उमेश कामत

मैदानाची स्वच्छता हवी

मैदानाची साफसफाई करण्यात यावी. मोठमोठे वृक्ष मैदानात आहेत, त्यांची छाटणी करणे, पालापाचोळा गोळा करणे या कामासाठी माळ्याची नेमणूक करावी. तसेच या ठिकाणी नागरिकांसाठी स्वच्छतागृहाची सुविधा व पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध करून द्यावी. मैदानात पाणी साचून राहिल्याने अनेक आजारांना निमंत्रण मिळू शकते. त्यामुळे मैदानातील खड्डे बुजवून साचलेल्या पाण्यावर औषध फवारणी व्हावी.               -लता वैंऋ