पाणी वाचविण्याचा सरोजिनी सावंत यांचा सल्ला
सध्या माणसाने विविध क्षेत्रांत लक्षणीय प्रगती केलेली आहे. अगदी मंगळ ग्रहापर्यंत त्याने आपली मजल नेली आहे. मात्र मानवी जीवन टिकून राहण्यात अत्यंत आवश्यक असणारे पाणी तो अद्याप कृत्रिमरीत्या तयार करू शकलेला नाही. त्यातूनच पाण्याचे महत्त्व अधोरेखित होते, असे प्रतिपादन ज्येष्ठ जलतज्ज्ञ सरोजिनी सावंत यांनी केले.
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान कोकण विभाग आणि युवाराज प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने माजी उपनगराध्यक्ष व विद्यमान नगरसेवक आशीष दामले यांच्या पुढाकाराने ‘चला पाण्याकडे जाऊया’ या कार्यक्रमाचे आयोजन बेलवली येथील यशस्विनी भवन येथे जलदिनानिमित्त करण्यात आले होते. बदलापूर पालिकेचे पाणी पुरवठा सभापती शैलेश वडनेरे, भाजप गटनेते राजेंद्र घोरपडे, नगरसेवक संभाजी शिंदे, नगरसेविका वंदना सावळे, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे उपअभियंता बागुल आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महिला शहर अध्यक्ष अनिता नवले आदिी विविध पक्षांचे लोकप्रतिनिधी व्यासपीठावर उपस्थित होते.
सरोजनी सावंत यांनी विविध उदाहरणे देऊन पाण्याचे महत्त्व पटवून दिले. पाण्याचा अपव्यय टाळणे, नैसर्गिक जलस्रोतांचे रक्षण करणे यातून जलसंवर्धन साधण्यासाठी सर्वानी एकत्र येण्याचे आवाहनही त्यांनी केले. या प्रसंगी भाजप गटनेते राजेंद्र घोरपडे, नगरसेवक संभाजी शिंदे तसेच पाणी पुरवठा सभापती शैलेश वडनेरे यांची समयोचित भाषणे झाली. आशीष दामले यांनी प्रास्ताविक व स्वागत तर विश्वनाथ पाटील यांनी सूत्रसंचालन केले.