डोंबिवली जिमखाना

रम्य सकाळी घराबाहेर जाऊन निसर्गरम्य वातावरणात आणि मोकळ्या जागेत मनसोक्त चालणे आणि व्यायाम करणे प्रत्येकालाच आवडत असले, तरी शहरीकरणाच्या गजबजाटामध्ये अशा जागा शोधूनही सापडत नाहीत. डोंबिवली शहराची लोकसंख्याही झपाटय़ाने वाढली असून अशा मोकळ्या जागा शहरात शिल्लकच राहिलेल्या नाहीत. शहराबाहेरील काही जागा पाहाव्या तर प्रदूषणाच्या समस्येने शहराचा बाहेरील परिसर वेढलेला आहे. असे असले तरी शहरातील मोकळे मैदान राखण्याचे काम डोंबिवली जिमखान्याच्या मैदानाने केले आहे. स्वच्छ सुंदर परिसर, झाडांच्या सान्निध्यात नागरिक येथे सकाळ-संध्याकाळ फिरायला येतात. नैसर्गिक सौंदर्य आणि शांतता कायम राखल्याने नागरिकांसाठी आरोग्यमय वातावरणाचा ठेवा येथे सापडतो. व्यायाम, भटकंती, खेळ, सराव आणि दोन घटकेचा निवांतपणा घालविण्यासाठी अनेक नागरिक या भागाला पसंती देतात. त्यामुळे डोंबिवली जिमखान्याचा परिसर डोंबिवलीकरांसाठी आवडीचा ‘मॉर्निग स्पॉट’ ठरला आहे.

स्पर्धात्मक युगामुळे घडय़ाळाच्या काटय़ानुसार प्रत्येक जण धावत असतो. या धकाधकीच्या जीवनात मनावरील ताण कमी करण्यासाठी तसेच तंदुरुस्त राहण्यासाठी नागरिक मॉर्निग वॉकला पसंती देतात. डोंबिवली जिमखाना हा मॉर्निगवॉकसाठी परिपूर्ण असल्याने पूर्व व पश्चिम भागातील नागरिक वाहने घेऊन येथे दाखल होत असतात. मैदानावर पूर्वी सरावासाठी तसेच व्यायामासाठी नागरिक येत असत. त्यांच्यासाठी बारा-तेरा वर्षांपूर्वी डोंबिवली जिमखान्याने मैदानाच्या चहुबाजूंनी ४०० मीटरचे जॉगिंग ट्रॅक बनविले. जॉगिंग ट्रॅकवर बसविण्यात आलेले पेव्हर ब्लॉक हे मातीत बसलेले असल्याने त्यावरून चालताना नागरिकांना कोणतीही अडचण होत नाही. तसेच मैदानाच्या चहुबाजूंनी झाडे लावण्यात आली असून स्वच्छ मोकळी हवा नागरिकांना मिळते. मैदानाच्या एका बाजूला विरंगुळा कट्टाही तयार करण्यात आला आहे. दोन मोठे कट्टे नागरिकांना योगासने, व्यायाम करण्यासाठी बनविण्यात आले आहेत. तसेच झाडांच्या बाजूने पार बनविण्यात आल्याने ज्येष्ठ नागरिक झाडांखाली बसून गप्पा मारताना दिसतात. सकाळ संध्याकाळ येथे नागरिकांची गर्दी असते. पाऊस असला तरी छत्री घेऊन किंवा रेनकोट घालून नागरिक मॉर्निग वॉकला येथे येतात. मॉर्निग वॉक, व्यायाम यांसह खेळण्यासाठी विस्तृत असे जिमखान्याचे मैदान आहे. या मैदानात क्रिकेट, फुटबॉल कबड्डी, खोखो यांसारखे अनेक खेळ खेळले जातात.

महिलांची गट्टी जमली ..

यासोबतच मनावरील ताण कमी करण्यासाठी काही नागरिक येथील निसर्गाच्या सान्निध्यात यायला लागले आणि या जागेच्या प्रेमात पडले असे म्हणण्यास हरकत नाही, असे येथील नागरिक विद्या प्रभू सांगतात. व्यायामासाठी, घरातील ताण कमी करण्यासाठी आम्ही येथे येत होतो. त्यानंतर इतर मैत्रिणींसोबत ओळख झाली आणि आता आमचा चांगला ग्रुप बनला आहे. आम्ही सहली, सण उत्सवही एकत्रच साजरे करतो, सुख-दु:खांची देवाणघेवाणही येथील कट्टय़ावर होते. सकाळ मैत्रिणींसोबत बोलल्याने आणि योगासने, व्यायामामुळे दिवसभर मन प्रसन्न राहते, असे सुशीला पोतदार, स्वाती जहागीरदार, प्रेमा राय, बबिता गायकर या महिलांचा गट सांगतो.

जिमखान्याकडून व्यायामास प्रोत्साहन

जिमखान्याचे सदस्य असणाऱ्या नागरिकांसाठी येथे जलतरण तलाव, बास्केट बॉल, बॅडमिंटन, स्नूकर, स्केटिंग, लॉन टेनिस, व्यायामशाळा आदी सोयी सुविधा आहेत. अ‍ॅथेलॅटिक्स, एरोबिक्स खेळाडूंना येथे प्रशिक्षण दिले जाते. तसेच झुंबाचेही क्लासेस येथे होतात.

जिमखान्याने सामाजिक भान जपत इतर परिसरातील नागरिकांसाठी मैदानाच्या बाजूने जॉगिंग ट्रॅक बसवून एक उत्तम सुविधा नागरिकांना उपलब्ध करून दिली आहे. येथे येणाऱ्या नागरिकांसाठी मैदानाच्या बाजूला स्वच्छतागृहही उभारण्यात आले आहे.

मैदानाच्या जागेवर क्रिकेटसाठी लवकरच क्रिकेट ग्राऊंड बनविण्यात येणार असून क्रिकेट खेळाडूंना येथे सरावासाठी एक उत्तम जागा निर्माण  होईल.

योगासने आणि हास्यक्लब..

मॉर्निग वॉकला येणाऱ्या नागरिकांना योगाचे काही प्रकार शिकविले तर त्यांच्या शारीरिक समस्याही कमी होतील तसेच त्यांना दिवसभर प्रसन्न वाटेल. या सामाजिक भावनेने योगा प्रशिक्षक विलास नेर्लेकर यांनी येथील नागरिकांना योगा शिकविण्यास सुरुवात केली. त्यांना नंतर विवेक वडगबाळकर यांनी साथ दिली. आता या योगा ग्रुपमध्ये ४० सदस्य असून ते येथे येऊन सकाळी योगा करतात. तसेच सायंकाळच्या वेळी येथे हास्यक्लबही चालतो, असे सुरेश रवानी यांनी सांगितले.

आवश्यक सुविधा..

  • मैदानाला बस आगाराच्या बाजूने उतार असल्याने मैदानातील माती वाहून ट्रॅकवर येते. मैदानाचा एक थर केल्यास तसेच माती ट्रॅकवर येऊ नये म्हणून काही उपाययोजना करावी.
  •  जिमखान्याची व्यायामशाळा आहे, परंतु तरुणांचा येथील सहभाग वाढविण्यासाठी जर खुली व्यायामशाळेची सुविधा येथे उपलब्ध झाली तर सभासदांव्यतिरिक्त व्यायामाची आवड असणाऱ्या नागरिकांना साधने उपलब्ध होतील.
  • पावसामुळे जॉगिंग ट्रॅकवर काही ठिकाणी शेवाळ साचले आहे. मैदानावरील मातीही जॉगिंग ट्रॅकवर येते.

 

अनुभवाचे बोल..

प्रसन्न वातावरण आवडते..

दमल्याभागल्या खेळाडूंना मैदानाकाठचे वृक्ष सावली गारवा देतात. स्वच्छ हवा, चालण्यासाठी उत्तम व्यवस्था आणि प्रसन्न वातावरण यामुळे येथे येणे नेहमीच आवडते. सर्व स्तरातील नागरिक येथे येत असल्याने नवीन ओळखीही येथे होतात.

– विनोद ओरपे

योग शिकवण्याचे वेगळे समाधान..

अशा स्वरूपाचा जॉगिंग ट्रॅक डोंबिवलीत कुठेच नाही. सर्व सोयी सुविधा, स्वच्छ वातावरण येथे आहे. योगा दिनापासून आम्ही येथील नागरिकांना योगा शिकवीत असून त्यांच्यासोबत वेळ घालविण्याने एक वेगळेच समाधान मिळते.

– विवेक वडगबाळकर

सर्वाची सुरक्षा आणि चांगली व्यवस्था..

या जॉगिंग ट्रॅकची देखभाल दुरुस्ती जिमखाना करीत असल्याने तो चांगला आहे. येथील वातावरणही स्वच्छ आहे. सुरक्षा रक्षक प्रवेशद्वारावर असल्याने येथे कोणतेही अनैतिक प्रकार होत नाहीत. केवळ व्यायाम, जॉगिंग, प्राणायाम, योगा किंवा खेळाचा सराव करणारे नागरिक येथे येतात.

– सुरेश रवानी

नव्या मैत्रिणी मिळाल्या..

पक्ष्यांच्या किलबिलाटात, मोकळ्या वातावरणात दिवसाची सुरुवात होते. त्यामुळे दिवसभर प्रसन्न वाटते. मनावरचा ताणही हलका होत असल्याने गेली अनेक वर्षे मी येथे येत आहे. काही मैत्रिणीही नव्याने मिळाल्याने जीवनात एक वेगळा आनंद घेण्याची संधी या जिमखान्याने दिली. – विद्या प्रभू

आरोग्यदायी सूप..

व्यायाम, योगा करून झाल्यानंतर अनेक व्याधींवर रामबाण उपाय ठरणारे औषधी काढे, सूप आणि सरबत येथील नागरिकांना दीपक ठक्कर हे पुरवीत आहेत. कारले, दुधी भोपळा, कडुलिंब, कोरफड, विविध फळे यांच्या ज्यूससोबतच तुम्हाला येथे कडधान्यांचे सूपही मिळते. तसेच न्याहरी म्हणून उकडलेली कडधान्ये मिळतात. नागरिक आरोग्यदायी सुपाची न्याहारी करण्यासाठी एकच गर्दी करतात.