डासांचा प्रादुर्भाव वाढला; रहिवाशांना त्रास

डहाणू गावात मशिदीजवळचे तलाव आणि पारनाका शिवमंदिराजवळचे कमल तलाव जलपर्णीने आच्छादले आहेत. अशीच परिस्थिती राहिल्यास तलावांचा श्वास गुदमरण्याची भीती आहे. याकडे नगर परिषदेचे दुर्लक्ष होत आहे.

जलपर्णीमुळे डासांचा प्रादुर्भाव वाढला असून, परिसरातील रहिवाशांना त्रास सहन करावा लागत आहे. पारनाका येथील कमला तलावासाठी डहाणू नगर परिषदेने तब्बल ६५ लाखांचा खर्च करून तलाव बांधून सुशोभित केले. तर डहाणू गावातील  मशिदीसमोरच्या तलावासाठी १ कोटी ८५ लाखांचा खर्च करून तलावाचे सुशोभीकरण करण्यात आले. आता तलावांना जलपर्णीच वेढा पडला आहे.

डहाणू पारनाका येथे शीव मंदिर आहे. या शिवमंदिराच्या लगत कमल तलाव बांधण्यात आला आहे. या तलावासाठी ६५ लाख रुपये खर्च करून सुशोभित करण्यात आले. मात्र तलावाच्या आजूबाजूला ड्रेनेजची व्यवस्था नसल्याने सांडपाणी या तलावात येते. तसेच पावसाळ्यात हे तलाव भरते. हे पाणी बाहेर नेण्यासाठी कोणतीही व्यवस्था करण्यात आलेली नाही. परिणामी मंदिर परिसरात हे पाणी पसरते. डहाणू गावात मशिदीसमोर असलेल्या तलावासाठी १ कोटी  ८५ लाखांचे काम कामे केली आहेत. तलावाला जाळी बसवण्याची मागणी होत आहे. येथील कारंजे, दिवे बंद आहेत.

पावसाळा सुरू असल्याने जलपर्णी वाढली आहे. तलावातला कचरा दूर करून सुशोभीकरणासाठी प्रयत्न केले जातील. रविवारपासून स्वच्छता मोहीम राबवण्यात येणार आहे.

-भरतसिंग राजपूत, नगराध्यक्ष डहाणू

डहाणूत तलावाच्या सुशोभीकरणाकडे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे तलावात जलपर्णी पसरत आहेत. याच परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होत आहे.

-किरण मांडेकर,  रहिवासी